विरार : “वसई-विरार महापालिकेवर केवळ सत्ता मिळवणे हा आमचा उद्देश नाही, तर या शहरावर महायुतीचा भगवा फडकवून हिंदुत्ववादी विचारांचा महापौर बसवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. भाजपा-महायुती म्हणजे विकासाचे वचन आहे आणि हे वचन आम्ही पूर्ण करणारच,” असा घणाघात भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी केला.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरार (पूर्व) येथील फुलपाडा (वॉर्ड क्र. ७) आणि कोकण नगर (वॉर्ड क्र. ३) परिसरातील भाजपा-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित चौकसभांमध्ये ते बोलत होते.
कोकणवासीयांच्या आशा-आकांक्षांना बळ
या परिसरात मोठ्या संख्येने स्थायिक असलेल्या कोकणवासीयांशी संवाद साधताना नितेश राणे भावूक झाले. ते म्हणाले की, “हे केवळ मतदानाचे आवाहन नाही, तर इथे राहणाऱ्या माझ्या कोकणवासीयांच्या आशा, अपेक्षा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा हा निर्धार आहे. कोकणी माणसाच्या पाठीशी महायुती खंबीरपणे उभी आहे.”
घरे आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार
वसई-विरारमधील प्रलंबित समस्यांवर बोट ठेवत त्यांनी महत्त्वाचे आश्वासन दिले:
पाणी समस्या: गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करणार.
घरांचा प्रश्न: वसई-विरारमधील घरांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध असेल.
मूलभूत सुविधा: रस्ते, आरोग्य आणि इतर नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्यावर भर दिला जाईल.
प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन
“वसई-विरारच्या विकासासाठी आणि इथल्या जनतेला अन्यायातून मुक्त करण्यासाठी भाजपा-महायुतीच्या सर्व उमेदवारांना कमळ आणि धनुष्यबाण चिन्हावर प्रचंड मताधिक्याने विजयी करा,” असे आवाहन राणे यांनी यावेळी केले.
या चौकसभेला नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक, स्थानिक उमेदवार, भाजपचे पदाधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोकण नगर आणि फुलपाडा परिसरात नितेश राणे यांच्या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, ज्यामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे.