नांदेड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरही राजकीय फेरबदलांचे सत्र अद्याप सुरूच आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार शंकर धोंडगे यांनी आज आपल्या शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे मराठवाड्यात, विशेषतः नांदेड जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठे खिंडार पडले आहे.
“शिंदे हे दिलदार मनाचे नेते” – शंकर धोंडगे
पक्षप्रवेशावेळी शंकर धोंडगे म्हणाले की, “आम्ही राजकारणात आजवर अनेक ‘डावे-उजवे’ पाहिले आहेत. मात्र, सामान्यांची कामे करणारा आणि कार्यकर्त्याला जपणारा एकनाथ शिंदेंसारखा दिलदार मनाचा नेता आम्हाला आजवर दिसला नाही. म्हणूनच आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.”
पक्षात कोणी मालक नाही, कार्यकर्ताच पाठीचा कणा: एकनाथ शिंदे
नूतन सदस्यांचे स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले: “आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे. इथे कोणी ‘मालक’ नाही आणि कोणी ‘चालक’ नाही. जो प्रामाणिकपणे काम करेल तोच पुढे जाईल. शेवटी कार्यकर्ता हाच पक्षाचा खरा पाठीचा कणा असतो. शंकर अण्णांसारख्या जमिनीवरच्या नेत्याने सोबत येण्यामुळे पक्षाची ताकद नक्कीच वाढली आहे.”
निवडणुकीत शिवसेना ‘नंबर २’ चा पक्ष
नुकत्याच झालेल्या निवडणुकांचा संदर्भ देत शिंदे म्हणाले की, सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेना हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. महायुतीला जनतेने भरभरून आशीर्वाद दिले असून, आता पुढील ३ वर्षे केवळ विकासाच्या कामांवर आणि शेतकऱ्यांच्या हितावर आमचा भर असेल.