मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सर्व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत बोलावली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना, सुनेत्रा पवार आता प्रत्येक आमदाराचे वैयक्तिक मत जाणून घेणार आहेत. या बैठकीमुळे विलीनीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळणार की पेच वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या हालचालींना आता वेग आला असून, त्यादृष्टीने मंगळवारी, १७ फेब्रुवारी २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वतः प्रत्येक आमदाराशी ‘वन-टू-वन’ संवाद साधून विलीनीकरणाच्या संवेदनशील मुद्द्यावर त्यांचे वैयक्तिक मत जाणून घेतील. पक्षातील सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच पुढील पाऊल उचलणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश आहे. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला असून, या चर्चेतून पक्षाची पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.”
पक्षांतर्गत विलीनीकरणाबाबत दोन प्रवाह पाहायला मिळत आहेत
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी दावा केला आहे की, ४० पैकी ३५ आमदार विलीनीकरणाच्या बाजूने आहेत. “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे त्यांनी म्हटले आहे. तर, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी विलीनीकरणाचा निर्णय सामूहिकपणे घेण्याची आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याची मागणी केली आहे.
मात्र दुसरीकडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सध्यातरी विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यांच्या मते, सध्याचे प्राधान्य सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मजबूत करणे आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करणे हे आहे. अध्यक्ष निवडीनंतरच विलीनीकरणाचा मुद्दा अधिकृतपणे हाती घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.