Monday, December 2, 2024

सातपुड्यातील कोरकूंची वैशिष्ट्यपूर्ण होळी

Share

सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या मेळघाटातील होळीचा उत्सव आजही परंपरेनुसारच होतो. उदरनिर्वाहाच्या कामांना सलग पाच दिवस सुटी देऊन वनवासी होळीत रममाण होतात. हा दिवस त्यांना दिवाळीपेक्षाही महत्त्वाचा असतो. मेळघाटात कार्यरत असलेल्या ‘ग्राम ज्ञानपीठ’च्या निरुपमा देशपांडे यांनी सांगितलेली या होळीची खासियत.

मेळघाटात कोरकू, गोंड, निहाल अशा विविध जमातींचे वनवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यातील कोरकू जमातीचा होळी हा मुख्य सण आहे. दिवाळी ते इतकी महत्त्वाची मानत नाहीत. दिवाळी गोंड समाज साजरी करतो.

आता नोकरी-व्यवसायानिमित्त बरेच लोक गावातून बाहेर पडले आहेत. पण होळीसाठी सगळे गावात येणार म्हणजे येणारच, इतकी होळी त्यांच्यासाठी महत्त्वाची असते. त्या दिवशी गावात छोटी आणि मोठी अशा दोन होळ्या असतात. गावाचे परंपरागत आडापटेल (गावचे पाटील) यांच्या घरासमोर प्रथम छोटी होळी पेटवली जाते. त्यानंतर मोठी होळी पेटवली जाते. होळीची खूप सुंदर सजावट केलेली असते. ही होळी आदल्या दिवशी आणून ठेवतात.

होळीचा सण आमच्याकडे आठवडाभर, म्हणजे रंगपंचमीपर्यंत चालतो. पूर्वी तर महिनाभर आधीपासून तयारी सुरू व्हायची. रात्रभर जागून होळीची गाणी म्हटली जात. आजकाल गाण्यांचे प्रमाण कमी झाले असले, तरी अजूनही पारंपरिक गाणी म्हटली जातात. आपण जशी पौर्णिमेला होळी साजरी करतो, तसे इथे होत नाही. एखाद दिवस मागे पुढे होऊ शकते. होळी कधी करायची हे प्रत्येक गावातले लोक ठरवतात. मग आदल्या दिवशी एकेक माणूस जंगलामध्ये जाऊन नवीन, कोवळे बांबू काढून आणतो. पळसाची फुले आणतात. प्रत्येक घरातून एकेक लाकूड आणतात आणि खूप सुंदर होळ्या तयार करतात.

फगव्याची गाणी, फगवा महोत्सव
ज्या दिवशी होळीदहन असते, त्या दिवशी प्रत्येकाच्या घरी सणाचे वातावरण असते. घरी पुऱ्या आणि गोडधोड केले जाते. तो नैवेद्य होळीला दाखवतात. आपल्या घरासमोरच्या होळीपासून गावातील होळीपर्यंत पटेल गाजत वाजत येतात. आदल्या दिवशी आणलेली होळी आडवी ठेवलेली असते. दुसऱ्या दिवशी ती उभी करतात व रात्री ती पेटवतात. त्यावेळेला सगळे लोक नवीन कपडे वगैरे घालून एकत्र येतात. एकमेकांना भेटतात. होळीच्या दिवशी शिव्या देणे, अपशब्द वापरणे वगैरे प्रकार इथे अजिबात नसतात. नंतर पाच दिवस युवक, युवती, महिला, लहान मुले, ज्येष्ठ व्यक्तींचे गट फगव्याची गाणी म्हणतात. घराघरांत जाऊन, रस्त्यावर, बाजारात अशा ठिकठिकाणी ते गाणी म्हणत फिरत असतात. ज्यांच्याकडे जाऊन गाणी म्हणतात, ते लोक त्यांना पैसा किंवा धान्य देतात. याला ‘फगवं मागणे’ म्हणतात. सगळ्या सणांत असलेली सामूहिकता, हे इथले वैशिष्ट्य आहे. ती होळीतही दिसून येते. त्या दिवशी गावातील लहान मुले घरोघरी जाऊन नाचतात आणि ‘होली का लकडी दे दे रे बाबा होली का लकडी दे..’ अशी गाणी म्हणतात. त्यावेळी प्रत्यक जण एकेक लाकूड त्यांना देतो. ते गोळा करून त्याची होळी ते पेटवतात. सगळ्यांचा सहभाग आणि सामूहिकता ही सणांची महत्त्वाची गोष्ट आहे.

मेळघाटमधील आमच्या ‘ग्राम ज्ञानपीठ’च्या कॅम्पसमध्येही आम्ही होळीनंतरच्या शनिवार-रविवारी ‘फगवा महोत्सव’ साजरा करत असतो. तिथेही होलीचे दहन होते. आदिवासींचे नृत्य होते. आजूबाजूच्या गावातले लोक येतात.

दिवाळीपेक्षा होळीला महत्त्व असण्याचे कारण म्हणजे, तोपर्यंत सगळी पिके आलेली असतात. हातात थोडाफार पैसा असतो. आता गावात रोजगार नसल्यामुळे लोक गावाबाहेर जातात. विस्थापन भरपूर आहे. पण होळीसाठी ते येतात. ‘जे काही कमवायचे ते होळीसाठीच कमवायचे. पैसा-अडका, सोने-नाणे होळीसाठीच करायचे, ’ असा त्यांचा विचार असतो. ‘होली जल गया, कोरकू जल गया’ असे ते म्हणतात. बहुतेक आदिवासी समाजात होळीला पहिल्यापासूनच परंपरेने खूप महत्त्व आहे. एकवेळ दिवाळीत ते कपडे घेणार नाहीत, पण होळीला घेतातच.

या सणाला आपण पुरणपोळी करतो, पण इकडे पुऱ्याच करतात. पुऱ्या, भाजी, गोड पदार्थ असा बेत असतो. या दिवशी परस्परांचा आदर केला जातो. होळीच्या दिवशी कोणाबरोबर दुश्मनी ठेवायची नाही, असे ते म्हणतात. होळीला नवसही बोलतात. होळीनंतर या भागात जत्रा वगैरे असतात. आदिवासींच्या जंगलामधील देवांच्या पूजा होतात. उत्साहाचे वातावरण असते.

ऋता मनोहर बावडेकर
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख