शुक्रवार १ मे २०२६ रोजी मराठी, हिंदी आणि तेलुगु मध्ये प्रदर्शित होणारा रितेश देशमुख यांच्या “राजा शिवाजी” चित्रपटाचा अधिकृत टीजर प्रसारित झाला आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अक्षरशः रितेश देशमुखची प्रचंड खिल्ली उडवायला सुरुवात झाली.
एरवी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या एकेरी उल्लेखावरून जगाला शहाणपणा शिकवणाऱ्या ब्रिगेड्यांना रितेश देशमुखच्या चित्रपटाच्या “राजा शिवाजी” या नावातील एकेरी उल्लेख कसा काय खटकला नाही? असा रोकडा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे तर रितेश देशमुख तिरळा असल्यामुळे त्याने महाराजांची भूमिका करायला नको हवी होती असाच बहुतांशी नेटकऱ्यांचा सूर आहे.
आपल्या अभिनयाने कलाकार हा प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडत असतो. उदाहरणार्थ, एकेकाळी मराठी चित्रपट सृष्टीत भगवान श्रीकृष्ण म्हटले की, शाहू मोडक आणि हिंदी चित्रपट सृष्टीत नारद म्हटले की, जीवन (ओंकारनाथ धर) हेच प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर येत. तसेच आजपर्यंत रितेश देशमुखने जे सगळे हिंदी चित्रपट (मालामाल विकली, हे बेबी, बँक चोर) आणि चित्रपट मालिका (धमाल, हाउसफुल, मस्ती) केल्या आहेत. त्याच्यातल्या विनोदी पात्रांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांमध्ये त्याची प्रतिमा एक विनोदी अभिनेता तर काही चित्रपट व चित्रपट मालिकांमधील अश्लील संवादांमुळे ती प्रतिमा काळवंडून एक टुकार अभिनेता अशीच उभी राहिली आहे. मुळात तो अभिनेता नाहीच मुख्यमंत्री असलेल्या वडिलांच्या राजकीय पुण्याईवर त्याला हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळाले ही वस्तुस्थिती आहे. सत्ता वर्तुळातील कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे रितेश देशमुखला प्रेक्षक नाईलाजाने अभिनेता किंवा कलाकार म्हणतात हे कटू सत्य आहे.
रितेश देशमुख हे नाव उच्चारले की डोळ्यासमोर येतात ते पांचट विनोद आणि भिकार अभिनय आणि अशा टुकार कलाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारावी हे मान्य करायला प्रेक्षकांचे मन तयारच होत नाहीये. सोशल मीडियावरील त्याच्या टीझरवरच्या प्रतिक्रियांमधून ही बाब ठळकपणे जाणवते.
अभिनयाच्या बाबतीत तर… तो महाराजांचा मावळा सुद्धा शोभत नाही…
अनेक वर्षे हिंदी सिनेमांमध्ये ‘कॉमेडी’च्या नावाखाली बायकी झगे, लिपस्टिक आणि विग घालून सोंगाड्याची भूमिका करणाऱ्या रितेश देशमुखला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत बघणं कठीण आहे. याच्यापेक्षा Bigg Boss बरा असे म्हणून सोशल मीडियावर रितेश देशमुखची टर उडवली जाते आहे. अनेक नेटकरऱ्यांनी शरद केळकर यांना ही भूमिका द्यायला हवी होती असे सुचवले आहे. अन्यही काही कलाकारांची नावे पुढे आली आहेत मात्र एका मुद्द्यावर सगळ्यांचे एकमत आहे पुचाट रितेश देशमुख नको. आमच्याच्याने हा चित्रपट बघवणार नाही. लहानपणी गल्लीत क्रिकेट खेळताना जो मित्र बॅट, बॉल आणि स्टंप आणायचा तो पहिली बॅटिंग घ्यायचा हा एक अलिखित नियम होता. अगदी त्याच नियमानुसार “राजा शिवाजी” या चित्रपटाचा निर्माता लेखक व दिग्दर्शक स्वतः रितेश देशमुख असल्यामुळे शिवरायांची भूमिका देखील त्यानेच केली असावी.
मात्र त्यामुळे विकिपीडियाची माहिती खरी मानली तर चित्रपटाच्या निर्मितीसाठी खर्च केलेले १०० कोटी रुपये अक्षरशः औरंगजेबाच्या साम्राज्यासारखे धुळीला मिळाले आहेत. यामुळे रितेश देशमुख यांचा “राजा शिवाजी” चित्रपट दणकून आपटणार याची चाहूल लागली आहे.
निधर्मी छत्रपती दाखवण्यासाठी १०० कोटी?

चित्रपटाचे लेखक देखील स्वतः रितेश देशमुख असल्यामुळे चित्रपटात लिहिल्या गेलेल्या कथानकातील विरोधाभासाची जबाबदारी देखील त्यांच्यावरच येते. टीझरमध्ये किमान तीन चार वेळा “स्वराज्य” हा शब्द आला आहे. मात्र एकदाही हिंदवी स्वराज्य हा शब्द शिवरायांच्या तोंडी नाही.
विशेषतः शेवटच्या प्रसंगी अफझल खान (संजय दत्त) छत्रपतींना विचारतो, “तुम्हारे जहन में क्या है?” त्यावेळी प्रेक्षक कानात प्राण आणून “हिंदवी स्वराज्य” ऐकण्यासाठी आसुसलेले असतात. मात्र रितेश देशमुख यांचे छत्रपती अफझल खानाला सांगतात, “स्वराज्य”. रितेश देशमुख इतिहासाशी प्रतारणा करत आहे. कदाचित आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काँग्रेसची असल्यामुळे महाराजांना ते निधर्मी दाखवण्याचा इमानेइतबारे प्रयत्न करत आहेत. छत्रपतींचा आणि हिंदुत्वाचा कोणताही संबंध नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सेक्युलर होते. हे हिंदी चित्रपट सृष्टीप्रमाणेच मराठी चित्रपट सृष्टीतदेखील दाखवण्याचा केविलवाणा प्रयोग त्यांनी केला आहे.
तर मग छत्रपती स्वतःला “गो ब्राह्मण प्रतिपालक” म्हणवून घेत. कुलीखान होऊन ८ वर्षे दिवसातून ५ वेळा नमाज पडत. औरंगजेबाची चाकरी केलेल्या नेतोजी पालकर यांची महाराजांनी घरवापसी करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात गोहत्या बंदी होती (किंबहुना गोहत्या करण्याची कोणाची हिंमत नव्हती). महाराजांनी त्यांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान (१६७७) तामिळनाडूतील तिरुवण्णामलाई शोणाचलापती मंदिर आणि समुत्तीर पेरुमाल मंदिर या दोन मंदिराच्या जागी मुस्लिम आक्रमकांनी उभ्या केलेल्या मशिदी पाडून या मंदिरांचे पुनर्निर्माण केले. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्यांनी १००० गाई मंदिरांच्या मंडपात आणल्या होत्या. या मंदिरांमध्ये दीपोत्सव सुरू केला. छत्रपतींचे ज्वलंत हिंदुत्व सांगणारा हा सगळा इतिहास खोटा आहे. का?
हो… रितेश देशमुख यांच्या मते हा सगळा इतिहास खोटा आहे. महाराज निधर्मी (सेक्युलर) होते. हे दाखवण्याची केविलवाणी धडपड करताना त्यांनी आपले १०० कोटी रुपये पणाला लावले आहे. त्याची माती होणार हे उघड आहे. कारण ब्रिगेडी इतिहासाची पुस्तके वाचून लिहिलेले कथानक महाराष्ट्राची जनता कधीच स्वीकारणार नाही. आणि जर ब्रिगेडी इतिहासावर रितेश देशमुख यांना चित्रपट काढायचाच होता तर तो त्यांनी धुरंदर २ प्रदर्शित होण्यापूर्वी काढायला हवा होता.
हा चित्रपट मुळात मराठीत बनवला आहे त्यानंतर तो हिंदी व तेलगूमध्ये डब करण्यात आला आहे त्यामुळे हा चित्रपट मराठी आहे आणि त्या चित्रपटात रितेश देशमुख यांनी इतिहासाच्या अशा चिंधड्या उडवाव्यात हे लांछनास्पद देखील आहे आणि संतापजनक देखील आहे. याची जबर आर्थिक किंमत त्यांना मोजावी लागणार आहे.
सत्याचा आणि इतिहासाचा आपलाप करून यापुढे कोणताही ऐतिहासिक अथवा सामाजिक चित्रपट प्रेक्षक स्वीकारणार नाही हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. धुरंदर २ ने हिंदी चित्रपट सृष्टीचे सगळे नियम आणि मानदंडच बदलून टाकले आहेत. यापुढे सत्याचा अंश नसलेला आणि भाकडकथांवर आधारित कोणताही ऐतिहासिक अथवा सामाजिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणार नाही हे सूर्यप्रकाशा एव्हढे स्वच्छ आहे.
शिवरायांना हिंदूरक्षक राजा किंवा त्यांची हिंदुपदपादशाही दाखविण्यासाठी वरील सर्व प्रसंग चित्रपटात दाखवायला हवे होते असे कोणाचेच म्हणणे नाही. परंतु “हिंदवी” शब्द जाणूनबुजून गाळण्याचे धाडस रितेश देशमुख यांनी केले आहे. ते मात्र त्यांच्या भयंकर अंगाशी येणार आहे. चित्रपटाचा खर्च तरी निघेल की नाही अशी शंका वाटते.

या चित्रपटात संजय दत्त यांनी साकारलेला अफझलखान नेटकऱ्यांच्या फारसा पसंतीला पडलेला दिसत नाही. संजय दत्तने अफजलखानाची भूमिका हिंदी चित्रपट सृष्टीतील नेहमीचा खलनायक संजय दत्त म्हणूनच केली आहे. तीच बोलण्याची लकब, तेच हावभाव, तीच चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स… सगळे एकसुरी (monotonous) अशी प्रचंड ना पसंती नेटकऱ्यांनी दाखवली आहे.

केवळ आपल्या वैयक्तिक मैत्री खातर अभिनयाचा कोणताही गुण नसलेल्या रिकामटेकड्या फरदीन खान याला रितेश देशमुखने आपल्या चित्रपटात काम दिल्याचे सोशल मीडियाचे म्हणणे आहे.

महाराजांच्या पत्नीच्या म्हणजे सईबाईंच्या भूमिकेत जेनेलिया देशमुख अजिबात शोभत नाहीत. याविषयी देखील नेटकऱ्यांची प्रचंड नाराजी आहे. आधी नागराज मंजुळे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. मात्र त्यांचे कुठेतरी बिनसले. कदाचित ते “हिंदवी” आहे या शब्दावरून असेल किंवा पात्रांच्या भूमिकेवरून असेल किंवा दोन्हीवरूनही असेल. काय असेल ते असेल पण नागराज मंजुळे यांनी काढता पाय घेतल्यावर दिग्दर्शक देखील स्वतः रितेश देशमुखच झाले. आणि अगदी पद्धतशीरपणे त्याने १०० कोटींच्या सबंध चित्रपटाची माती करून टाकली. रितेश देशमुखचा (सेक्युलर) “राजा शिवाजी” चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटायचाच. असा चंगच जणू सोशल मीडियाने बांधला आहे.