Tuesday, December 2, 2025

राममंदिर झाले, आता राष्ट्रमंदिराची उभारणी – डॉ. मोहन भागवत

Share

विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराम मंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदित्य प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात सरसंघचालक बोलत होते. यावेळी कांचीकामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी, आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर अभ्यंकर, अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते. 

आपल्याच समाजाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उपकाराची अथवा अहंकाराची भावना नाही, असे मत कृतज्ञता पुरस्कार स्वीकारताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “संघाला संपूर्ण समाजाचे संघटन अभिप्रेत आहे. कारण समाज संघटित झाला तरच राष्ट्र वैभवसंपन्न होईल. राष्ट्र बलसंपन्न झाले तरच विश्वाला सुखशांती लाभेल. यातही देशाचे कल्याण संघच करेल, अशी आमची वल्गना नाही. तर समाज उभा राहिला तरच देश उभा राहील.” कठीण काळामध्ये समाजानेच संघाला साथ दिली, म्हणून संघ मोठा झाल्याचेही सरसंघचालक डॉ.मोहन भागवत म्हणाले.

यावेळी शंकर अभ्यंकर म्हणाले, “आक्रमणांमुळे जगातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या. मात्र संपूर्ण वसुंधरेलाच कुटुंब मानणारी भारताची हिंदू संस्कृती आजही टिकून आहे. भौतिक आक्रमणांबरोबरच आंतरिक आक्रमणही भारतावर झाले. ब्रिटिशांनी भारताचा ‘स्व’ मोडण्याचा प्रयत्न केला.

” भारताची सनातन संस्कृती ही विश्वकल्याणासाठी मानवतेला मार्गदर्शक असून, हिंदू संस्कृतीच सर्वांचा स्वीकार करते, असे मत यावेळी  शंकराचार्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, “अनेक भाषा, परंपरा, प्रांत असतानाही भारतात आधुनिक लोकशाही यशस्वी झाली आहे. कारण प्रजातंत्र हा सनातन धर्माचा भावच आहे. आज लोकशाहीला सामर्थ्यशाली करण्याची गरज असून, चांगल्या लोकांना बळ दिले पाहिजे.” 

कार्यक्रमात वैश्विक संत भारती महाविष्णू मंदिराच्या कोनशिलेचे अनावरण, ‘भारतीय उपासना‘ या विश्वकोष खंडाच्या तिसऱ्या आवृत्तीचे आणि जितेंद्र अभ्यंकर कृत ‘पंढरीश’ या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. 

कार्यक्रमाची सुरुवात रामायणावर आधारित ‘निरंतर’ या संगीत नाटिकेने झाली. सूत्रसंचालन डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले. जितेंद्र अभ्यंकर यांनी संपूर्ण ‘वंदे मातरम’ सादर केले.

स्वयंसेवकांनी प्राण ओतून संघ उभा केला – सरसंघचालक
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, रक्ताचे पाणी करत स्वतः बीज बनत, संपूर्ण आयुष्य मातीत मिसळून संघाचा वटवृक्ष उभे करणारे डॉ. हेडगेवार, राष्ट्रासाठी आपले जीवन ओवाळून टाकणारे प्रचारक, ग्रामीण व दुर्गम भागात जीव धोक्यात टाकून कार्य करणारे गृहस्थी कार्यकर्ते आणि अक्षरशः प्राण ओतून संघ उभा करणाऱ्या स्वयंसेवकांप्रती ही कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असे मत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. पराकोटीचे हाल, उपेक्षा सोसूनही स्वयंसेवक हसतमुखाने कार्य करतो. विश्वकल्याणाची भावना असलेल्या या संघशक्तीतून समाजाला कधीही उपद्रव होणार नाही, असेही सरसंघचालक म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख