Monday, December 8, 2025

काश्मिरी पंडितांसाठी ‘ढाल’ बनले! ‘हिंद-दी-चादर’ गुरुंच्या बलिदानाचा तो थरारक प्रसंग मुख्यमंत्र्यांनी सांगितला!

Share

नागपूर: शीख धर्माचे नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्याचे आज नागपूर येथे अत्यंत भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

नानकपंथी समाजाचे ‘सांस्कृतिक ऐक्य’

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समागमाचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, या समागमाच्या निमित्ताने नानकपंथी समाजातील सिकलीगर, बंजारा, लबाना आणि इतर समाज पुन्हा एकत्र येत आहेत.

“हे केवळ सामाजिक ऐक्याचे दर्शन नसून आपल्या सामूहिक सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारशाच्या दृढीकरणाचे प्रतीक आहे.” – देवेंद्र फडणवीस

गुरु नानक देवजी यांनी दिलेल्या ‘एक ओंकार’ या विचारातून जातींमध्ये विभागलेला समाज एकत्र आला आणि नानकपंथी परिवार निर्माण झाला, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

‘धर्मरक्षणासाठी ढाल बनले’ दहा गुरु!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय संस्कृतीच्या रक्षणात दहा गुरुंच्या योगदानाचे महत्त्व सांगितले. “जेव्हा आक्रमणकर्ते धर्म आणि संस्कृतीवर प्रहार करत होते, तेव्हा दहाही गुरूंनी धर्म, संस्कार आणि स्वाभिमानाचे संरक्षण करणारी ढाल बनून भारतीय समाजाला मार्गदर्शन केले. म्हणूनच संपूर्ण हिंदुस्तान गुरूंना सदैव नमन करतो,” असे ते म्हणाले.

गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ‘अद्वितीय बलिदाना’ची आठवण करून देताना मुख्यमंत्री भावूक झाले व म्हणाले, काश्मिरी पंडितांवर औरंगजेबाकडून धार्मिक अत्याचार होत असताना, त्यांच्या संरक्षणासाठी स्वतः औरंगजेबाला सामोरे जायचे अप्रतिम धैर्य श्री गुरु तेग बहादूर यांनी दाखवले. धर्मांतर किंवा मृत्यू अशा कठोर पर्यायांसमोरही त्यांनी दृढपणे सांगितले “मी विचार बदलणारा नाही, मी डगमगणारा नाही. हिंदुस्तानातील सर्व धर्मांच्या विचारासाठी मी जीव द्यायला तयार आहे.” त्यांच्यासमोरच त्यांचे सहकारी भाई मतीदासजी आणि भाई सतीदासजी यांवर अत्यंत क्रूर अत्याचार करण्यात आले, परंतु तरीही ते खंबीरपणे धर्मरक्षणासाठी उभे राहिले आणि बलिदान देऊन धर्म, संस्कृती आणि स्वाभिमानाचे रक्षण केले. म्हणूनच त्यांना ‘हिंद-दी-चादर’ म्हणून गौरविले जाते.

लक्खी शहा बंजारा यांचा ‘निष्ठावान इतिहास’

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, औरंगजेबाने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या अंत्यसंस्कारालाच बंदी घातली तेव्हा लक्खी शहा बंजाराजी यांनी त्यांच्या शरीराला आपल्या घरात आणून घरासकट अग्नी दिला. असा होता त्यांच्या शिष्यांचा अखंड निष्ठेचा इतिहास…

संत नामदेव महाराजांच्या वाणीचा गौरव

श्री गुरु ग्रंथ साहिब हा सर्वसमावेशकतेचा ग्रंथ असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यात गुरुंच्या वाणीसह महाराष्ट्रातील संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या वाणीलाही स्थान देण्यात आल्याचे अधोरेखित केले. समन्वय आणि समरसतेची ही परंपरा पुढे नेण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार बाबूसिंह महाराज राठोड, आमदार कृष्णा खोपडे, शीख धर्मगुरु बाबा हरनाम सिंह खालसा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख