Saturday, September 7, 2024

रोहित वेमुला आणि डाव्यांचे कारस्थान

Share

तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला प्रकरणात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केल्यामुळे काँग्रेसची अभूतपूर्व अडचण झाली आहे. काँग्रेसपेक्षा डाव्या मंडळींना बसलेली ही एक सणसणीत चपराक आहे. राजकीय स्वार्थासाठी `leftist gang’ किती नीच थराला जाऊ शकते, याचे जीवंत उदाहरण म्हणजे रोहित वेमुला प्रकरण. एखाद्या घटनेचा वापर करून देशामधे अंदाधुंद आणि अराजकता माजविण्याचा डाव्या मंडळींचा नेहमीचा अजेंडा असतो. रोहित वेमुला प्रकरणामुळे डाव्यांची देशविघातक भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

काँग्रेस पक्ष सध्या सर्वच गोष्टी बाहेरून आयात करतो. एके काळी काँग्रेसमध्ये बुद्धिवंत नेत्यांना सन्मान मिळत होता. आज काँग्रेसकडे असा एकही बुद्धिमान नेता नाही. परिणामी काँग्रेसला `intellectual inputs’ साठी भाडोत्री माणसे नेमावी लागतात. ही भाडोत्री माणसे पुरविण्याचे कंत्राट डाव्या मंडळींना देण्यात आले आहे. यामुळे एक विचित्र समीकरण तयार झाले आहे आणि काँग्रेस – कम्युनिस्ट यांच्यामधील सीमा कधीच विरून गेली आहे. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावर कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. रोहित वेमुला प्रकरणात काँग्रेस आणि कम्युनिस्ट या दोघांनीही एकत्रपणे देशभर रान उठविले होते. परंतु दोघेही आता चांगलेच तोंडावर आपटले आहेत.

आठ वर्षांपूर्वी रोहितने आत्महत्या केली. रोहित हा हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी. त्याने  १७ जानेवारी  २०१६ रोजी आपल्याच खोलीमध्ये आत्महत्या करताना एक चिठ्ठी ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये `माझा जन्म हा एक घातक  अपघात आहे’ असे म्हटले होते. रोहित विद्यापिठात डॉक्टरेट करीत होता आणि आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशनच कार्यकर्ता होता. २०१५ पासून विद्यापीठाने रोहितचे विद्यावेतन थांबविले होते. रोहितचा आरोप होता की, त्याचे विद्यावेतन जातीमुळे थांबविले होते. विद्यापीठ प्रशासानचा असा खुलासा होता की, हा उशीर प्रशासकीय कारणांमुळे होत होता. प्रशासन आणि रोहित यांच्यात वाद सुरू असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली. तक्रारीनानतार या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी झाली आणि त्यामध्ये रोहितला निर्दोष जाहीर करण्यात आले.  

परंतु या विषयामुळे विद्यापीठात तणाव निर्माण आला. विद्यार्थी परिषदेकडून विद्यापीठाच्या आवारात आक्षेपार्ह घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आला. काही अराष्ट्रीय आणि विभाजनवादी शक्ती कार्यरत असल्याचाही आरोप करण्यात आला होता. या आरोपांची नव्याने चौकशी झाली आणि पाच विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले. याच ठिकाणी वादाची खरी ठिणगी पडली. विद्यार्थी उपोषणाला बसले आणि आंदोलन सुरू झाले.      

रोहित प्रकरणाची ही पार्श्वभूमी आहे. या आंदोलनाने पुढे गंभीर वळण घेतले. तिकडे दिल्लीमध्ये जेएनयूच्या आवारात याच काळात कम्युनिस्टप्रणीत विद्यार्थी संघटनांचे (टूकडे टुकडे गॅंग) आंदोलन सुरू होते आणि देशभर त्याला पद्धतशीर हवा देण्यात येत होती. देशभर जेएनयू आंदोलनावरून काँग्रेस आणि डाव्या संघटनांनी रान उठविण्यास प्रारंभ केला होता. रोहित प्रकरणावरून सुरू झालेले आंदोलन जेएनयू आंदोलनाचाच एक भाग असल्याचा संशय येऊ लागला होता. जेएनयू आंदोलनासारखीच रोहितच्या आंदोलनाला पद्धतशीरपणे हवा देण्यात आली. पुढे जानेवारी २०१६ मधे रोहितने आत्महत्या केली आणि या विषयाने गंभीर वळण घेतले.
रोहितची आत्महत्या निखालसपणे एक गंभीर घटना होती. देशातील कोणत्याही युवकाने अशी आत्महत्या करणे खचितच चिंताजनक आहे. मात्र या घटनेतून झालेले राजकारण चिंताजनक आहे. डावी मंडळी आणि 

काँग्रेस पक्ष यांनी रोहितच्या घटनेचा वापर करीत देशभर तरुण वर्गाला भडकविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनात जातिवादाचे विष पेरले. मोदी सरकार अडचणीत यावे म्हणून अनेक अथक प्रयत्न केले. संसदेचे कामकाज काही काळ ठप्प करण्यात आले. स्मृती इराणी आणि बंडारु दत्तात्रय या मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले.
आता क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टींमुळे या प्रकरणाला डाव्यांनी पद्धतशीर आणि `strategically` जातीय वळण दिले, हे स्पष्ट झाले आहे. सर्वात मुख्य बाब अशी की, क्लोजर रिपोर्ट काँग्रेसशासित तेलंगणा सरकारने सादर केला आहे. यामध्ये भाजपचा दुरान्वयेसुद्धा संबंध नाही. 

काँग्रेस आणि leftist gang यामुळे संपूर्ण उघडी पडली असून त्यांचे खरे मनसुबे जनतेसमोर आले आहेत.
क्लोजर रिपोर्टमधील काही गोष्टी अत्यंत गंभीर आहेत. रोहित मुळात अनुसूचित जमातीचा युवक नसल्याचे त्यामध्ये म्हटले आहे या रिपोर्टमध्ये असे नमूद केले आहे की, आपण अनुसूचित जातीचे नसल्याचे बिंग फुटण्याची भीती रोहितला वाटत होती. हे बिंग फुटले तर आपली बदनामी होईल, या दडपाणामुळे त्याने आत्महत्या केली. रोहित आणि त्याच्या कुटुंबाने खोटी कागदपत्रे सादर करून जातीचे खोटे प्रमाणपत्र मिळवले असल्याचे, क्लोजर रिपोर्टमधे म्हटले आहे. रोहित याची आई आणि वडील यांच्या जाती भिन्न असल्याचे या रिपोर्टमधे नमूद केले आहे.

रोहित हा डॉक्टरेटचा विद्यार्थी होता. जात प्रमाणपत्र आणि अन्य बाबीतील कायदेशीर बाजू त्याला शंभर टक्के माहीत असणार. या शिवाय तो विद्यार्थी संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता होता. त्यामुळे रोहितला हे सारे माहीत असणे अपेक्षित आहे. मग रोहित असे कोणाच्या सांगण्यावरून वागत होता, हा खरा कळीचा प्रश्न आहे.

रोहितचे brian washing झाले होते का, हा प्रश्न निर्माण होतो. या संशयाला पुष्टी देणारी काही कारणे आहेत. १८ डिसेंबर २०१५ ला रोहितने कुलगुरुना एक हस्तलिखित पत्र लिहिले होते. या पत्रात म्हटले होते की,  
“Please serve 10 mg of Sodium Azide to all Dalit students at the time of admission with directions to use when they feel like reading Ambedkar…Supply a nice rope to the rooms of all Dalit students from companion, the great Chief Warden.”

रोहितच्या पत्रातील मजकूर काय दर्शवितो? रोहितचा handler कोण आहे, याचीच चौकशी करण्याची वेळ आता आली आहे. या मागे आणखी एक कारण आहे. क्लोजर रिपोर्टमधे असे म्हटले आहे की, रोहितचे लक्ष अभ्यासापेक्षा अन्य बाबींकडे जास्त होते. रोहितला कोणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे क्लोजर रिपोर्टमधे म्हटले आहे.

रोहितसारखे तरुण ही भारताची संपत्ती आहे. त्याचे वैयक्तिक जीवन, आई-वडील, जात, शिक्षणामधील समस्या हे विषय गंभीर आहेतच. मात्र देशातील पंचमस्तंभी जास्त चिंताजनक आहेत. भारतीय समाजातील दोषांचा फायदा घेत समाजामधे फूट निर्माण करणे, हेच या पंचमस्तंभी लोकांचे काम आहे. तरुण वर्गाची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या मार्गाने नेणारी ही प्रवृत्ती देशविघातकच आहे.

रोहितचे प्रकरण जेएनयू आंदोलन चालू असताना पेटले. हा निव्वळ योगायोग मानता येणार नाही. देशामध्ये सतत अशांतता आणि अराजक माजविण्याचा पद्धतशीर डाव यामागे आहे. या साठी खऱ्याचे खोटे आणि खोटयाचे खरे करण्यामध्ये डाव्या मंडळीना जराही लाज वाटत नाही. 

काँग्रेससारखे पक्ष त्यांना सदोदित पाठिंबा देत असतात. अन्य राजकीय पक्ष यामध्ये मागे नाहीत.
देशाचे ऐक्य आणि विकास यामध्ये अडथळे निर्माण करण्याचे हे उद्योग सतत चालू आहेत. यापूर्वी सीएए आंदोलन, शेतकरी आंदोलन आणि ३७० विरुद्धचे आंदोलन यामधून ही वृत्ती आणि कृती दिसून आली आहे. विविध स्थानिक अथवा राज्य पातळीवरील प्रश्न दिशाभूल करून सतत पेटवित ठेवणे, हा डाव्या मंडळींचा डाव आहे. प्रसंगी ही मंडळी परकीय शक्तीकडून आर्थिक मदत घेण्यास कचरत नाहीत. किंबहुना काही संघटना आर्थिक फायद्यासाठीच असले उद्योग करीत असतात. याचे अनेक पुरावे पुढे आले आहेत. परकीय मदत घेण्यासाठीचे कायदे कडक केल्यानंतर याच मंडळींचा प्रचंड हिरमोड झाला होता.

रोहितसारख्या घटना दुर्दैवीच आहेत. त्या टाळण्यासाठी योग्य त्या यंत्रणेची गरजसुद्धा आहे. अशा समस्यांच्या मुळाशी जाऊन त्याचे तातडीने निराकरण करणे गरजेचे आहे. याच वेळी डावे विचार आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय आणि अराजकीय लोकांपासून अत्यंत सावध राहणे अत्यंत आवश्यक आहे.                                      
सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख