‘‘समाजाच्या सर्व क्षेत्रांमध्ये संघ हवा, धर्म हवा अशी मागणी लोकांकडून होत आहे. पूर्वी इथे संघ कशाला हवा, इथे धर्म कशाला आणता, अशी विचारणा केली जायची. आता लोकांकडूनच मागणी होत आहे की, इथे संघ आणा, इथे धर्म (कर्तव्य) आणा, इथे हिंदुत्व आणा. संघ आला तर धर्म पण येईल म्हणजे चरित्र निर्माण होईल. सर्व क्षेत्रांमध्ये, सर्व संस्थांमध्ये लोकांना संघ हवा आहे. संघाचे काम करण्याची, संघ कामात सहभागी होण्याची इच्छा समाजात उत्पन्न होत आहे आणि ही संघाची फार मोठी उपलब्धी म्हणता येईल,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पुण्यात केले.
‘भारतीय विचार साधना प्रकाशना’च्या वतीने आयोजित ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात आंबेकर बोलत होते. नाना थिटे सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, लेखक अरुण करमरकर, भाविसाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, कार्यवाह काशिनाथ देवधर आदींची प्रमुख उपस्थिती होती. दिलीप क्षीरसागर, अरुण करमरकर आणि दिलीप करंबेळकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
‘‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जरी मोठ्या सामाजिक परिवर्तनासाठी कार्यरत असला, तरी ही प्रक्रिया अत्यंत स्वाभाविक आणि सामान्य आहे. खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या माध्यमातून घडणारी परिवर्तनाची प्रक्रिया म्हणजे संघ होय. संघ समजावून सांगण्यासाठी मोठ्या वैचारिक भाषणांची गरज नाही; तो सर्वसामान्य स्वयंसेवकांच्या वर्तनातून सहज समजतो, असेही सुनील आंबेकर यांनी सांगितले.
आंबेकर म्हणाले, ‘‘हिंदू समाजातील दोषांवर परिपूर्ण उपाय म्हणून डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. डॉ. हेडगेवार यांना केवळ राजकीय असहमती व्यक्त करायची असती, तर त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला असता. मात्र, त्यांना व्यक्ती निर्माणातून आदर्श समाज उभा करायचा होता. केवळ चारित्र्यवान लोक निर्माण करून चालणार नाही, तर त्यांचे संघटन करणे आवश्यक होते. म्हणून त्यांनी संघाची सुरुवात केली.”
‘रिलिजन’मुळे धर्मावर अन्याय !
‘‘पश्चिमेत रिलिजनच्या माध्यमातून मूळतत्ववाद जन्माला आला आणि चर्चने थेट राज्यकारभार हाती घेतला. त्यामुळे तिथल्या विचारवंतांनी सामाजिक परिवर्तनासाठी रिलिजनला नाकारले. दुर्दैवाने, तोच अनुभव भारतात लादण्याचा प्रयत्न झाला आणि धर्म या संकल्पनेला रिलिजनला समानार्थी मानून दूर सारले गेले. भारतात धर्म म्हणजे कर्तव्य आणि कल्याण होय. राज्यकारभार, शिक्षण, प्रशासन यांत धर्म नको, या विचारामुळे ही क्षेत्र चारित्र्यहीन झाली आहेत. आज पुन्हा लोक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात धर्माची (कर्तव्याची) मागणी करत आहेत,” असेही आंबेकर यांनी नमूद केले.
‘‘भारताची विस्कळीत झालेली समाजव्यवस्था सांधण्याचे कार्य संघाने केले आहे. सर्वच क्षेत्रांतील अराष्ट्रीय विचार आणि वैचारिक गोंधळाची स्थिती संघामुळे दूर झाली. हिंदुत्व हा सर्वांना जोडणारा विचार असल्याचे आता सर्वांना उमजले आहे,” असे गिरीश प्रभुणे म्हणाले. लेखक अरुण करमरकर स्वयंसेवक या शब्दाविषयी बोलताना म्हणाले, ‘‘शताब्दीच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या तीन शब्दांची मीमांसा करण्याचे काम आम्ही केले. माझ्या वाट्याला स्वयंसेवक शब्दाची मीमांसा आली. माझ्या अध्ययनातून मी अजूनही स्वयंसेवक बनण्याच्या मार्गावरच आहे.” डॉ. आफळे यांनी प्रास्ताविक केले, तर काशिनाथ देवधर यांनी आभार मानले.