कोहिमा : देशाच्या ईशान्येकडील नागालँड राज्यामध्ये ‘वंदे मातरम्’ गायनाच्या सक्तीवरून नवा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. शैक्षणिक संस्था आणि विधानसभा येथे ‘वंदे मातरम्’ म्हणणे अनिवार्य केल्याच्या निर्णयाला नागा पीपल्स फ्रंटने (NPF) कडाडून विरोध दर्शवला असून, हा निर्णय ख्रिश्चन बहुल राज्यावर लादला गेल्याचा आरोप केला आहे.
या वादाच्या पार्श्वभूमीवर, स्वामी विवेकानंदांच्या एका प्रसिद्ध विधानाने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, “जर एखादा हिंदू धर्मांतरित झाला, तर तो केवळ धर्म बदलत नाही, तर त्याचे राष्ट्रीयत्वही बदलते!” नागालँडमधील सध्याची परिस्थिती पाहता विवेकानंदांचे हे विधान तंतोतंत लागू पडत असल्याचे मत अनेक अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
नागा पीपल्स फ्रंटच्या मते, नागालँड हे ख्रिश्चन बहुल राज्य आहे आणि तिथे विशिष्ट धार्मिक असलेल्या गोष्टींची सक्ती करणे हे लोकशाहीच्या विरोधात आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला हा विरोध म्हणजे भारतीय संस्कृती आणि राष्ट्रवादाला दिलेले आव्हान असल्याचे मानले जात आहे.
धर्मांतरित झालेल्या व्यक्तींकडून अनेकदा राष्ट्रीय प्रतीकांना (उदा. वंदे मातरम्) विरोध केला जात असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशा प्रकारे स्वतःच्या मूळ संस्कृतीपासून दूर गेलेल्या आणि राष्ट्रीय एकात्मतेत अडथळे निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींशी आता कठोरपणे आणि ठामपणे वागण्याची वेळ आली आहे, असे मत देशप्रेमी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
धर्मांतर केवळ वैयक्तिक श्रद्धेचा विषय न राहता तो आता देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा आणि अस्मितेचा प्रश्न बनू लागला आहे, हेच या वादातून स्पष्ट होत आहे.