Saturday, August 23, 2025

माओवादाची शहरी केंद्रे राष्ट्रीय सुरक्षेला धोका – प्रफुल्ल केतकर

Share

लोकशाही व्यवस्थांवरील विश्वास उडवणारा माओवाद आता शैक्षणिक संस्थांपासून राजकीय पक्षांपर्यंत येऊन पोहोचला आहे. येत्या काळात माओवादाची शहरी केंद्रेच राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका ठरतील, असे मत ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी व्यक्त केले.

फर्ग्युसन महाविद्यालयातील ॲम्फी थिएटरमध्ये देवर्षी नारद माध्यम पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ‘प्रसार माध्यमे आणि राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर ते बोलत होते. विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माध्यमकर्मींचा सन्मान करण्यात येतो. यंदा ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता (डीन) आणि वृत्तपत्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट यांना सन्मानित करण्यात आले. तसेच आश्वासक पत्रकारितेसाठी माध्यम छायाचित्रकार प्रशांत खरोटे, बातमीदार सतीश वैजापूरकर आणि आरजे शोनाली यांना तर समाजमाध्यमातील डिजिटल लिट्रसी संदर्भातील आशय निर्मितीसाठी मुक्ता चैतन्य यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला व्यासपीठावर केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, डीईएसचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, संचालक मिलिंद कांबळे उपस्थित होते.

राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ सीमा किंवा राज्याच्या सुरक्षिततेशी निगडित राहिलेली नाही, तर ती अंतर्गत धोक्यांशीही निगडित आहे, असे मत श्री. केतकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेचे परिदृश्य पूर्णतः बदलले आहे. लोकशाहीवरचा विश्वास खिळखिळा करण्यासाठी ‘डेमोक्रॅटीक स्पेस’चाच वापर करण्यात येतो आहे. म्हणूनच शहरी माओवाद हा राष्ट्रीय सुरक्षेला सर्वात मोठा धोका असल्याचे डॉ. मनमोहन सिंग यांनी देखील सांगितले होते. ” चांगल्या पत्रकारितेसाठी राष्ट्रीय दृष्टी विकसित करणे ही पूर्वअट असल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली.

पुरस्कारार्थींच्या वतीने डॉ. संजय तांबट यांनी मनोगत मांडले. ते म्हणाले, “पत्रकाराची सामाजिक, वैचारिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी कोणतीही असली तरी तो माध्यम संस्थेचा पत्रकार असतो. त्याच्या वाट्याला येणाऱ्या भूमिका तो प्रामाणिकपणे करतो. म्हणूनच पत्रकारिता हा धर्म आहे.” पुरस्काराचे उत्तरदायित्व म्हणून पत्रकारितेतील भारतीय ज्ञान परंपरांचा अभ्यास आम्ही करू, असेही ते म्हणाले. “राष्ट्रासाठी हितकारक गोष्टी माध्यमांमध्ये रुजविण्याचे कार्य विश्व संवाद केंद्र करत असून, माध्यमांनीही राष्ट्रीय सुरक्षेचा विचार गंभीरपणे करायला पाहिजे,” असे मत अभय कुलकर्णी यांनी प्रस्तावनेत व्यक्त केले.

आध्यात्मिक लोकशाही हा भारतीयत्वाचा आधार – प्रफुल्ल केतकर
भारत एक चिरंतन सनातन राष्ट्र आहे. त्याची एक विश्वदृष्टी असून, काही एक मूलभूत मुल्य आहेत. त्यांचे रक्षण करणे म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा आहे, असे प्रतिपादन प्रफुल्ल केतकर यांनी केले. ते म्हणाले, “भारताच्या रक्षणाचा मूलभूत आधार केवळ राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक लोकशाही नाही. तर आध्यात्मिक लोकशाही आहे. जो पर्यंत भारताचे भारतीयत्व आहे, राष्ट्रीयत्व आहे. तो पर्यंत भारतामध्ये प्रत्येकाला आपला ईश्वर निवडण्याचा अधिकार आहे.”

अन्य लेख

संबंधित लेख