Tuesday, December 3, 2024

मराठी रंगभूमीचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

Share

मराठी नाटकाचा उगम विविध लोककलांपासून झाला. त्या त्या काळातल्या लोकजीवनाच्या प्रभावाने नाटकांचे विषय बदलत गेले, नाट्यसादरीकरणाची पद्धत बदलत गेली म्हणून प्रत्येक काळातले नाटकही बदलत गेले. तामिळनाडूमधील तंजावर येथे सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात मराठीतून काही नाटके लिहिली गेली, सादरही झाली. त्यांना मराठी भाषेतील आद्य नाटके म्हणावे लागेल. शहाजीराजे भोसले, प्रतापराव भोसले आणि सर्फोजी भोसले ह्या तीन राजांनी विपुल नाट्यलेखन केले. उदा. सीताकल्याण, लक्ष्मीनारायणकल्याण, श्रीकोर्वंजी.

विष्णुदास भावे
१८४३ साली सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पाठबळावर भावे यांनी सीता स्वयंवर या नाटकाचा पहिला खेळ राजवाड्यातील मोठ्या ‘दरबार हॉल’मध्ये दि. ५ नोव्हेंबर १८४३ रोजी केला. ९ मार्च १८५३ रोजी मुंबईला ‘ग्रांट रोड थिएटर’ येथे ‘इंद्रजित वध’ हा पहिला नाट्यप्रयोग केला. या काळातले जवळपास प्रत्येक नाटक राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या सजग होते. त्या काळातल्या पुढील नाटकांची नुसती नावे पाहिली तरी हे लक्षात येईल.
अधिकारदान विवेचना अथवा स्थानिक स्वराज्याविषयी वाटाघाट – लेखक शंकर मोरो रानडे – १८८२, संगीत स्वराज्यसुंदरी – अनंत हरी गद्रे (पुणे) – १९१९, सत्तेचे गुलाम – मामा वरेरकर – १९२२, संगीत संन्याशाचा संसार – मामा वरेरकर – १९२०. याशिवाय · स्वातंत्र्य आले घरा, स्वदेशहितचिंतक, स्वदेशी चळवळ, वंदे मातरम ही राजकीय / सामाजिक नाटकेही त्या काळात लिहिली गेली/प्रदर्शित केली गेली.
(संदर्भ: “मराठी रंगभूमीच्या तीस रात्री (एक सामाजिक-राजकीय इतिहास) खंड पहिला – लेखक मकरंद साठे – पृष्ठ क्र. १३९) अशा रीतीने स्वातंत्र्यपूर्व काळात नाटक हे साम्राज्यवादी शक्तींविरुद्ध वापरायचे एक हत्यारच झाले होते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

लोकमान्य टिळकांचा मराठी नाटकाशी संबंध अनेक पातळ्यांवर होता. १८८० ते १९२० पर्यंतचे मराठी नाटकही पूर्ण टिळकमय झालेले होते. उ. दा. गोपाळ गोविंद सोमण यांचे “राजकोपहर” आणि “बंधविमोचन” ही नाटके प्लेग, रँड आणि दुष्काळातील टिळकांची भूमिका यावर होती. “संयुक्त संगीत मानापमान” चा प्रयोग दि. ८ जुलै १९२१ रोजी गांधीजींनी टिळकांसाठी काढलेल्या स्वातंत्र्यफंडासाठी केला गेला.

नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
हे टिळकांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातले होते. त्यांनी केसरीत काम केले. १९०१ मध्ये ‘गनिमी काव्याचे युद्ध’ ही लेखमाला लिहिली. “कीचकवध” हे खाडिलकरांचे राजकीयदृष्ट्या सर्वात गाजलेले नाटक. नाटकातला कीचक म्हणजे लॉर्ड कर्झन, भीम म्हणजे जहालवादी नेते लोकमान्य टिळक, संयम, सबुरी इत्यादींचे सल्ले सतत भीमाला देणारा युधिष्ठिर म्हणजे मवाळवादी नेते गोपाळकृष्ण गोखले आणि द्रौपदी म्हणजे भारतमाता. ब्रिटिश सरकारने अखेरीस या नाटकावर बंदी घातली.

गोविंदराव सदाशिव टेंबे
हे स्वतः गांधीवादी होते. त्यांनी “संगीत पट-वर्धन” नावाचे नाटक द्रौपदी हे मुख्य पात्र डोळ्यासमोर ठेऊन लिहिले. “पट” म्हणजे वस्त्र, आणि “वर्धन” म्हणजे वाढवणे. टेंब्यांसाठी हे वस्त्र म्हणजे खादीच्या प्रसाराचे एक निमित्त होते. या नाटकातून टेंब्यांनी स्वदेशीचा प्रचार केला.

राम गणेश गडकरी
गडकऱ्यांची लोकमान्य टिळकांवर भक्ती होती, नाटक कंपनीचे नावही “बळवंत संगीत मंडळी” असे होते. गडकऱ्यांनी “गर्वनिर्वाण” हे नाटक कर्झनशाहीच्या विरोधात लिहिले. ब्रिटिश सत्तेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा घातल्याने आणि नाटक कंपनीतील कलहामुळे नाटक सादर होऊ शकले नाही.

भार्गवराम विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर
वरेरकरांनी कोकणात लोकप्रिय असलेल्या खजिनदार तमाशाला झाशीची राणी आणि वासुदेव बळवंत फडके अशा देशभक्तांबद्दल संवाद लिहून त्यांचे तमाशातून सादरीकरण केले होते. जेंव्हा ब्रिटिश सरकारने नाटकांवर कर आकारणी सुरु केली त्यानंतर वरेरकरांनी “करग्रहण” नावाचे नाटक लिहून त्याचा निषेध केला. “संन्याशाचा संसार” हे नाटक इंग्रज घडवत असलेल्या ख्रिश्चन धर्मांतराविरोधात होते.

विनायक दामोदर सावरकर

त्यांना रंगभूमी कलाकारांचे स्वातंत्र्यलढ्यातील मेरुमणी म्हटले तरी वावगे होणार नाही. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. या काळातले सावरकरांचे प्रमुख कार्य म्हणजे मित्रमेळ्याची स्थापना. कालांतराने याचे रूपांतर “अभिनव भारत” या संघटनेत झाले. इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ सावरकरांनी लिहिला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. १८९८ साली सावरकरांनी “चापेकर फटका” ही काव्यकृती लिहिली. त्यातील दोन ओळी अशा :-
भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे।
गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥

सावरकरांनी एकूण ३ नाटके लिहिली. “संगीत अुःशाप” (१९२७), “संन्यस्त खड्ग” (१९३१) आणि “संगीत अुत्तरक्रिया” (१९३३).
संन्यस्त खड्ग – या नाटकाचा काळ इ.स. पूर्वी ६व्या शतकातील आहे. अहिंसेच्या अतिरेकापेक्षा दुष्ट शत्रूचे निर्दालन करणेहेतू प्रसंगी शस्त्रही हाती धरायला पाहिजे हा संदेश सावरकर नाटकातून देऊ इच्छितात.
संगीत अुत्तरक्रिया – पानिपतच्या पराभवानंतर खचलेल्या मराठ्यांना एक वेडी महिला “मला पानिपतची उत्तरक्रिया करायची आहे, त्यासाठी मला दळभार (सैन्य) दे” अशी विनंती करून परत एकदा मुघल साम्राज्याविरुद्ध लढायचे स्फुरण देते हा आशय घेऊन सावरकरांनी हे अप्रतिम नाटक लिहिले आहे.

वीर वामनराव जोशी
सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘राष्ट्रमत’ ह्या वृत्तपत्रात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम केले. लोकजागृतीसाठी त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक चालवले होते. वामनरावांच्या काव्यरचनाही जीवनविषयक तत्वज्ञान सांगून जातात. उदा.
चाटता पाय परक्यांचे
धर्म काय हा तुमचा ।। धृ ।।
शत्रूचे गुलाम बनता
शत्रूला सलाम करता
मायदेश ठार करता ।। १ ।।
आप्तधन खुशाल हरता
शत्रूच्या घरात मरता
श्वानसे जनात फिरता ।। २ ।।

वामनरावांनी एकूण ५ नाटके लिहिली.
राक्षसी महत्त्वाकांक्षा – जनतेच्या आकांक्षांपुढे व्यक्तिगत राक्षसी महत्वाकांक्षेचे महत्व नसते. सर्वसामान्य जनतेचे सुख महत्वाचे, राज्यकर्ते त्यासाठी प्रयत्नशील असावेत. हा विषय वामनरावांनी या नाटकात समर्थपणे हाताळला आहे. या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.
संगीत रणदुंदुभी – पारतंत्र्यातील विलासापेक्षा स्वातंत्र्यासाठी लढताना येणारे मरण हे कैक पटींनी श्रेष्ठ आहे. हे सगळं “रणदुंदुभी” हे नाटक प्रेक्षकांच्या मनावर बिंबवून जाते. नाटकाची नायिका तेजस्विनी हिच्या तोंडी या नाटकातील अत्यंत गाजलेले पद आहे:
परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लागला ।।
सजिवपणी घडती सारे | मरण भोग त्याला ।। धृ ।।
असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ।। १ ।।
सौख्य-भोग इतरां सारे । कष्ट मात्र त्याला ।। २ ।।
मातृभूमी त्याची त्याला । होत बंदिशाला ।। ३ ।।

धर्मसिंहासन – राज्यकर्त्यांपेक्षा जनता श्रेष्ठ. धर्मकारण आणि राजकारण एकत्र नांदले पाहिजेत. स्वातंत्र्याच्या लढ्यात संन्याशांनीही मागे राहता कामा नये. असा संदेश वामनरावांनी या नाटकाद्वारे दिला.

विष्णू वामन शिरवाडकरतथा कुसुमाग्रज
१९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचा सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे.अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला.

कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर ऊर्फ मास्तर कृष्णराव
त्यांनी रचलेले ‘झिंजोटी/झिंझोटी’ रागातील वंदे मातरम् अनेकानेक विविध चाली लावून, त्यातल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी स्वतंत्र भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरूंची भेट घेऊन, संसदेत प्रात्यक्षिके दिली. ‘वंदे मातरम्’ ला भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गीत म्हणून अधिकृत दर्जा देण्यात आला.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून मास्तर कृष्णरावांनी संपूर्ण बुद्ध वंदना सांगीतिक रचनेमध्ये बसवली.

अशा सर्व ज्ञात आणि अज्ञात कलाकारांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त्ताने मनःपूर्वक अभिवादन. जयहिंद !

धनंजय रघुनाथ सप्रे
(लेखक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि ब्लॉगर आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख