मुंबई : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक लाच घेताना रंगेहाथ पकडला गेल्याने अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मंत्रिपद द्यायचे की काढायचे, हा सर्वस्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे, तेच माझ्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय घेतील,” असे खळबळजनक वक्तव्य झिरवळ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
नेमके प्रकरण काय?
अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला लाच घेताना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना झिरवळ म्हणाले की, मंत्रालयात घडलेला हा प्रकार अत्यंत ‘दयनीय’ आणि ‘कलंक’ लावणारा आहे.
राजेंद्र ढेरंगे सध्या पोलीस कोठडीत असून, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून गोपनीय अहवाल सादर करण्याचे आदेश झिरवळ यांनी दिले आहेत. अहवालानंतर पुढील कठोर कारवाई केली जाईल. तसेच, आरोपी लिपिक मूळचे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे असून ते ‘उसनवारी’ (प्रतिनियुक्ती) तत्त्वावर अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत होते. त्यांना आता पुन्हा मूळ विभागात पाठवण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाला पत्र देण्यात आले आहे.
झिरवळ यांनी स्पष्ट केले की, संबंधित लिपिकाने स्वतःसाठी लाच घेतल्याची कबुली दिली असून, या प्रकरणात कोणत्याही ओएसडीचा (OSD) सहभाग नसल्याचे त्याने सांगितले आहे. विभागात सुनावणी, स्टे किंवा परवान्यांबाबतची कामे ही दैनंदिन प्रक्रियेचा भाग असून कोणावरही दबाव टाकला जात नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले कि, “माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणीही वैरी नाहीत. मुख्यमंत्र्यांशी अद्याप माझे बोलणे झालेले नाही, पण मी लवकरच त्यांची भेट घेणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.