४ जानेवारी २०२६ रोजी दादरच्या सेना भवनात उबाठा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) यांच्या युतीचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा संयुक्त वचननामा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जाहीर केला.

“मुंबईची प्रगती आणि मुंबईकरांचा स्वाभिमान हा शब्द ठाकरेंचा” असा मथळा देऊन उबाठाच्या मुखपत्र सामनाने या सोहळ्याचे रसभरीत वर्णन केले आहे.
या वचननामा प्रकाशन सोहळ्याला उबाठा आणि मनसेचे छोटे मोठे अनेक नेते उपस्थित होते. पत्रकारांना उद्धव आणि राज ठाकरे सामोरे गेले. “हा शब्द ठाकरेंचा” असे त्याचे “ब्रम्हाजी की रेघ” थाटात वर्णन केले गेले. मात्र या सगळ्या सोहळ्यात युतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शप) चे अस्तित्व जाणवले देखील नाही. किंबहुना ते प्रयत्नपूर्वक जाणवू दिले गेले नसावे.
वास्तविक मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीत उबाठा १६४ मनसे ५३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) ११ जागा एकत्रितपणे लढत आहेत. वचननामा देखील संयुक्त असल्याचे सांगितले गेले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या विद्याताई चव्हाण सभागृहात उपस्थित असूनही प्रेक्षकांमध्येच दिसत होत्या.
बहुदा सुप्रियाताई सुळे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत व्यस्त असाव्यात आणि जयंत पाटील उगाच आपली शोभा नको म्हणून या सोहोळ्याकडे फिरकले नसावेत.
वास्तविकतः प्रत्येक वेळी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या जोडीला घरगड्याची खुर्ची लावण्यापेक्षा यावेळी विद्या ताईंना आपल्या जोडीने स्थान दिले असते तर ही युती एकदिलाने निवडणुका लढवत आहेत. असे जनतेला किमान भासले तरी असते. कदाचित विद्याताईंचे आडनाव “ठाकरे” नसल्यामुळे त्यांना या प्रायव्हेट लिमिटेड युतीमध्ये भागधारका (Shareholder) ऐवजी नाममात्र सभासद (Nominal Member) करून घेतले आहे असे वाटत होते. सगळा सोहळा ठाकरे कुटुंबीयांचा कौटुंबिक कवतिकाचा कार्यक्रम वाटत होता.
हा वचननामा बनवताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस (शप)शी दोघा भावांनी कितपत विचार विनिमय केला असावा याबद्दल देखील शंकाच येते. अन्यथा वचननाम्यात म्हटल्याप्रमाणे कष्टकरी मुंबईकरांना १० रुपयात नाश्ता आणि दुपारचं जेवण देण्याच्या योजनेला “माँसाहेब” किचन्स नाव द्यायला राष्ट्रवादी काँग्रेस (शप)ने सहजासहजी मान्यता दिली नसती त्याऐवजी आपण ही योजना “इशरत” किचन्स नावाने सुरू करू अशी कल्पना सुचवली असती आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी त्याला आनंदाने संमती देखील दिली असती.

एका अर्थी शरद पवार यांनी आयुष्यभर केलेल्या सत्तेच्या राजकारणाची ही करूण शोकांतिका आहे. महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्री राहिलेले. दोनदा काँग्रेस फोडलेले. स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन करणारे आणि आयुष्यात मोजता येणार नाही एवढ्या राजकीय कोलांट्या उड्या मारून शक्यतो कायम सत्तेला चिकटून राहणारे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आज वार्षिक ७४ हजार कोटी अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या जेवणावळीतील उष्टी खरकटी पत्रावळ चाटायला देखील मिळू नये हा काळाने त्यांच्यावर उगवलेला सूड आहे.
तशी राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईवर फारशी पकड कधीच नव्हती. राज्यात सत्तेत सहभागी असताना सचिन अहिर, संजय दिना पाटील, नवाब मलिक अशी मुठभर का होईना पण प्रभावी मंडळी त्यांच्याकडे होती. आज हे सगळे नेते वेगवेगळ्या पक्षात गेले आहेत. नवाब मलिक हे अजित पवारांकडे गेल्यामुळे मुस्लिम बहुल भागात हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या महापालिकेच्या जागा त्यांना कदाचित जिंकता आल्या असत्या. त्याही हातून निसटल्या आहेत.
कारण मुस्लिम समाज हा काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे. त्या काँग्रेसबरोबर आज राष्ट्रवादी काँग्रेस (शप) नाही. शिवाय मुस्लिम समाजाकडे काँग्रेसच्या जोडीला वेगवेगळे लढणारे समाजवादी पक्ष आणि MIM हे समर्थ पर्याय देखील आहेत. बाबरी मशिद पाडल्याचे क्रेडिट ढापणाऱ्या शिवसेना उबाठा बरोबर मशिदीवरचे भोंगे उतरवा म्हणून दमदाटी करणाऱ्या मनसे बरोबर गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शप) ला मुस्लिम समाज मतदान करेल अशी सुतराम शक्यता नाही.
२०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ उमेदवार निवडून आले होते. (त्यातले ७ मुसलमान होते) आणि मनसेचे ७. आज तीच मनसे यांच्या सोबत युती करून ५३ जागा लढवते आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप)च्या तोंडावर त्यांनी फक्त ११ जागांचे तुकडे फेकले आहेत. ते सुद्धा पाहिजे तर घ्या म्हणून. तुतारीची पार पिपाणी झाली आहे.
मुंबईत एक आमदार नाही. एक खासदार नाही. एक मातब्बर नेता नाही. अशा गलितगात्र काँग्रेस (शप) ला ११ जागा देखील ठाकरे बंधूंनी अतिशय अनिच्छेनेच दिलेल्या असाव्यात. त्यासुद्धा जिथे आपला उमेदवार हमखास पडू शकतो अशा जागा निवडून काढून काँग्रेस (शप) च्या गळ्यात मारल्या असणार. शिवाय सध्या उबाठा मनसेचे कार्यकर्ते दोन्ही भावांच्या एकत्र येण्याने आणि “ठाकरे ब्रँड”ने इतके हुरळून गेले आहेत की या ११ वॉर्डमध्ये ते कितपत मनापासून प्रचार करतील याची शंकाच आहे. त्यापेक्षा ते बाजूच्या वॉर्डमधील आपल्या युतीच्या उमेदवारांचा प्रचार करणे पसंत करतील.
एखादा पक्ष फुटला की नेते आणि कार्यकर्ते विभागले जातात. पाठोपाठ समर्थक मतदार देखील विभागला जातो. ज्या गटाकडे सत्ता येते तो सत्ता असेपर्यंत फुलतो, फळतो, बहरतो आणि जो गट सत्तेपासून दूर रहातो तो हळूहळू सुकत जातो. त्यातून सत्ता मिळण्याची दूर दूर पर्यंत शक्यता नसेल तर मोरचूद घातलेल्या वठलेल्या वृक्षासारखा तो “आधारवठ” होतो.
आयुष्यभर हिंदु द्वेषाचे हिंदू समाजातील जातीपातींमध्ये फूट पाडण्याचे कपटी राजकारण करणारे शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष Okay च्या स्पेलिंग मधले ay जितके निरुपयोगी असतात तितकेच आज महाराष्ट्राच्या राजकारणात निरुपयोगी झाले आहेत. काळाने शरद पवारांच्या हिंदू द्वेषाच्या कारस्थानी राजकारणाला मोरचूद घालून ते कालबाह्य करून टाकले आहे.
|कालाय तस्मै नमः|