Sunday, May 26, 2024

माझ्या मतानं लिहिलं जाणारं काव्य

Share

मतदान जागरूकतेने का करायचे हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवे. मतदान हे आपले कर्तव्य आहे आणि अधिकारही आहे. हे कर्तव्य प्रत्येकाने बजावायलाच हवे.

आज भल्या पहाटे जागा झालो. म्हणजे स्वप्नाने जागं केलं.
मला पडलेलं पहिलं गद्य स्वप्न. रूक्ष स्वप्न.
अन्यथा मला पडणारी स्वप्नं म्हणजे एक नितळ काव्य असते.
भरभरून, रसरसून उत्साहीत व्हावं अशी स्वप्नं असतात ती.

नेहमी पडणाऱ्या स्वप्नांमध्ये हिमालयातील बर्फाच्छादित शिखरं असतात.
एकदा कैलास पर्वतावर जाऊन आलो होतो.
कधी नखशिखांत भिजवणारा पाऊस दिसतो.
कधी गरम कणीस खात असतो.
वयाचा तर मागमूस नसतो.
तीस-चाळीस वर्ष तर आयुष्यातील भुर्र उडालेली असतात.
ते काळेभोर केस परत डोईवर धड बसलेले असतात.

कधी इतरही काही विषयांची स्वप्न असतात.
त्यात पुलवामात डोहलांना सल्ला देतो.
३७० कलम हटवण्यासाठी बैठक सुरू आहे आणि ती माझ्या सोबत होत आहे.
कधी मंदिराच्या स्थापत्य कथा मी सांगत असतो.
मुलाचं मेडल वगैरे ही तर नेहमीची बाब असते.

पण आज काय घडलं ? आजचं स्वप्न साधं, सरळ गद्य.
एक कोणीतरी व्यक्ती बोलत होती. बहुदा शाळेचे शिक्षक असावेत.
ते बोलत होते. मी ऐकत होतो. ते समोर बसलेल्यांना सांगत होते,
मतदान केलंच पाहिजे, सुट्टी म्हणून पळून जायचं नाही.
नोटा दाबून अराजकाला साथ द्यायची नाही.
माझा ध्येयवाद आणि पक्ष, उमेदवार यांची सांगड घालायची.
देशहित सर्वोपरि हवे. चर्चा विकासावर हवी. ३७० कलमावर, सीएए वर हवी.
सुरक्षेवर हवी, तंत्रज्ञानावर हवी, तरूणांच्या नोकरी धंद्यावर हवी.
राम मंदिर निर्मितीवर हवी, स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या स्वप्नावर हवी.
ताठ मानेने जगभर फिरणारा तरूण दिसेल ना, या चिंतेवर हवी.

असं साधं, सरळ निरूपण झालं त्यांचं. स्वप्न संपलं, जाग आली.
आता विचार करत आहे. साधं, सरळ गद्य स्वप्न असेल, पण जर असं घडलं,
तर ते भावी भारत नावाचं एक काव्यच असेल. माझ्या मतानं लिहिलं गेलेलं.

केवढा मोठा विचार त्या निरुपणातून मिळाला.
मी करणार मतदान… आपण सर्वचजण करू या मतदान.
सुंदर स्वप्नवत भारतासाठी.

सुनील देशपांडे
(लेखक विविध सामाजिक विषयांवर लेखन करतात. ते ब्लॉगरही आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख