Wednesday, January 8, 2025

संतांच्या जनजागृतीमुळे भारतीय संस्कृती आजही जिवंत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

पुणे : भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून संतांनी निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवीत राहीली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. श्री क्षेत्र आळंदी येथे वेदश्री तपोवन परिसरात आयोजित संत कृतज्ञता संवाद (Sant Samvad) कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून संत, धर्माचार्य आणि कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, पर्यावरणीय व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार उमा खापरे, आमदार सर्वश्री महेश लांडगे, शंकर जगताप, अमीत गोरखे, आचार्य स्वामी गोविन्ददेव गिरी महाराज, हभप ब्रम्हगीरी मारोती महाराज कुसेकर, भास्करगिरी महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मारुती महाराज कुरेकर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचिन संस्कृती आहे. पाच हजार वर्षापूर्वीच्या सिंधू संस्कृतीमधील आजही आढळत असलेले अवशेष पूर्णपणे विकसीत आहेत. संत आणि धर्माचार्यांनी निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे ही संस्कृती जिवीत राहीली. पथभ्रष्ट झालेल्या राजसत्तेला संतांच्या विचारांनी हटविल्यामुळे आपल्या संस्कृतीला कुणीही संपवू शकले नाही.

आपला देश प्रगती करतानाच बलशाली होतोय, हे सहन न झाल्यामुळे देश आणि विदेशातील विघातक शक्तींनी एकत्र येऊन एक प्रकारचे षडयंत्र रचून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र संतांनी समाजामध्ये जागरुकता निर्माण करुन हे प्रयत्न हाणून पाडले. भारताची संस्कृती आणि विचार जेव्हा कमकुवत झाले त्या-त्यावेळी आपण गुलामगीरीत गेलो. येथील संतांनी समाज जागृत केला आणि एकसंघ समाज निर्माण केला आणि दिग्वीजयी भारत आपल्याला पाहायला मिळाला.

हिंन्दू जीवन पद्धतीमध्ये निर्गुण निराकार आहे, सगुण साकार आहे. प्रत्येकाची जीवनपद्धती वेगळी असूनही या जीवन पद्धतीमुळे भारत एकसंघ आहे. पूज्य गोविन्ददेव गिरी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समाज जागृतीचे मोठे कार्य केले आहे. सर्व समाज एक आहे, देश एक आहे पासून ते वसुधैव कुटुंबकम विचार त्यांनी मांडला. त्यामुळे समाजामध्ये जागृती निर्माण झाली असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोमातेची सेवा ही केवळ धर्मकार्य नसून राष्ट्रकार्य आहे. गोसेवा आणि नदी स्वच्छतेसाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीतील अडचणी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी गोसेवेचे महत्व वाढले पाहिजे. तसेच ज्या प्रकारे गंगानदी स्वच्छ केली जात आहे, त्याचप्रमाणे इंद्रायणी, गोदावरी, चंद्रभागा स्वच्छ वाहणाऱ्या नद्या बनवण्यासाठी येत्या काळात संपूर्ण क्षमतेने प्रयत्न केले जाईल. फेसाळलेल्या इंद्रायणीच्या पुनरुज्जीवनाचा संकल्प आम्ही पूर्ण करु, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाला राज्याच्या विविध भागातून आलेले संत, किर्तनकार, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

अन्य लेख

संबंधित लेख