मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गेल्या दहा वर्षांतील विसंगत राजकारणावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रहार केला आहे. “कधी इकडे, तर कधी तिकडे” अशा धरसोड वृत्तीमुळे उद्धव ठाकरेंचे राजकारण म्हणजे केवळ स्वार्थाचा संसार उरला असल्याची टीका त्यांनी केली आहे. एका कवितेच्या माध्यमातून त्यांनी ठाकरेंच्या २०१४ ते २०२५ पर्यंतच्या कोलांटउड्यांचा सविस्तर पाढाच वाचला आहे.
‘कभी इधर चला, कभी उधर चला’
केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंच्या बदलत्या भूमिकांवर उपरोधिक टीका करताना ‘फिसल गया’ या गाण्याचा संदर्भ दिला. २०१४ मध्ये भाजपसोबत आणाभाका घ्यायच्या, २०१७ मध्ये ‘युतीत सडलो’ म्हणायचे आणि पुन्हा २०१९ ला ‘देव-देश-धर्मासाठी’ युती करायची, हा ठाकरे यांचा दुटप्पीपणा आता जनतेसमोर उघडा पडला असल्याचे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
२०१४ ते २०२५: युती आणि टीकेचा गोंधळ उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये ठाकरेंच्या राजकीय प्रवासाचा लेखाजोखा मांडला.
२०१४ – लोकसभा भाजपा सोबत आणाभाका
२०१४ – विधानसभा भाजपा शत्रू
२०१५ – पुन्हा भाजपासोबत युती
२०१७ – मुंबई महापालिकाः भाजपासोबत युती करून सडलो, एकदा युती तोडल्यावर पुन्हा युती नाही सांगत युती तोडली.
२०१८ – मनसेचे नगरसेवक पळविले.
२०१९ – लोकसभा, विधानसभा भाजपासोबत युतीः ही देव देश आणि धर्मासाठी झाली आहे
२०१९ – लोकसभा विधानसभा कालावधीत काँग्रेस शरद पवार गटावर सडकून टीका
२०१९ – विधानसभेनंतर मुख्यमंत्री पदासाठी भाजपाशी फारकत
२०१९ – हिंदुत्वाशी फारकत करत ज्यांच्यावर टीका केली त्या काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत आघाडी
२०२० – मनसेवर ‘संपलेला पक्ष’ म्हणत जोरदार टीका
२०२१-२२ – संभाजी ब्रिगेड, प्रकाश आंबेडकर, डावे पक्ष अशा अनेकांशी युती आघाडीची घोषणा
२०२४ – लोकसभा निवडणूकीत मनसे आता गुनसे म्हणजे ‘गुजरात नवनिर्माणसेना झाला’ अशी टीका…
२०२५ – आता त्याच मनसे सोबत युती
राजकीय स्थैर्य हरवलेला नेता
“उद्धव ठाकरेंकडे ना कोणता निर्धार आहे, ना कोणते धोरण,” अशी घणाघाती टीका करताना उपाध्ये यांनी म्हटले की, गेल्या १० वर्षांत त्यांनी फक्त मित्र बदलले आणि निष्ठा गहाण ठेवली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंची ही ‘फिसल गया’ वृत्ती त्यांना महागात पडेल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे.