Friday, September 13, 2024

प्रभू रामचंद्र भारत वर्षासाठी राष्ट्रपुरुष

Share

प्रभू रामचंद्रांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा सकारात्मक आहे. कुणाच्या द्वेषासाठी नाही. सामान्य माणसाला जबाबदार क्रियाशील व्यक्ती बनवण्यासाठी आहे. कर्तव्यावर आधारित आहे तो हक्कावर आधारित नाही आणि म्हणूनच वैश्विक शांतीसाठी आहे.

सततचा संघर्ष करून हिंदू समाजाने रामजन्म स्थळावर अखेर भव्य राम मंदिर उभे केले. हा संघर्ष हिंदू समाजाने कधी राजे आणि त्यांच्या सैन्याच्या मदतीने, कधी अनाम साधु संतांच्या मदतीने, कधी जन सामान्यांनी आणि सर्वात शेवटी राष्ट्रव्यापी हिंदू संघटन उभे करून, सर्व देशभर जनजागरण करून, एकसमयावच्छते कृती करून, संपूर्ण देशाची शक्ती व रामाप्रति भक्ती जोडून देशभर शिव तांडव केले व कायम स्वरुपी अपमान खुणा पुसून राम मंदिर उभे केले. हा संघर्ष संपूर्ण विश्वाला चिंतन करायला लावून गेला. हिंदू समाजाची नव्याने ओळख सर्व जगाला झाली.

हे सर्व झाले, भव्य मंदीर उभे राहिले, देशाचे पंतप्रधान, कोणत्याही वेडगळ वैचारिक गोंधळाला बळी न पडता स्वतः या राष्ट्रीय महोत्सवात सम्मिलीत झाले. जगभराने हिंदू शक्ती भक्ती, मूर्तिपूजकांशी तन्मयता, भावुकता व भक्तीभाव अनुभवला. धर्म हा जोडणारा घटक आहे हेही जगाने अनुभवले.

Ram Mandir

या अशा रोमांचक अनुभवातून या प्रभू रामचंद्रांनी राष्ट्र उभारणीसाठी जी मेहनत घेतली होती व एकसंघ राष्ट्र उभे केले होते त्याचाही मागोवा घेणे गरजेचे आहे. भारत हा कधीच फक्त ऐहिक देश नव्हता, तर हे कायम सांस्कृतिक राष्ट्रच होते व आहे आणि याचे सर्वोत्तम उदाहरण स्वयं प्रभु रामचंद्र होत. ज्यावेळी लंका विजय झाला त्यावेळी त्या सुवर्ण सुंदरी लंकेला पाहून मोहित झालेल्या लक्ष्मणाला राष्ट्रीयत्वाची पहिली दीक्षा प्रभू रामचंद्रांनी दहा हजार वर्षांपूर्वी दिली व आजही तोच संस्कार भारतीय राष्ट्र जीवन घडतो.

अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते
जननीजन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसि

सांस्कृतिक भारत उभा राहिला
म्हणून प्रभू रामचंद्र या भारत वर्षाचे फक्त देवच नाहीत तर राष्ट्र पुरुषही आहेत. रावणाशी युद्ध करत सीतामाईंची सुटका करणे एवढेच कार्य असूनही त्यांनी चौदा वर्षे उत्तर – दक्षिण भारत संघटन करत, छोटे छोटे वनवासी, ग्रामवासी, होड्या वल्हवणारे निषाद, गिरीवासी, वानरांपर्यंत सर्वांना भेटून, जोडून या राष्ट्रीय कार्यात संम्मिलीत करून घेतले आणि फक्त भाषणांनी नाही तर कृतिशील वर्तनाने जोडून घेतले. मग ती कृती सुग्रीवासाठी युद्ध असेल किंवा शबरीच्या प्रेमाचा स्वीकार असेल, साधुसंतांचे आशीर्वाद असतील. त्यांनी हे सर्व चौदा वर्षे केले, समाजात स्त्रीच्या स्थानाचे गांभीर्य अधोरेखित केले, सामान्यांना कार्यप्रवण केले, मूल्यरोपण केली, लोकसत्ताकचा अर्थ समजावून दिला. असे राष्ट्रीय नेते प्रभु रामचंद्र व त्यांनी राष्ट्र उभारणीसाठी केलेले संस्कार ह्यातून सांस्कृतिक भारत उभा राहिला व सतत प्रेरणा घेत राहिला.

आणि आज सदेह अस्तित्वात नसताना सुद्धा स्वतःचे मंदीर संपूर्ण हिंदू समाजाला जागृत करून, संघटित करून, क्रियाशील करून त्यांनी बनवून घेतले. संपूर्ण देशाला एकात्मतेचा अनुभव दिला. प्राण प्रतिष्ठेच्या क्षणी सर्व हिंदू फक्त अयोध्येकडे डोळे लावून बसले होते. सर्व देश एक झाला होता. नव्हे विश्वातील सर्व हिंदू धार्मिक भावनेने लीन झाला होता.

म्हणून प्रभू रामचंद्र देव आहेतच पण भारतासाठी ते राष्ट्र पुरुष आहेत. दक्षिणेतील स्वतः ला अहिंदू मानणाऱ्या पक्षाच्या नाकावर टिच्चून दक्षिण भारतीय रामेश्वरम् हून तीर्थोदक घेऊन आयोध्येत आले. सर्व दक्षिण भारत लोटला. पूर्वांचल पोहचले. सर्व पश्चिम भारत आला. पण जे आले नाहीत ते सर्व देशभर एकाच वेळी रामभक्तीत लीन झाले होते. सर्व देश कृतिशील भक्तीत रमून गेला. सुदूर पश्चिम जमेल त्या मंदीरात जमून रामभक्ति करत होती. जगभरातील हिंदू समाजाची सांस्कृतिक माता आज आनंद साजरा करीत होती म्हणून परदेशी वसलेला पुत्रवत हिंदू समाज पुलकित झाला होता. हे महात्म्य आहे राष्ट्राच्या सांस्कृतिक संकल्पनेचे व त्या संकल्पनेचे मूर्त रूप असलेल्या प्रभू रामचंद्रांचे.

पण ही वीण अजून बळकट करण्याची आवश्यकता आहे. शत्रू आजही सांस्कृतिक राष्ट्रवाद नष्ट केला पाहिजे अशा प्रयत्नात आहे. या वर्गासमोर पहिले, दुसरे महायुद्ध व त्याचे विकृत स्वरूप आहे. त्यामुळे विश्वभरातील एक विचार विश्व सांस्कृतिक राष्ट्रवादही नाकारते व क्रूरपणे सांस्कृतिक राष्ट्रवाद या संकल्पनेचा द्वेष करते. अशा वेळी मर्यादा पुरूषोत्तम राम ज्या भारताचे सांस्कृतिक राष्ट्र पुरुष आहेत, त्यांचे त्यागमय जीवन, त्यांनी सकारात्मक भावनेने रूजवलेली राष्ट्रीय भावना, व सामान्य माणसाला दिलेला कार्यप्रवण होण्याचा संदेश हा सर्व भारतीयांपर्यंत पोहचवून सर्व जगाला उदाहरण म्हणून दाखवावे लागेल.

प्रभू रामचंद्रांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा सकारात्मक आहे. कुणाच्या द्वेषासाठी नाही. सामान्य माणसाला जबाबदार क्रियाशील व्यक्ती बनवण्यासाठी आहे. कर्तव्यावर आधारित आहे न की हक्कावर आणि म्हणूनच वैश्विक शांतीसाठी आहे.

रामपथावरील प्रवास हा विश्वाला करोना लस पुरवतो, योगाचे ज्ञान वाटतो, अडचणीतील सर्वांना दहशतीमधून बाहेर काढतो, शिक्षकाच्या भूमिकेत वावरतो न की वसाहतवादी भक्षकाच्या भूमिकेत. ही प्रभू रामचंद्रांनी सांगितलेली राष्ट्र भूमिका समजून घेऊ, आचरणात आणू व प्रभू रामचंद्र ह्यांनी सांगितलेला राष्ट्र मार्ग जगाला सिद्ध करून दाखवू या.

सुनील देशपांडे
(लेखक स्तंभलेखक आणि ब्लॉगर आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख