पाटणा, बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) ने २४३ जागांपैकी २०२ जागांवर दणदणीत विजय मिळवून मोठा जनादेश मिळवला आहे. या विजयात भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकून आघाडीत ‘मोठा भाऊ’ म्हणून आपले स्थान बळकट केले. तरीही, भाजपने राजकीय स्थिरता आणि दिलेला शब्द पाळत संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. नितीश कुमार यांनी आज (गुरुवारी) विक्रमी १०व्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांची शपथ
नव्या सरकारमध्ये भाजपला महत्त्वाची आणि निर्णायक पदे मिळाली आहेत. यावेळी भाजपचे फायरब्रँड नेते सम्राट चौधरी (Samrat Choudhary) आणि विजय सिन्हा (Vijay Sinha) यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दोघांनीही उपमुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला आहे.
या शपथविधी समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
राजकीय समीकरणे आणि भाजपचा विश्वास
या निवडणुकीत भाजपने (८९ जागा) नितीश कुमार यांच्या JDU (८५ जागा) पेक्षा अधिक जागा जिंकल्यामुळे. सर्वाधिक जागा जिंकल्यानंतरही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली, त्यामुळे भाजपने ‘दिलेला शब्द पाळला’ हे सिद्ध झाले आहे. मात्र, भाजपच्या दोन उपमुख्यमंत्र्यांमुळे आता राज्याच्या कारभारात भाजपचा प्रत्यक्ष आणि प्रभावी सहभाग अधिक वाढणार आहे.
नितीश कुमार यांच्या अनुभवाचा आणि भाजपच्या सशक्त नेतृत्वाचा समन्वय साधून हे ‘डबल इंजिन’ सरकार बिहारच्या विकासाला नवी गती देईल, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे.