Saturday, January 31, 2026

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; शोकाकुल वातावरणात राजभवनावर शपथविधी संपन्न

Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासोबतच सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.

विधीमंडळ गटनेतेपदी निवड आणि राज्यसभेचा राजीनामा

विधीमंडळात पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत दिलीप वळसे पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांनी त्याला अनुमोदन दिले. ४२ आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची निवड केली. उपमुख्यमंत्रीपदाची घटनात्मक जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

साधेपणाने पार पडला सोहळा
अजितदादांच्या अकाली निधनामुळे राज्यात दुःखाचे वातावरण आहे, त्यामुळे हा सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. केवळ १० मिनिटे चाललेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे मोजकेच ज्येष्ठ नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांनी कोणताही सत्कार किंवा हार-तुरा स्वीकारला नाही.

पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार मंत्रालयात न जाता तातडीने बारामतीकडे रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अजितदादांचा दहावा विधी होईपर्यंत त्या बारामतीतच मुक्काम करणार आहेत. “जोपर्यंत दुखवटा संपत नाही, तोपर्यंत कोणतेही शासकीय कार्यक्रम किंवा सत्कार स्वीकारणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक दिवस
स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने महाराष्ट्रासाठी हा दिवस महत्त्वाचा ठरला आहे. सामाजिक कार्यातून राजकारणात आलेल्या सुनेत्रा पवार आता राज्याचा गाडा कसा हाकतात आणि अजितदादांचा वारसा कसा पुढे नेतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख