Thursday, December 25, 2025

मोदी-फडणवीसांच्या धास्तीमुळेच ठाकरे एकत्र?

Share

मुंबई : भाजपने मराठी अस्मितेचा खरा आवाज बनत ठाकरे बंधूंच्या युतीवर सवाल उपस्थित केले आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामागील हेतूंवर स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत मराठी जनतेच्या मनातील प्रश्नांना वाचा फोडली आहे.

राज ठाकरे यांनी पूर्वी “मातोश्रीतील माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे” आणि “चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतला” अशी टीका केली होती. मग हेच बडवे आणि कारकून आज अचानक जवळचे कसे झाले, असा थेट सवाल शेलार यांनी उपस्थित केला. यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीतील विसंगती जनतेसमोर उघड झाली आहे.

“दोन भाऊ एकत्र येत असतील तर आनंदच आहे. पण मग पक्ष वेगळे का झाले, दोन पक्ष का निर्माण झाले, याचे उत्तर मराठी माणसाला मिळाले पाहिजे,” असे सांगत शेलार यांनी स्पष्ट केले की, कुठल्याही मराठी माणसाने दोन भाऊ वेगळे करण्याची मागणी कधीच केली नव्हती. हा निर्णय जनतेचा नव्हता, तर वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा परिणाम होता.

शेलार यांनी ठामपणे सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर मुंबईकर व मराठी माणसाने विश्वास टाकला, आणि हाच वाढता जनाधार पाहून विरोधक अस्वस्थ झाले आहेत. या भीतीपोटीच ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे मराठी जनता जाणून आहे, असेही त्यांनी नमूद केले.

काँग्रेससोबतच्या युतीवर बोलताना शेलार म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेतृत्वाबद्दल भाजपला आदर आहे; मात्र ज्यांनी आंदोलकांवर गोळ्या झाडल्या, त्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी कशी केली, हा मोठा प्रश्न आहे. ही युती मराठी अस्मितेसाठी नसून केवळ संधी साधण्यासाठी आणि सत्तेसाठीची धडपड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“मनसे संपलेला पक्ष आहे,” असे उद्धव ठाकरे यांच्या सुपुत्रांनी म्हटले होते, मग आज त्याच पक्षाशी युती कशासाठी, असा सवाल करत भाजपने ठाकरे बंधूंच्या भूमिकेतील दुटप्पीपणावर बोट ठेवले आहे.

शेवटी शेलार यांनी सांगितले की, १५ तारखेला घोडा मैदानात भाजपची भूमिका स्पष्ट असून मुंबईकर भाजपच्या ठाम नेतृत्वासोबत ठामपणे उभे आहेत. विकास, स्थैर्य आणि मराठी माणसाचा खरा सन्मान भाजपच देऊ शकतो, असा विश्वास जनतेत अधिक दृढ होत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख