गाबा कसोटी संपल्यानंतर रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित (Ravichandran Ashwin Announces Retirement From International Cricket) केली आहे. अश्विनने आजचा दिवस म्हणजेच भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू म्हणून माझा शेवटचा दिवस असल्याचे सांगत सर्वांना धक्का दिला आहे. गाबा कसोटी दरम्यान पावसामुळे सामना थांबला होता, तेव्हा तो विराट कोहलीबरोबर बोलताना भावुक झाला होता. विराटने त्याला मिठी मारून सांत्वन केले होते. हा क्षण व्हायरल झाल्यानंतर अश्विनच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या आणि मग सामना संपल्यावर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
भारताचा हा उजवा हाताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने पत्रकार परिषदेत आपली निवृत्ती जाहीर केली आहे. त्याची कसोटी कारकीर्द भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकीपटूंपैकी एक म्हणून नोंदवली गेली आहे.
या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अश्विनला फक्त एकच कसोटी खेळायला मिळाली आहे. अॅडलेडनंतर त्याला गाबा कसोटीच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. सामना संपल्यानंतर तो टीम इंडियाच्या खेळाडूंना मिठी मारताना दिसला, विशेषत: कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला. त्याने मुख्य प्रशिक्षक गंभीर यांच्याशीही चर्चा केली आणि नंतर पत्रकार परिषदेत आपल्या निवृत्तीची घोषणा केली.
रविचंद्रन अश्विनने आपल्या कसोटी कारकीर्दीत १०६ सामन्यात ५३७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ३७ वेळा पाच विकेट्स घेतल्या आहेत आणि ८ वेळा सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या वनडे कारकीर्दीत १५६ विकेट्स आहेत, तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ७२ विकेट्स मिळवल्या आहेत. त्याने एकूण ७६५ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाज म्हणूनही त्याने आपला ठसा उमटवला आहे, कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३५०३ धावा केल्या आहेत आणि ६ शतकं झळकावली आहेत.