मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections) बिगुल वाजले असून राज्यातील २८८ जागांसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल. त्यानुसार, आता सर्वच पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. अशातच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढताना दिसत आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती दिली जात आहे. ते महायुतीकडूनही निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.
काही दिवसातच आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे महायुतीमधील शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. समीर वानखेडे अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) मुंबई विभागाचे माजी संचालक आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती. समीर वानखेडेंनी आर्यन खानला अटक केल्यावर त्याची देशभरात खूप चर्चा झाली होती. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते.