Saturday, November 1, 2025

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि स्व जागृत झालेला भारत..

Share

अफगाणिस्तानाचे परराष्ट्रमंत्री आमिर खान मुत्तकी सध्या भारत दौऱ्यावर येऊन गेले. हा दौरा प्रादेशिक कूटनीती आणि भौगोलिक-सांस्कृतिक समीकरणांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सीमावादामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला लष्करी संघर्ष अधिकच चिघळला आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष कसा पेटला

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या लष्करी संघर्षाचा भडका उडाला असून येणार्‍या काळात हा संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता दिसत आहे. अफगाण तालिबान पाकिस्तानात तालिबानच्या अतिरेकी इस्लामिक राजवटीच्या धर्तीवर अतिरेकी इस्लामिक राजवट आणण्याच्या उद्देशानं पाकिस्तानी तालिबानला (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान किंवा TTP) मदत करत आहेत हा पाकिस्तानचा वहीम या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे.

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने या महिन्यात पाकिस्तानच्या सुरक्षा दलांवर हल्ले केले. त्यात २३ लोकांचा बाली घेणाऱ्या पोलीस प्रशिक्षण शाळेवरील झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटाचाही समावेश आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने काबूल आणि कंदाहार येथील तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या कथित ठिकाणांवर हल्ले केले. या हल्ल्याच्या बदल्यात, तालिबानच्या सैन्याने अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यातील ड्युरांड लाईन या २,६०० किलोमीटर लांबीच्या वादग्रस्त सीमेवरील पाकिस्तानी लष्करी चौक्यांवर हल्ला केला. पाकिस्तानने अफगाणला जाणारे मार्ग बंद केल्यामुळे आधीच डबघाईस आलेल्या अफगाण अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला.

दोन्ही देशांमध्ये १५ ऑक्टोबरच्या रात्री शस्त्रसंधीवर सहमती झाली, पण पाकिस्तानने १७ ऑक्टोबरच्या रात्री अफगाणिस्तानच्या पक्तिका भागात हवाई हल्ले केले. त्यात अफगाणिस्तानच्या स्थानिक क्रिकेट टीममधील कबीर, सिबगतुल्लाह आणि हारून या तीन उदयोन्मुख क्रिकेटपटूंसह काही नागरिक ठार झाले. त्यानंतर कतार आणि तुर्कस्तानच्या मध्यस्थीने १९ ऑक्टोबर रोजी पुन्हा उभय देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. पण ही शस्त्रसंधी किती काळ टिकेल याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत.

पाकिस्तानच्या धोरणांमुळे पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मेजवानी झोडल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ जग जिंकल्याच्या आविर्भावात भारतावर डोळे वटारत असले तरी सध्या पाकिस्तानात प्रचंड अंतर्गत असंतोष माजला आहे. विशेषतः पख्तुन लोकांचे वर्चस्व असलेल्या अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील खैबर पख्तुनवा प्रांतात सातत्याने हिंसाचार सुरु आहे. हा भाग ब्रिटिशांनी १८९३ मध्ये आखलेल्या तत्कालीन ब्रिटिश भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामधील २ हजार ६११ किमी लांब ड्युरांड लाईन या सीमारेषेलगत आहे.

अफगाणिस्तानला ही ड्युरंड लाईन मान्य नसल्यामुळे १९४७ साली पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यात हा सीमावाद सुरु आहे. पाकिस्तानातील इस्लामाबाद पर्यंतच्या भागावर अफगाणिस्तान दावा सांगत आलेले आहे. या भागातील अनेक पख्तुनी टोळ्यांना पाकिस्तानचा अंमल मान्य नाही आणि संपूर्ण खैबर पख्तुनवा प्रांत त्यांचा असल्याचा दावा त्या करतात.

त्यामुळे दोन्ही देशातला सीमावाद भडकू नये यासाठी पाकिस्तानमधील लष्करी हुकुमशहा किंवा लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सर्व सरकारांचा अफगाणिस्तानमध्ये आपल्या मर्जीतले सरकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असतो. विशेष म्हणजे सध्या अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानला पाकिस्ताननेच अल् कायदाच्या मदतीने जन्माला घातले होते. कट्टरपंथी तरुणांवर लक्ष केन्द्रित करणाऱ्या तालिबानच्या माध्यमातून दहशतवाद्यांची एक मोठी फौज उभारून तिचा वापर भारताला रक्तबंबाळ करण्यासाठी करावा, असा पाकिस्तानचा डाव होता.

भारत-अफगाणिस्तान सलोख्याचा इतिहास

भारत-अफगाणिस्तान यांच्यात ऐतिहासिक काळापासून अनोखे सांस्कृतिक संबंध चालत आलेले आहेत. अफगाणी लोकांसोबत भारतीयांचे भावनिक बंध जुळलेले आहेत. मध्यंतरी तालिबानच्या काळात उभय देशात दुरावा आला होता. परंतु प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि रशिया व अमेरिका यांच्या साठमारीमुळे सातत्याने अडचणीत येत असलेल्या अफगाणिस्तानला भारताने वेळोवेळी मदत केली आहे. २०२१ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर संपूर्ण जगाने या देशाकडे पाठ फिरवली होती. परिणामी, या देशातील नागरिकांवर उपासमारीचे संकट आले. त्यावेळी भारताने मानवतेच्या भूमिकेतून १० लाख टन गहू देऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. या सर्व बाबींची तालिबानला पूर्ण जाणीव आहे.

तालिबान सत्तेत आल्यावर थुई थुई नाचणाऱ्या पाकिस्तानला काश्मीर विजयाची स्वप्ने पडू लागली होती. आज मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली असून स्वतःचीच भूमी गमावण्याचा धोका पाकिस्तानला भेडसावत आहे. भारताच्या सावध व संयमी परराष्ट्र धोरणामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

अन्य लेख

संबंधित लेख