मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी महायुतीच्या सरकार स्थापनेचे नाट्य आज समाप्त झाले. निवडणुकीत 132 जागा जिंकलेल्या भारतीय जनता पक्षाने (BJP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली असून, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली, ज्यामध्ये केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये विधिमंडळ गटनेते निवडीची बैठक पार पडली, ज्यात फडणवीस यांच्या नावावर एकमत झाले. यावेळी त्यांनी एक आहोत तर सेफ आहोत हा नाराही दिला.
निर्मला सीतारमण यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
या बैठकीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी काँग्रेस सरकारवर टीका करताना राज्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी म्हटले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाले. राज्याच्या 14 कोटी जनतेने दिलेला कौल ही एक सकारात्मक दिशा आहे.
सीतारमण यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली “डबल इंजिन” सरकार महाराष्ट्राच्या भविष्यासाठी काम करेल, असे आश्वासन दिले. बुलेट ट्रेन प्रकल्पासह इतर महत्त्वाकांक्षी योजना काँग्रेसमुळे रखडल्या, अशी टीका करत त्यांनी मोदींच्या व्हिजनमुळे अनेक प्रकल्प पूर्णत्वास गेले असल्याचे नमूद केले.
शेतकरी, स्टार्टअप्स आणि राज्याचा विकास
शेतकरी, उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीला प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला. महाराष्ट्राला स्टार्टअप्सचे हब बनवणे आणि आर्थिक राजधानी म्हणून राज्याचे स्थान मजबूत करणे हा केंद्राचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वारकरी कॉरिडॉर आणि महत्त्वाचे निर्णय
आषाढी एकादशीसाठी वारकऱ्यांसाठी तयार केलेल्या कॉरिडॉरचा उल्लेख करत त्यांनी मोदींच्या व्हिजनची प्रशंसा केली. वाढवण बंदराच्या उभारणीसारख्या प्रकल्पांचा उल्लेख करत, महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी केंद्र सरकारकडून सातत्याने योजना राबवल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी संपूर्ण विधानसभा निवडणुकीत गाजलेला, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला एक आहोत तर सेफ आहोत हा नाराही निर्मला सीतारमण यांनी पुन्हा दिला.
महायुतीने निवडणुकीत मिळवलेले यश आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा पुढील कार्यकाल महाराष्ट्राला कोणत्या दिशेने नेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.