Monday, February 2, 2026

“हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही!”; ए. आर. रहमान यांच्या कपिल शर्मा शोमधील हजेरीवर नितेश राणे भडकले

Share

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माचा ‘The Great Indian Kapil Show’ सध्या जगभरात चर्चेत आहे. मात्र, या शोच्या आगामी भागावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भाजप आमदार, मंत्री नितेश राणे यांनी संगीतकार ए. आर. रहमान यांच्या या शोमधील सहभागावर तीव्र आक्षेप घेत शोचे निर्माते आणि नेटफ्लिक्सवर (Netflix) संताप व्यक्त केला आहे.

नितेश राणे यांचे ट्विट
“कॉमेडी म्हटलं की नाव येतं कपिल शर्मा यांचं, आणि The Great Indian Kapil Show ला देश-विदेशात मोठी लोकप्रियता मिळाली आहे. मात्र A. R. Rahman यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे भारत, इतिहास आणि हिंदू समाजाच्या भावनांबाबत अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर त्यांना मोठ्या मंचावर स्थान देण्याच्या निर्णयाबाबत आम्ही तीव्र निषेध नोंदवतो.

मनोरंजनाचे स्वातंत्र्य मान्य आहे, परंतु जनभावना, हिंदू समाजाच्या भावनांचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मता यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे. Netflix व शो निर्मात्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करून समाजातील संवेदनशीलतेची दखल घ्यावी. कॉमेडी स्वागतार्ह आहे, पण भारताची अखंडता, सांस्कृतिक अस्मिता आणि हिंदुत्वाशी तडजोड मान्य नाही.”

काय आहे वादाचे मूळ?
नितेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये ए. आर. रहमान यांच्या जुन्या ‘वादग्रस्त’ विधानांचा संदर्भ दिला आहे. रहमान यांनी काही प्रसंगी भारत आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी विधाने केल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. अशा व्यक्तीला कपिल शर्माच्या लोकप्रिय मंचावर बोलावून त्यांचे उदात्तीकरण करणे चुकीचे आहे, असे राणे यांचे म्हणणे आहे.

निर्मात्यांना पुनर्विचाराचे आवाहन
नितेश राणे यांनी केवळ निषेध नोंदवून थांबले नाहीत, तर त्यांनी नेटफ्लिक्स आणि शोच्या निर्मात्यांना हा निर्णय बदलण्याचे आवाहन केले आहे. “कॉमेडीचे स्वागत आहे, पण सांस्कृतिक अस्मिता आणि हिंदुत्वाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.

आता नितेश राणे यांच्या या भूमिकेनंतर शोचे निर्माते काय निर्णय घेतात आणि नेटफ्लिक्स यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख