Saturday, May 25, 2024

निर्भिड, निःपक्ष मतदान हाच संविधानाचा आत्मा – देशातील अनेक भागात स्वयंस्फूर्त मतदान

Share

भारतीय लोकशाही ही समर्थ हातात सुरक्षित आहे. याच्या अनेक सकारात्मक घटना २०२४ मधील निवडणुकांमध्ये ठळकपणे पुढे आल्या. हिमाच्छादित प्रदेशापासून ते रणरणत्या वाळवंटापर्यंत आणि दुर्गम प्रदेशापासून ते शहरातील दाटीवाटीच्या भागापर्यंत सर्वत्र लोकशाही मजबूत करण्यासाठी स्वयंस्फूर्त मतदान होत आहे. त्यात नवीन मतदारांचा जसा सहभाग आहे, तसाच ज्येष्ठ नागरिकांचाही सहभाग आहे. भारतीय लोकशाहीची ताकद पुन्हा एकदा जगाला दाखवणारी ही २०२४ची लोकसभा निवडणूक आहे. या मतदानात कोणीही मागे राहता कामा नये.

जगातील सर्वांत मोठी लोकशाही देश असलेल्या भारतात सध्या मतदानाचा महोत्सव सुरू आहे. एखाद्या सण-समारंभात आपण कुटुंबासह एकत्र येतो, त्याच धर्तीवर मतदानाच्या निमित्ताने कुटुंबच्या कुटुंब मतदानासाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी ठळकपणे दिसत आहे. तेथे गरीब-श्रीमंत असा भेद नाही की उच्च-निच्च असा भाव नाही. तसेच, शहरी आणि ग्रामीण हे दोन्ही भागांमध्येही भेद नाही. भारतीय संविधानाने दिलेल्या समानता या तत्वाची प्रचीती आपल्याला या महोत्सवात दिसते. मतदानाच्या या अधिकाराचा प्रत्येक जण प्रभावी वापर करत असल्याचे आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पहायाला मिळत आहे. उंच हिमशिखरे असोत की वनवासी भागातील दुर्गम वाड्या-पाड्यांवरील मतदान केंद्र असो या प्रत्येक ठिकाणी मतदानाचा महोत्सव सुरू आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही अभूतपूर्व आहे.

ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह
आपल्या घरातील सणावाराला आपण ज्येष्ठ नागरिकांचे नमस्कार करून त्यांचे आवर्जून आशीर्वाद घेतो. या लोकशाहीच्या उत्सवातही ज्येष्ठांच्या सहभागाला यंदा निवडणूक आयोगाने अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रथमच या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. वय वर्षे ८५ पेक्षा जास्त वयाचे नागरिक आणि ४० टक्क्यांहून जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी पर्यायी मतदानाची सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. देशभरामध्ये ८५ वर्षाहून अधिक वयाचे ८१ लाख नागरिक आहेत. तर, ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्वाचे ९० लाख नागरिक आहेत. देशातील ९१ लाखपैकी ९५ टक्के ज्येष्ठ नागरिकांनी घरातून मतदान करण्यासाठी नावनोंदणी केली होती. या प्रकारे मतदान करण्यासाठी आलेल्या २३ हजार २४७ अर्जापैकी २१ हजार ६५१ मतदारांनी ८ मेपर्यंत घरातून किंवा पोस्टल मतदान केंद्रावरून मतदान केले आहे.

अवर्णनीय आनंद
पुणे लोकसभेच्या जागेसाठी सोमवारी मतदान झाले. त्यात ८८ वर्षीय लीला कृष्णमूर्ती भट यांनी घरी मतदान केले. “आपल्या मताला या लोकशाही देशात खरोखरचं मूल्य आहे,“ अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली. पुण्यातील प्रभात रस्त्यावर आपल्या घरात मतदानाचा हक्क बजावताना भट आजींच्या चेहऱ्यावर अवर्णनीय आनंद स्पष्ट दिसत होता. त्यांनी आपली मुलगी आणि जवळचे नातेवाइक यांना फोन करून निवडणूक आयोगाने घरी येऊन मतदान करून घेतल्याची माहिती दिली. भारतीय निवडणूक आयोगाच्या नवीन उपक्रमांतर्गत भट यांच्या घरी मतदान केंद्र उभारण्यात आले. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुण्यात १,६७५ ज्येष्ठ नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

गडचिरोलीतील नागरिकांचा दृढ विश्वास
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी मतदान यंत्रणा पोचविण्याचा उपक्रम राबविला जात असतानाच, दुसरीकडे गडचिरोलीसारख्या नक्षलवादी जिल्ह्यातील घटना भारतीय लोकशाहीवर येथील नागरिकांचा किती दृढ विश्वास आहे हे अधोरेखित करणारी आहे. या जिल्ह्यातील फुलमती बिनोद सरकार या १११ वर्षीय महिला खास मतदानासाठी दुचाकीवरून प्रवास करत मतदान केंद्रावर पोचली. मतदान केंद्रावरील सर्व औचपारिकता पूर्ण करून तिने तिचा मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोली जिल्ह्यात मुचेरा हा तालुका आहे. या दुर्गम भागातील गोविंदपूर गावातील ही घटना भारतीय लोकशाहीचा पाया कसा भक्कम होत आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून पुढे आले आहे. ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसाठी अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध असूनही मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा अधिकार बजावण्याचा निर्धार किती प्रबळ आहे हे अशा घटनांमधून दिसते. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापासून अशा घटना देशाच्या वेगवेगळ्या भागात घडत असल्याचे यातून समोर येते.

महाराष्ट्राच्या गडचीरोली जिल्ह्यातील या घटनेपाठोपाठच मिझोरममध्ये लाँगटलाई कॉलेज वेंग येथील रहिवासी असलेल्या पु थांगलियानहलुमा नावाच्या १०४ वर्षीय व्यक्तीचा निवडणुकीत भाग घेतल्याबद्दल सत्कार करण्यात आला. समाजातील सर्वात वृद्ध सदस्यांचे मत विचारात घेतले जाते आणि त्यांना देखील सहभागी होण्यासाठी स्वत:चे मत मांडण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. ही घटना भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याची जगाला ओळख करून देणारे आणखी एक उदाहरण आहे.

निवडणुकीतील चर्चेचा केंद्रबिंदू
प्रभू श्रीराम हे प्रत्येक हिंदूचे अढळ श्रद्धास्थान आहे. पाचशेहून अधिक वर्ष राम मंदिर उभारण्याचा संघर्ष सुरू होता. अशा राम मंदिराची उभारणी ही हिंदूंसाठी आत्मसन्मानाची अविस्मरणीय घटना ठरली. त्याचाही परिणाम मतदानावर झाला. “ज्यांनी माझ्या प्रभू श्रीरामाला परत मंदिरांत आणले त्यांना मी मतदान केले”, अशी शब्दात महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील फलटणमधील ९६ वर्षीय आजींनी मनोगत व्यक्त केले. हे मनोगत लोकशाहीवरील त्यांचा विश्वास दर्शवतात. तसेच श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचे कार्य झाल्यामुळे मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे कारण दर्शवतात. अशीच भावना नागरिकांनी विविध एक्स संदेशांमधून व्यक्त केली. ही फलटणसारख्या ग्रामीण भागातील घटना निवडणुकीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरली.

महाराष्ट्रातील फलटणासारखा ग्रामीण भाग असो, गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि दुर्गम भाग असो की, मिझोरामसारखे राज्य असो, या प्रत्येक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा मतदानाच्या प्रक्रियेतील उत्साह हा तरुणांना प्रेरणा देणारा ठरला. बस्तरमधील ही घटनादेखील याच शृंखलेचा एक अविभाज्य भाग आहे. बस्तरमधील ८६ वर्षीय निर्मला कलमाकर बिडवई या पक्षाघातातून नुकत्याच बऱ्या झाल्या होत्या. आजारपणाची काळजी घेत त्या व्हीलचेअरवर बसल्या आणि थेट मतदानकेंद्राचा रस्ता धरला. त्यांनी शारीरिक आव्हानांशी झुंजत मतदान करण्याचा निर्धार केला. त्यांचा देशातील लोकशाही प्रक्रियेवर असलेला उंदड विश्वास यातून दिसतो. लोकशाही सशक्त करण्याप्रती असलेल्या वचनबद्धतेचा हा ठोस पुरावा आहे.

काश्मीरमध्ये विकास हाच निवडणुकीचा मुद्दा
पुण्यासह महाराष्ट्रातील ११ जागांवर ज्या दिवशी (१३ मे) मतदान झाले, त्याच वेळी पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या जम्मू काश्मीर भागातील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. जम्मू आणि काश्मीरमध्ये २०१९ पर्यंत १४ टक्क्यांहून कमी मतदानाची नोंद होत होती. तेथील निवडणुकीमध्ये विचारधारा हाच मुद्दा असायचा. निवडणूक बहिष्कार हे ठरलेले अस्त्र होते. पण, आता काश्मीरचे वातावरण बदल आहे. त्याच प्रमाणे या वेळी प्रचाराचे मुद्दे बदलल्याचे जाणवते. रस्ते, वीज आणि पाणी या विकासाच्या मुद्यावर निवडणुकीत प्रचार होत असल्याचे दिसते. त्यामुळे देशातील लोकशाही ही फक्त विकसित भागातच मूळ धरत आहे, असे नाही तर, ती काश्मीर खोऱ्यापासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या विस्तृत भारतातच्या प्रत्येक गावा-गावात आणि पेठा-पेठांमध्ये दिसत आहे.

लोकशाहीचे हे मूल्य आणि भारताची ही लोकशाही अधिक परिपक्व होत आहे. नवीन तंत्रज्ञानाचे साहाय्य घेऊन मतदानाची ही प्रक्रिया अधिक पारदर्शी केली जात आहे.

प्रतिनिधी
(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)

अन्य लेख

संबंधित लेख