Tuesday, November 26, 2024

पंकजा मुंडे मुख्यमंत्री होणार? राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार?

Share

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर सर्वांचं लक्ष आता सरकार स्थापनेच्या प्रक्रियेवर केंद्रित झालं आहे. महायुती सरकारचा शपथविधी कधी होईल? नव्या मंत्रिमंडळात कोणते नेते सहभागी होतील? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल? यावर चोहोबाजूंनी चर्चा सुरू आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचा आग्रह कायम असून, दुसरीकडे दिल्लीतील भाजप नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिल्याचं बोललं जात आहे. याचदरम्यान, भाजपच्या एका महिला नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याची मागणीही पुढे आली आहे. जर भाजपने महिला नेत्याला मुख्यमंत्री बनवले, तर राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल.

“पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करा” – ओबीसी नेत्याची मागणी
ओबीसी आरक्षण बचाव समितीचे नेते मंगेश ससाणे यांनी भाजपकडे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली आहे. ससाणे म्हणाले, “ओबीसींना विरोध करणारा मुख्यमंत्री नको. मनोज जरांगे पाटलांचा मुद्दा ओबीसी समाजाने हाताळला आहे. महायुतीला निवडून आणण्यात ओबीसी समाजाचा निर्णायक वाटा आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीपद ओबीसी नेत्यालाच द्यावं.”

ससाणे यांनी पुढे छगन भुजबळ किंवा पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्रीपद देण्याची मागणी करत महायुतीने याचा गांभीर्याने विचार करण्याचं आवाहन केलं. “याकडे दुर्लक्ष झाल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला फटका बसू शकतो,” असा इशाराही त्यांनी दिला.

महायुतीच्या नेतृत्वावर आणि मुख्यमंत्रिपदाच्या निवडीवर ओबीसी समाजाचं महत्त्व अधोरेखित करत, या मागणीकडे भाजपने किती लक्ष द्यावं, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

अन्य लेख

संबंधित लेख