थॅलेसेमिया (Thalassemia) या रक्ताच्या गंभीर आजारावर रुग्णांचे उपचार व्यवस्थापन, वाहक शोध आणि समाजप्रबोधन या त्रिसूत्रीवर काम करण्यासाठी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’ आणि ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’ यांच्या वतीने संयुक्त प्रयत्न केले जाणार असून त्याचा प्रारंभ पुण्यातून (Pune) करण्यात आला.
पुण्यातील ‘सेवा भवन’ येथे जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून या उपक्रमासंबंधीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भय्याजी जोशी, ‘जनकल्याण समिती‘चे अध्यक्ष डॉ. अजित मराठे, ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’चे अध्यक्ष डॉ. दिलीप वाणी आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रे यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती. थॅलेसेमिया या समस्येच्या संदर्भात काम करणारी रक्त केंद्र आणि सामाजिक संस्थांना एकत्र आणून त्यांच्या कार्याचे सुसूत्रिकरण ‘जनकल्याण समिती’ आणि ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’ यांच्यातर्फे केले जाणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील १८ जिल्ह्यांतील २४ सामाजिक संस्थांचे तसेच १५ रक्त केंद्रांचे प्रतिनिधी कार्यशाळेत उपस्थित होते.
जेव्हा सामूहिक व प्रभावी प्रयत्न होतात तेव्हा वैद्यक क्षेत्रासमोर येणाऱ्या नित्य नवीन आव्हानांवर मात करता येते, असे पूर्वीचा इतिहास सांगतो. अशाच पद्धतीचे प्रयत्न सर्वांनी मिळून आणि सर्वंकष पद्धतीने आपण केले तर आपण याही आव्हानावर मात करून थॅलेसेमिया मुक्त समाजाच्या दिशेने वाटचाल करू शकतो, असा विश्वास भय्याजी जोशी यांनी यावेळी व्यक्त केला.
रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी या समस्येच्या वेगवेगळ्या अंगांचा विचार प्रतिनिधींसमोर मांडला. डॉ. चिन्मय उमरजी यांनी आजाराची शास्त्रीय माहिती आणि सध्याचे प्रचलित व्यवस्थापन याची माहिती दिली. थॅलेसेमिया सोसायटी पुण्याच्या अध्यक्ष डॉ. नीता मुन्शी आणि राज्य रक्त संक्रमण परिषद, सहाय्यक संचालक, डॉ. महेंद्र केंद्रे यांनी थॅलेसेमिया आजार आणि त्याच्याशी सामना करण्यासाठी आवश्यक प्रयत्न या विषयावर मार्गदर्शन केले.
थॅलेसेमिया रुग्णांचे व्यवस्थापन या विषयावर संभाजीनगरच्या डॉ. मंजुषा कुलकर्णी आणि डॉ. लिझा बलसारा यांनी, थॅलेसेमिया मुक्त समाजासाठी थॅलेसेमिया तपासणी या विषयावर डॉ. अतुल कुलकर्णी आणि डॉ. अमर सातपुते यांनी तसेच थॅलेसेमिया विषयाचे व्यापक समाज प्रबोधन या विषयावर प्रदीप पराडकर आणि डॉ. आशुतोष काळे यांनी चर्चा समन्वयन केले. ‘जनकल्याण रक्त केंद्र साखळी’चे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनी पुढील वाटचालीची माहिती श्रोत्यांसमोर ठेवली. जनकल्याण रक्तपेढीच्या प्रारंभापासून मार्गदर्शक असलेले जेष्ठ कार्यकर्ते डॉ. दिलीप वाणी यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेत सर्वंकष विचार
थॅलेसेमिया हा रक्ताचा एक अनुवांशिक आणि अतिशय गंभीर आजार आहे. वाहक पती-पत्नी एकत्र आले तर मुलांना हा आजार होतो. या आजारावर आज किफायतशीर उपचार नसल्यामुळे ठराविक कालावधीनंतर वारंवार त्यांना रक्त द्यावे लागते. या आजाराबाबतचा सर्वंकष विचार कार्यशाळेत करण्यात आला. या आजाराच्या संदर्भात वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या विविध संस्थांचा सत्कारही कार्यशाळेत करण्यात आला.
कार्यशाळेतून काय साध्य झाले… |
थॅलेसेमिया आजाराबाबत अनेक दशके काम करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती |
अभ्यासक, तज्ज्ञ, कार्यकर्ते अशा सर्वांना कार्यशाळेतून संघटित शक्तीचा प्रत्यय |
सगळे मिळून सर्वंकष प्रयत्न करू शकतो, हे लक्षात आले |
थॅलेसेमियाच्या आव्हानावर मात करू शकतो, असा विश्वास मिळाला |