Sunday, July 14, 2024

तेजस ठाकरेंच्या नृत्यावर भाजपा नेत्याचा निशाणा

Share

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा सुपूत्र अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Marchant) ही जोडी 12 जुलै दिवशी मुंबई मध्ये विवाहबंधनामध्ये अडकणार आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नापूर्वीच्या संगीत कार्यक्रमात मित्र मंडळींच्या एका ग्रुप डान्स मध्ये राज्याचे माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याचे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) देखील मागच्या रांगेत बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकताना दिसले आहेत. सारा अली खान, अनन्या पांडे, वीर पहाड़िया सोबत शाहरूख-काजेलच्या कभी खुशी कभी गम चित्रपटातील ‘ये लडकी हाय अल्लाह…’ गाण्यावर तेजस देखील नाचताना दिसले आहेत. तेजसच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात तुफान वायरल होत आहे. यावरून भाजपा (BJP) मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत तेजस ठाकरेंवर निशाणा साधला.

“जो मराठी तरुण “गोविंद रे गोपाळा” म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही.. ज्याचे पाय कधी गणेशोत्सवाच्या मिरवणूकीत थिरकले नाहीत. जो होळीला “आयना का बायना..” म्हणताना कधी दिसला नाही. “गणा धाव रे… मला पाव रे..” म्हणत जाखडी नृत्यात कधी त्याने कोकणी ठेका धरला नाही.. तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला. हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात “धकधक” झाले”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

तेजस ठाकरेंच्या नृत्यावरून आशिष शेलारांनी संजय राऊतांनाही आपल्या निशाण्यावर घेतले. ते म्हणाले की, “हे नृत्य पण कसे जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक..वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे ‘संजयकाका’ महाराष्ट्राला पटवून देतीलच,” असा टोला त्यांनी लगावला.

अन्य लेख

संबंधित लेख