Monday, June 24, 2024

उबाठाचे केविलवाणे हिंदुत्व

Share

भाषा, प्रांत, जातीभेदाच्या पलिकडे जाऊन ‘हिंदू सारा एक’ ह्या भावनेने हिंदू संघटित रीतीने उभा राहिला आहे. महाराष्ट्रातील सकल राष्ट्रीय हिंदू समाजाला तुमच्या फायद्याच्या हिंदुत्वात काडीचाही रस नाही.

संघाचे फडके असा भगव्याचा विकृत उल्लेख केल्यावर तमाम मराठी बांधवांनी आणि सकल हिंदू समाजाने गालफाडे लाल केल्यानंतर उपरति झाल्यासारखे उबाठा यांनी सर्व हिंदुत्ववाद्यांना एकत्र येण्याची हाळी पाळीव वर्तमानपत्रे आणि पत्रकारांच्या मध्यस्तीने अगतिकपणे दिली आहे. मुळात हिंदू समाज जागृती ही काही ठाकरे कुटुंबियांची देणगी नाही. हिंदू समाज संघटित करून, जागृत करून, देशभर एकसमयावच्छते करून कृतिशील बनविण्याचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शंभर वर्षांपूर्वी सुरू केला आणि ते कार्य यशस्वीपणे सुरू आहे.

त्या प्रयत्नातून भाषा, प्रांत, जातीभेदाच्या पलिकडे जाऊन ‘हिंदू सारा एक’ ह्या भावनेने हिंदू संघटितरीतीने उभा राहिला. त्या नंतर आयत्या पिठावर रेघोट्या मारायला आपण आलात. पण हिंदू समाज भोळा राहिलेला नाही. त्याला स्वतःचे भवितव्य कोठे सुरक्षित आहे हे नीट कळते.

कोणाचे हिंदुत्व हे अयोध्येतील अपमान धुवून काढण्यासाठी आहे, आर्य-द्रविड हे खोटे विमर्श खोडण्यासाठी आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आदर्श होते हे प्रत्यक्ष कृतीतून सांगणारे हिंदुत्व कोणते आहे, हे सर्व हिंदू समाज जाणून आहे.

त्याच वेळी मोडक्या खुर्चीसाठी हिंदुत्वाला तिलांजली देणारे कोण हेही मराठी माणसाने व समस्त हिंदू समाजाने पाहिले आहे. साधुंच्या हत्येनंतरचे शर्मनाक मौन पाहिले आहे. औरंगजेबाची आरती ओवाळताना पाहिली आहे. सावरकरांचा अपमान करणा-या नेत्याचे गोंडे घोळताना पाहिले आहे. सावरकर महाराष्ट्रतील, छत्रपती शिवाजी महाराज याच भूमीतील तरीही आपले रक्त काही पेटत नाही. आपल्या शारीरिक प्रकृती एवढीच आपली हिंदुत्वाची हाक ही अगतिक आहे. या महाराष्ट्रातील आराध्य हिंदू नेते सुध्दा आपल्याला झेपत नाहीत तर आसामचे लाचित बडफुकन, तंट्या भिल्ल ही नावे आपल्याला स्वप्नातही आठवणार नाहीत.

म्हणून महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीय हिंदू समाजाला तुमच्या फायद्याच्या हिंदुत्वात काडीचाही रस नाही. ते काश्मीरचे ३७० कलम ज्यांनी रद्द केले त्यांना हिंदू हित रक्षक मानतात. CAA आणणा-यांना हिंदू हित रक्षक मानतात.

म्हणून महाराष्ट्रातील हिंदूंना हे नीट कळते की हिरव फडक बांधुन बसलेल्या उठाबांचे हिंदू एकतेचे आवाहन हे लबाडा घरचे आवताण आहे. ते फसणार नाहीत. भगव्याचा, जरी पटक्याचा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा, छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाचा, स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या उबाठांचा हिंदू शब्द उच्चारण्याचा अधिकार सुध्दा अता शिल्लक नाही. संपूर्ण देश ज्यानी प्रेमाने कवेत घेतला आहे त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिकवायला जाऊ नका. आधुनिक काळात हिंदू समाजाला हिंदूंचे आपले कोण आणि परके कोण ? हे त्यांनीच समजावले आहे.

तुम्हाला हिंदू द्वेष्ट्यांबरोबर जायचे तर जरूर जा. वीर सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्या राहुल गांधीं बरोबर जायचे तर जरूर जा. कारण आता हिंदू समाजात तुम्ही कितीही फूट पाडायचा प्रयत्न केलात तरी तुमचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. 

मुंबईतील हजारो डबेवाले जेव्हा पंढरीच्या वारीला जातात, तेव्हा त्यांच्या खांद्यावर भगवी पताकाच असते. वारीतील लाखो वारकऱ्यांच्या खांद्यावरही हीच पताका असते. मुंबई-ठाण्यात, पुण्यात नववर्ष स्वागताच्या शोभायात्रा निघतात, तेव्हाही हाच ध्वज डौलाने तरुणाईच्या हाती फडकत असतो. गड-कोट, किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव. त्या गडांवरही हाच ध्वज इतिहासाची साक्ष देत असतो.

सनातन हिंदू संस्कृतीचा वाहक असा हा भगवा ध्वज आहे. या भूमीवर तो अखंडपणे, डौलाने फडकत रहावा, ही हिंदूंची मनीषा आहे. त्या ध्वजाबद्दल विधान करून तुम्ही हिंदू समाजाचा अपमान केला आहे. त्यामुळे हिंदू समाज तुम्हाला माफ करणार नाही.

इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा.

सुनील देशपांडे

(लेखक ब्लॉगर असून ते विविध सामाजिक विषयांवर लेखन करतात.)

अन्य लेख

संबंधित लेख