Thursday, August 27, 2026

नेपाळवरील संकटातून धर्मांतराचे पीक

Share

विशेष लेख

नेपाळवर संकट कोसळताच ख्रिस्ती मिशनऱ्यांचे बाहू स्फुरण पावू लागले. इतके की आता हे नवीन पीक कापणीला आल्याच्या बाता उघडपणे मारल्या जाऊ लागल्या. नैसर्गिक संकट ही आपल्या धर्मप्रसाराची संधी वाटणे, ही खऱ्या धार्मिकतेची आणि नैतिकतेची क्रूर विटंबना आहे. ख्रिस्ती मिशनरी तीच करीत आहेत..

नेपाळ सध्या एका मोठ्या दुर्दैवी, नैसर्गिक संकटात सापडला आहे. पुराच्या भीषण लाटांनी विस्कटलेली आयुष्ये, ढिगाऱ्याखालून निघणारे मृतदेह आणि बेपत्ता लोकांचा शोध घेत असलेले असंख्य सामाजिक कार्यकर्ते… हे सगळेच दृश्य विषण्ण करणारे आहे. परंतु, या भीषण शोकांतिकेच्या सावलीतच एका वेगळ्याच उपक्रमाची चाहूल लागली आहे- या नैसर्गिक आपत्तीच्या वेदनांना आणि व्यथांनाच धर्मांतराची सुवर्णसंधी मानणे आणि तसे प्रयत्न लगेच सुरू करणे…

या ताज्या नैसर्गिक दुर्घटनेचे स्वरूप भीषण आहे. पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने अनेक वस्त्यांच्या वस्त्या आणि सगळ्या सोयीसुविधा, रस्ते, इमारती वाहून नेल्या. अशा संकटप्रसंगी, कोणत्याही धर्माच्या किंवा पंथाच्या लोकांनी प्रार्थना करणे अथवा मानवतावादी मदत पुरवणे ही कौतुकास्पदच गोष्ट आहे. अमेरिकी दूतावासाने ख्रिश्चन धर्माच्या काही संस्थांच्या माध्यमातून दिलेला पाच लाख डॉलर्स म्हणजे साधारण भारतीय चलनातील पाच कोटी रुपयांचा निधी हा नेपाळमध्ये आलेल्या मदतीचा भाग आहे. त्याचे स्वागत व्हायला हवे.

मात्र, या आपदेनंतर समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या काही ख्रिश्चन मिशनरी संदेशांमध्ये या दुर्घटनेचे वर्णन थेटपणे ‘मिशन फील्ड’ किंवा ‘धर्मांतराची संधी’ असे केले आहे. नैसर्गिक आपत्तीचा उल्लेख करताना अनुकंपेची जागा जेव्हा धार्मिक गणिते घेतात, तेव्हा मानवी संवेदना आणि धर्मांतराची कारस्थाने यांच्यातली भेदरेषाच पुसली जाते.

एका अहवालात तर एका बाजूला ख्रिश्चन कुटुंबाला वाचविल्याचा उल्लेख आहे, तर दुसरीकडे हिंदू यात्रेकरूंच्या मृत्यूशी त्याची तुलना केली आहे. ही केवळ एकांगी बातमी नाही; तर ‘आमचाच देव वाचवतो’ हा सूक्ष्म, पण विषारी धार्मिक प्रचार आहे. मदतीचा हात देणाऱ्यांचे आभार मानणाऱ्या असहाय पीडितांची कृतज्ञता म्हणजे त्यांची धर्मांतराला असणारी संमती मानणे, ही कुठली नैतिकता आहे? हा तर सरळ सरळ धर्मप्रचाराचा भोंदू डाव आहे.

अर्थातच, नेपाळसाठी हा प्रकार नवा नाही. सन २०१४ च्या भीषण पुरातही मिशनरी संस्थांनी ‘पुरामधून सुवार्तेच्या (Gospel) नव्या संधी निर्माण झाल्या आहेत,’ असे उघडच म्हटले होते. सन २०१५ च्या भूकंपानंतरही ‘सोल हार्वेस्टिंग’चा (धर्मांतर) असाच प्रकार घडला होता. नेपाळची बहुतांश ओळख हिंदू आणि बौद्ध संस्कृतीत रुजलेली आहे. नैसर्गिक आपत्ती ही ओळख पुसू शकत नाही.

भारताने घटनेच्याच दिवशी तातडीने सी-१३०जे विमानाने १० टन आपत्कालीन मदत, औषधे आणि इतर साहित्य पाठवून शेजारधर्म निभावला. आज नेपाळला औषधे, अन्न आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणाऱ्या बचाव पथकांची गरज आहे. आपल्यावरील संकटाचे रूपांतर धार्मिक प्रचारफेरीत व्हावे, किंवा आपल्या मृतदेहांची आकडेवारी मिशनऱ्यांच्या अहवालात नोंदवली जावी, अशी नेपाळची अपेक्षा नाही.

प्रार्थना करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि मदत करण्याचाही. परंतु, इतक्या मोठ्या, अस्मानी शोकांतिकेचा वापर धर्मांतराचे दालन उघडण्यासाठी केला जाणे, ही मानवतेची विटंबनाच आहे.

मदत आधी पीडिताच्या हातापर्यंत पोहोचली पाहिजे; ‘सुवार्ता’ त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचवण्याची घाई नको!

अन्य लेख

संबंधित लेख