Wednesday, September 18, 2024

मराठा आरक्षणाच्या आडून शरद पवार-उद्धव ठाकरेंचं राजकारण

Share

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या मराठवाड्याचा दौऱ्यावर आहेत. “मराठा आरक्षणाच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं राजकारण सुरु आहे,” अशी टीका त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत केली. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाविरोधात भूमिका घेतल्याची टीका त्यांच्यावर केली जात आहे. त्यातच बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यावर ‘सुपारीबाज’ म्हणत काही लोकांनी सुपाऱ्या फेकल्या. यात दौऱ्यात त्यांना अनेकदा अडथळे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “माझ्या संपूर्ण दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता. पण त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी राजकारण करत आहेत. ते मला मराठवाड्यात दिसत आहेत. मराठवाड्यातील काही पत्रकारही या गोष्टींमध्ये सहभागी झाले आहेत. मी ज्यावेळी धाराशीवला असताना मला तिथे काही लोक भेटायला आले होते. त्या लोकांना भडकावण्याचं काम हे पत्रकार तिकडे करत होते,” असे ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले की, “काल शिवसेनेचा जिल्हाप्रमुख ‘एक मराठा लाख मराठा’ असं ओरडत गेला. याचा अर्थ यामागे जरांगे पाटील आहेत, हे त्यांना दाखवायचं आहे. पण त्यांच्या आडून यांचंच विधानसभेचं राजकारण सुरु आहे. जरांगे पाटलांच्या पाठीमागून मत मिळवण्यासाठी यांचं राजकारण सुरु आहे. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. पण माझ्या नादी लागू नका,” असा इशाराही राज ठाकरेंनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिला.

या वर्षाच्या अखेरीस राज्यात निवडणुका होणार असल्याने आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय नाट्य अधिकच तीव्र झाले आहे. आगामी निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असून, सर्व प्रमुख पक्ष समाजाच्या पाठिंब्यासाठी लढत आहेत असं दाखवण्यात पुढे येत आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना येत्या काही महिन्यांत आणखी राजकीय डावपेच आणि चिखलफेक होण्याची शक्यता आहे.

अन्य लेख

संबंधित लेख