महाराष्ट्रात विधानसभा (Assembly Elections) निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे.
महायुती(Mahayuti) आणि महाविकास(MVA) आघाडीतील घटक पक्षांच्या बहुतांश उमेदवारांनी काल गुरुपुष्यामृताचा योग साधत आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. यात अनेक मंत्री, आमदार आणि दिग्गज नेत्यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1849687667887439951/photo/1
‘प्रेमाचे, विश्वासाचे, प्रेरणेचे आणि साथीचे… हे औक्षण आहे ‘विजयाचे’!
दक्षिण-पश्चिम नागपूर येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आईचे आशीर्वाद घेतले, यावेळी पत्नी अमृताने, मुलगी दिवीजा आणि माझे औक्षण केले…’
असे ट्विट त्यांनी समाजमाध्यमावर केले आहे. दक्षिण-पश्चिम नागपूर येथून विधानसभा निवडणुकीचा नामनिर्देशन पत्र भरण्यापूर्वी संविधान चौक येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांनंतर अर्ज भरण्यासाठी ते पुढे गेले.
बहुतांश उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत, जाहीर सभा घेत तर कुणी कसलाही गाजावाजा न करता साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 45 उमेदवारांची तर कॉँग्रेसनं 48 उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या पहिल्या यादीत कर्जत जामखेड मतदारसंघासाठी रोहित पवार, बारामतीसाठी युगेंद्र पवार, पारनेरमध्ये राणी लंके आणि तासगाव-कवठे महांकाळ मतदारसंघात रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
कॉँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कऱ्हाड दक्षिणमधून, नाना पटोले यांना साकोलीमधून, तर विजय वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरीमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदार संघातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मनसे, शेकाप आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही काल अर्ज दाखल केले. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या कालच्या तिसऱ्या दिवस अखेर राज्यात 552 उमेदवारांनी 720 उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे.