Thursday, November 21, 2024

उबाठाची अराजकवादी वृत्ती

Share

शिवसेना  हा एक बंदिस्त, परिवारकेन्द्रित आणि एकचालकानूवर्तित्व यावर चालणारा पक्ष आहे. साहजिकच या पक्षातील बंडाळी अनपेक्षित आणि धक्कादायक असते. शिवसेनेसारख्या पक्षात बंडखोरी झाली आणि उद्धवचा अहंकार प्रचंड दुखावला. आपल्या पक्षात पडलेली मोठी फुट आणि मुख्यमंत्रीपाचा राजीनामा द्यावा लागल्यामुळे, उद्धव आणि त्यांचे घरगडी संजय राऊत भलतेच चवताळले. सेनेच्या अंतर्गत राजकारणात ‘बारक्या’ म्हणून ओळखले जाणारे आदित्य ठाकरे विचारवंतांचा आव आणून बोटे मोडत बसले होते.

या तिघानीही पहिल्या दिवसापासून शिंदे सरकारचे वर्णन `घटनाबाह्य’ असे केले होते. यापैकी कुणीही घटनेचा सरनामा सुद्धा वाचला नसेल. परंतु, आपण घटनातज्ञ असल्याच्या आविर्भावात हे त्रिकुट सरकारचे वर्णन घटनाबाह्य असेच करीत राहिले. अर्थात यापैकी कोणाहीकडून परिपक्व विचाराची अपेक्षा नाही. परंतु त्यांची मानसिकता समजावून घेणे आवश्यक आहे.

शिंदे सरकार घटनाबाह्य असते तर सर्वोच्च न्यायालयाने त्याची अत्यंत गंभीर आणि तातडीने दखल घेतली असती. या पूर्वी न्यायालयाने असे निर्णय दिले आहेत. ज्या अर्थी न्यायालयाने असा निर्णय दिला नाही, त्यावरून शिंदे सरकार घटणात्मकच असल्याचे दिसून येते. न्यायालयाच्या ‘शहाणपणावर’ कोणताही सुबुद्ध नागरिक विश्वास ठेवेल. परंतु रोज सकाळ, दुपार आणि सायंकाळी या त्रिकूटाने घटनाबाह्य या शब्दाचा वापर करून `victim card’ खेळून स्वत:च्या अपयशावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

या भूमिकेमागे खोलवर रुजलेली अराजकवादी मानसिकता दिसून येते. संजय राऊत स्वत:ला कितीही हिंदुत्ववादी म्हणत असले तरी त्यांच्यावर झालेले वैचारिक संस्कार ‘डावे’ असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. उद्धव ठाकरे यांना कोणताही विचार करता येत नाही. त्यामुळेच राऊत यांच्यासारख्या बाजारबुणग्याला मातोश्रीमधे महत्व आले. ‘बारक्या’ बद्दल काहीही बोलू नये.

तर या अराजकवादी त्रिकूटाने घटनाबाह्य या शब्दाचा वारंवार वापर करून जनतेमधे घटनात्मक व्यवस्था, न्यायालय, शासन, विधानसभा, सरकार स्थापनेची प्रक्रिया, राज्यपाल, वगैरे घटनात्मक पदे आणि संस्थांवर संशय आणि अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या तिघांनीही वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाबद्दल अश्लाघ्य, असभ्य, आक्षेपार्ह आणि कमरेखालची भाषा वापरली. हा सर्व प्रकार अत्यंत जाणिवपूर्वक आणि हेतुत: केला जात होता.

घटनात्मक संस्था आणि व्यवस्था याबाबत अविश्वास आणि संशय निर्माण करून जनतेमधे संभ्रम, संशय आणि अविश्वास निर्माण करणे ही अराजवाद्याचे कामच असते. त्यामुळे सरकार आणि व्यवस्था यांच्या अधिमान्यता (legitimacy) याबद्दल अविश्वास निर्माण होऊन एक प्रकारची पोकळी निर्माण होते. याच पोकळीचा फायदा घेऊन अराजकवादी सक्रिय होतात. त्यांचे लक्ष्य आता `गृहयुद्ध’ हे असते. एकदा का अशी परिस्थिति निर्माण झाली की, प्रस्थापित व्यवस्था आणि सरकारला उलथवून टाकणे सोपे असते कारण लोकशाही मार्गाने निवडून येणे या घटकांना शक्य नसते. अशा नाजुक परिस्थितित देशाचे विभाजन होण्याचीसुद्धा शक्यता असते. बांगला देशात झालेल्या घटनांचे यांनीच समर्थन केले होते आणि आपल्या देशातसुद्धा अशीच परिस्थिति निर्माण होईल, असे भाकीत व्यक्त केले होते.    

शिवसेना आणि मित्र पक्षांची वाटचाल गेली काही वर्षे याच मार्गाने चालू आहे. त्यांची प्रक्षोभक विधाने, विभाजनवादी घटकाना मिळणारे प्रोत्साहन, विविध सामाजिक घटकांमधे तणाव निर्माण करणारी कार्यपत्रिका आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे त्यांना होत असलेले परदेशी शक्तींची मदत या सर्व बाबी शिवसेना आणि त्याच्या मित्रपक्षांच्या हेतुबद्दल संशय निर्माण करणारी आहेत.

मोदीद्वेषाने आणि हिंदुत्वद्वेषाने यांना एवढे पछाडले आहे की राष्ट्रीय हितसंबंध, देशभक्ती, राष्ट्रप्रेम, देशाभिमान वगैरे शब्द त्यांच्या शब्दकोशातून नाहीसे झाले आहेत. त्यांच्यापुढे फक्त एकच अजेंडा आहे. हा अजेंडा म्हणजे कोणत्याही परिस्थितीत भाजपला खाली खेचणे. त्यापुढे देशासमोरील गंभीर संकटे आणि आव्हाने यांचेसुद्धा भान त्यांना राहिले नाही. याच शक्तिनि evm चा बहाणा करून भारतातील लोकशाही प्रक्रियेविषयी संशय निर्माण करून देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करण्याचा डाव खेळला होता. सुदैवाने भाजप आणि मोदी त्यांना पुरून उरले. परंतु सरकार स्थापन करता आले नाही म्हणून आलेल्या वैफल्यामुळे ते अजून बेहिशेबी आणि ताळतंत्र सोडून वागत असल्याचे असल्याचे दिसून येत आहेत. मतदारांनी याचा गंभीर विचार करून लोकशाही मार्गानेच त्यांना धडा शिकवून आपले राष्ट्रीय कर्तव्य जबाबदारीने पार पाडणे गरजेचे आहे.

अन्य लेख

संबंधित लेख