Wednesday, October 23, 2024

तुकडाेजी महाराज आणि हिंदुत्व विचार

Share

अलिकडे केवळ राजकारण आणि सत्तेसाठी इतिहासासाेबत बेईमानी केली जात आहे. तुकडाेजी महाराज हिंदुत्ववादी नव्हते, असे सांगून हिंदूंच्या धारणा व आस्थांचा अवमान केला जात आहे. ‘राष्ट्रसंत हिंदुत्ववादी नव्हते तर मग हिंदुत्वविराेधी हाेते का?’ महाराजांनी आपल्या आयुष्यात ३ हजारांवर भजने लिहिलीत. यातील एका तरी भजनातून त्यांनी हिंदुत्वाचा विराेध केल्याचे दिसते का? तुकडाेजी महाराज मानवतेच्या आधारावर सर्वच धर्मांचा सन्मान करायचे. केवळ एवढ्याच सबबीवर ते हिंदुत्ववादी नव्हते, असे सांगणे म्हणजे तुकडाेजी महाराज आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या काेट्यवधी नागरिकांचा घाेर अपमान आहे. मुळात हिंदुत्व ही केवळ संकल्पना नसून ती एक संस्कृती आहे. इतिहास साक्षी आहे, हिंदूंनी कधीच केवळ धर्माच्या आधारावर काेणाला जगण्याचा अधिकार नाकारलेला नाही अथवा बळजबरीने आपला धर्म इतरांवर लादला नाही. देशात आजही ‘गजवा ए हिंद’च्या घाेषणा दिल्या जातात. या लाेकांच्या सुरात सूर मिळविणे म्हणजेच सवधर्मसमभाव असेल तर हा सर्वधर्मसमभाव केवळ हिंदू धर्मावरच नाही तर भारताच्या सार्वभाैमत्वारसुद्धा एकप्रकारचा घाला आहे. हा देश हिंदूंचा आहे आणि तरीही काेणी सर्वधर्मसमभावाच्या नावावर हिंदूंचे अस्तित्वच नाकारत असेल तर हा सर्वधर्मसमभाव फेकून दिला पाहिजे. हिंदूंच्या विराेधात एवढे माेठे षडयंत्र रचले जात असतानाही हिंदू इतरांच्या आस्थांचा सन्मान करताे, ही सहिष्णुता नव्हे काय? केवळ सत्ता आणि खुर्चीच्या हव्यासापाेटी आगामी पिढ्यांचा बळी देण्याचा अधिकार तुम्हाला आहे का?   

नुकतीच राष्ट्रसंतांची पुण्यतिथी सर्वत्र साजरी झाली. महाराजांनी जनकल्याणासाठी आयुष्य वेचले. देश आणि देशातील नागरिक हाच त्यांचा परिवार आहे. महाराजांनी समाजातील कुप्रथा आणि अंधश्रद्धेवर प्रहार केले. त्यांनी आयुष्यभर ग्रामीण विकासाचा ध्यास जाेपासला. यातूनच ग्रामगीता अस्तित्वात आली. एकूणच ते सुधारणावादी संत हाेते. तुकडाेजी महाराज विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक सदस्य राहिले आहेत. या संघटनेची जबाबदारी स्वीकारताना, ‘मी सर्वच धर्मांना मानताे. पण, म्हणून मी माझ्या धर्माचा अभिमान साेडून देऊ का?’ असा प्रश्न त्यांनी तथाकथित पुराेगाम्यांपुढे उपस्थित केला हाेता. त्यांच्या या विचारांमध्ये हिंदुत्व दिसत नाही का? तुकडाेजी महाराजांच्या अनुयायांमध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायातील पापभिरू नागरिकांचा भरणा आहे. पंढरीचा विठ्ठल हेच त्यांचे आराध्य आहे. मात्र, आता तुकडाेजी महाराजांनाच हिंदुत्वापासून ताेडण्याचे पातक करून त्यांच्या लाखाे अनुयायांच्या भावनांचा अनादर केला जात आहे.

स्वातंत्र्यलढ्यात तुकडाेजी महाराजांचे अमूल्य याेगदान राहिले आहे. परंतु, त्याकाळी पुराेगाम्यांनी तुकडाेजी महाराजांच्या सुधारणावादालाच ‘बुवाबाजी’चे नाव देऊन त्यांची आणि पर्यायाने हिंदुत्वाचीही थट्टा केली हाेती. महात्मा गांधींनी खात्री करून घेण्यासाठी त्यांना सेवाग्राम आश्रमात बाेलावून घेतले हाेते. त्याकाळी देशात जातीयवाद खूप हाेता. त्यामुळेच महाराजांनी ‘या भारतात बंधूभाव नित्य वसू दे’ या गीतातून ईश्वराकडे देशाच्या कल्याणाची मागणी केली. सदाचारी आणि व्यसनमुक्त भारत घडविण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून आजही हे कार्य निरंतर सुरू आहे. महाराजांच्या अनुयायांमध्ये झाडून सर्वच जातींच्या नागरिकांचा समावेश असून हे सर्व एक परिवार म्हणूनच तुकडाेजी महाराजांचे कार्य जाेमाने पुढे नेत आहे. 

चीन आणि पाकिस्तानशी झालेल्या युद्धादरम्यान तुकडाेजी महाराज स्वत: सीमेवर गेले आणि आपल्या भजनांमधून त्यांनी सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. अशा या राष्ट्रवादी संतांचे हिंदुत्व आणि पर्यायाने माहात्म्य नाकारणे हा एक जगण्य अपराध आहे. तत्कालीन राष्ट्रपती डाॅ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडाेजी महाराजांना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी बहाल केली. महाराजांनी आयुष्यभर अंधश्रद्धा, वाईट चालिरीती आणि कुप्रथांवर प्रहार केले. परंतु, आपल्या संस्कृतीबाबत सदैव ऋणाईत राहिले. कारण, हिंदू संस्कृतीचे मूळ विज्ञानात आहे, हे त्यांनी हेरले हाेते. त्यामुळेच त्यांनी समाजातील अंधश्रद्धांना विराेध करतानाच राष्ट्रनिर्माणाची ज्याेत सदैव तेवत ठेवली. 

राष्ट्रनिर्माणासाठी वयाच्या १४ व्या वर्षी घर साेडणाऱ्या या महात्म्यावर तुकाराम महाराजांच्या साहित्याचा प्रचंड प्रभाव हाेता. अवडंबर माजविणाऱ्या ढाेंगी लाेकांबद्दल मात्र त्यांच्या मनात प्रचंड चीड हाेती. कारण, अशा लाेकांमुळे धर्म आणि संस्कृतीची हानी हाेत असल्याचे त्यांनी जाणले हाेते. त्यामुळेच त्यांनी आयुष्यभर आपल्या अनुयायांसह देशातील नागरिकांना सत्कर्मी राहण्याचा उपदेश दिला. अशातच कर्कराेगाने ग्रासले आणि त्यांनी ११ ऑक्टाेबर १९६८ राेजी देह ठेवला. तुकडाेजी महाराजांचे कार्य आणि विचार हिंदू समाजाला राष्ट्रनिर्माणासाठी सदैव प्रेरणा देत राहील. 

।।जय गुरुदेव।।

पुंडलिक आंबटकर
नागपूर

अन्य लेख

संबंधित लेख