धादांत खोटी विधाने करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कधीच न केलेल्या मेट्रोचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न अजित पवार करीत आहेत. प्रत्येक पुणेकराला हे माहिती आहे की, मेट्रो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आणली आहे. रोज प्रवास करणाऱ्या दोन लाख प्रवाशांपैकी एकही जण असा नसेल की जो मेट्रोचे श्रेय देताना इतर कोणाचे नाव घेईल, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवार यांचे दावे खोडून काढले.
मुरलीधर मोहोळ यांनी पुणे मेट्रोतून प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला. त्या नंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, ‘‘दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर २००१ पासून पुण्यात मेट्रो आणण्याचे प्रयत्न २०१४ पर्यंत फक्त चर्चेच्याच पातळीवर राहिले. २००१ ते २०१४ या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आणि अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना मेट्रोचे काम इंचभरही पुढे गेले नाही. ते काम केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर झाले.” नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वावर अजित पवार यांचा विश्वास नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सन २०१४ नंतर केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रो प्रकल्पांना गती दिली. ३० सप्टेंबर २०१४ रोजी राज्य सरकारने पिंपरी ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या सुमारे १६ किलोमीटरच्या पहिल्या मेट्रोला मान्यता दिली. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या कामाचा प्रारंभ केला आणि ६ मार्च २०२२ रोजी पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला फेब्रुवारी २०१८ मध्ये मान्यता मिळून नोव्हेंबर २०१८ मध्ये पंतप्रधान मोदींनी कामाचा प्रारंभ केला. मात्र, राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीने याकडे दुर्लक्ष झाले. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर गती मिळालेला हा प्रकल्प आता पूर्णत्वास जात आहे, अशीही माहिती मोहोळ यांनी दिली.
मेट्रो मार्गाचा विस्तार
– स्वारगेट – कात्रज, वनाज – चांदणी चौक, रामवाडी – वाघोली, पीसीएमसी – भक्ती शक्ती हे मेट्रो मार्ग प्रगतीपथावर आहेत.
– खडकवासला – खराडी, नळ स्टॉप – वारजे – माणिक बाग या मेट्रोमार्गांना मंजुरी देण्यात आली आहे.
– हडपसर – लोणी काळभोर, हडपसर – सासवड रस्ता मार्गिका प्रस्तावित आहे.
पुणे मेट्रोला खऱ्या अर्थाने फक्त भारतीय जनता पक्षानेच गती दिली. सध्या ३१ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गावर मेट्रो सेवा उपलब्ध असून मेट्रोतून दररोज दोन लाख पुणेकर प्रवास करतात. या प्रवाशांना विचारले तर ते निर्विवादपणे मोदी यांनीच मेट्रो सुरू केल्याचे सांगतील. खोटे बोलून पुणेकरांची दिशाभूल करण्यापेक्षा मेट्रो प्रकल्पातील काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग अजित पवार यांनी दाखवून द्यावा. निवडणुकीत सांगण्यासारखे काहीच नसल्याने अजित पवार निराधार विधाने करीत आहेत.
-मुरलीधर मोहोळ
केंद्रीय राज्यमंत्री