परदेशात राहूनही आपली संस्कृती, परंपरा आणि सणांमधील आपुलकी कशी जपली जाते, याचं एक भावस्पर्शी चित्र या लेखातून रेखाटलं गेलं आहे. शारजा आणि दुबईसारख्या आधुनिक शहरांमध्ये राहणारी मराठी माणसं गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात, जुन्या आठवणींना उजळा देतात आणि मायभूमीची संस्कृती जपतात. दूरच्या देशात साजरा होणारा हा गणेशोत्सव, तिथली भक्ती, आपुलकी आणि संस्कृतीचा गोडवा मांडणारा हा विशेष लेख…
मोहन कान्हेरे (शारजा, यूएई)
गेल्या २७ वर्षांत शारजा आणि दुबई या ठिकाणी माझं मोजून १६ वेळा येणं झालं. इथे रमायला झालं. दरवेळी अविस्मरणीय असं काहीतरी पाहायला मिळालं आणि परत परत या देशाला भेट द्यावी असं वाटायला लागलं. चौकसपणे इथलं लोकजीवन जवळून पाहिलं. या देशातली मराठी माणसं एकमेकांशी आपुलकीने, जिव्हाळ्याने वागताना पाहिली. इथे पुण्या-मुंबईहून आलेल्या कलाकारांचे अनेक कार्यक्रम पाहिले. मराठी नाटकं, शास्त्रीय संगीताच्या बैठका. सर्वत्र हजेरी लावली. काही ना काही निमित्ताने मराठी समाजात बऱ्यापैकी माझा वावर झाला. जिव्हाळ्याचे मित्र जोडले गेले. “या वर्षी तरी गणपतीला या,” असा आग्रह मुलीने आणि जावयाने केला. मग मी मुंबईत कसला राहतोय. बॅग भरायला घेतली.
चार दिवसांपूर्वी इथे आलोय, कारण माझ्या मुलीच्याच घरी गणरायांचं दहा दिवसांसाठी आगमन होणार आहे. गणपती उत्सव जवळ आल्याने इथल्या अनेक दुकानांमध्ये, व्यापारी संकुलांमध्ये (मॉलमध्ये) गणरायांच्या आकर्षक मूर्ती आणि सजावटीचं उदंड साहित्य आलं आहे. दोन दिवसांपूर्वी मी एका दुकानामध्ये उत्तमरीत्या मांडलेल्या मूर्ती पाहत होतो. माझ्या बाजूला एक छोटा मुलगा त्याच्या बाबांबरोबर आला होता. ते मराठीत बोलत होते. त्या छोट्या मुलाने एका मूर्तीसमोर उभं राहून नमस्कार केला, तेव्हा बाबांनी त्याला पायातले शूज काढायला लावले आणि परत एकदा नमस्कार करायला लावला…

बरीच आर्थिक उलाढाल
दुबई-शारजामध्ये गणरायाच्या नेत्रदीपक मूर्ती मोठ्या आणि प्रतिष्ठित दुकानांतून मांडलेल्या आहेत. त्या भक्तिभावनेने पाहणं हेसुद्धा बऱ्याच जणांकडून नकळत होत असतं. सर्व मूर्ती मुंबईहून मागवल्या गेल्या आहेत, असं दुकानदार सांगतात. दैनंदिन खरेदीसाठी येणारे भारतीय या मूर्तींसमोर आवर्जून थांबतात, त्यांचं दर्शन घेतात, मूर्तिकाराची तारीफ करतात आणि बरेच जण या वर्षीपासून तरी आपण घरी गणपती आणायचा असं मनाशी ठरवतात. या दिवसांत आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते.
यूएई हा समृद्ध आणि सतत प्रगतिपथावर असलेला देश आहे. मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे स्नेही यशोधन बोरकर यांच्या घरी गणरायांचं आगमन होणार आहे. आमच्या घरापासून चालत जाण्याइतपत अंतर आहे. त्या निमित्ताने दोन्ही घरांतून होणाऱ्या अनौपचारिक स्नेहमिलनाची मला खूप आस आहे. गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने होणारा हा संवाद नाती पक्की करतो. परक्या भूमीवरही मराठी किंवा भारतीय माणूस एकमेकांशी जोडला जातो.
गणपती दर्शनाला दुरून दुरून गाड्या घेऊन आमचे स्नेही सहकुटुंब येतात. आमच्याकडे गणपती दर्शन घेतल्यानंतर बोरकरांच्या घरी जातात. सर्वच शिकलेले आणि उच्चभ्रू! त्यामुळे वातावरण सुरुवातीला जरा दबलेलं असतं. एखादा कोणीतरी हलकंफुलकं बोलतो आणि वातावरण थोडंसं मोकळं होतं. अनेक प्रौढ मंडळींना आपलं बालपण आठवतं, त्या काळातले गणपती उत्सव आठवतात आणि स्मृतिरंजन होतं…
बुफे पद्धतीचं जेवण सर्वांसाठी!
हमखास आवर्जून मोदक मागवले जातात. घरगुती पद्धतीचे मोदक पुरवणाऱ्या काही महिला इथे आहेत. आमच्या ओळखीच्या एका महिलेने नऊशे मोदक मागच्या वर्षी केले होते. माझ्या मुलीच्या घरीसुद्धा त्यांच्याकडून मोदक येतात. सर्वांना ते आवडतात. बरेच जण कार्यालयात (ऑफिसमध्ये) मोदकांचं हौसेने वाटप करतात. दक्षिण भारतीय कुटुंबांतूनसुद्धा, घरात गणपती असो वा नसो, मोदकांची मागणी (ऑर्डर) त्या महिलांना मिळते… रामशरण, हरिप्रसाद अशांची मिठाईची भलीमोठी दुकानं आहेत. खव्याच्या सुगंधी मोदकांपासून तिथे सर्व काही मिळतं.
इथली घरं बऱ्यापैकी मोठी असतात, त्यामुळे एकावेळी १५-२० माणसं मजेत सामावतात. गप्पागोष्टींना उधाण येतं. जपून ठेवलेला कुर्ता-पायजमा घातलेली शाळकरी मुलं शाळेतली प्रार्थना, गाणी गाऊन दाखवतात. इथल्या मुकेश आणि रफींना मग कंठ फुटतो… काही जण खरंच छान गातात हे नमूद केलं पाहिजे.
निमित्त गणपतीचं… उखाण्यांचा जल्लोष…
नव्याने लग्न होऊन इथे आलेल्या मुलींना बोरकरांच्या घरी उखाणा घ्यायला लावतात. उच्चशिक्षित असलेल्या त्या, चक्क लाजतात, संकोच करतात. सर्वांचंच मग मनोरंजन होतं. लक्षात राहिलेला एक नमुना सांगावासा वाटतो.
अनघा बोरकर यांच्या घरचा गणपती. त्यांनाही उखाणा घ्यायला लावला. त्या म्हणाल्या,
“आपली माणसं, संस्कार आपले
दूरदेशी राहून नात्यांना जपले
बाप्पाच्या भक्तीत, दहा दिवस रमले
यशोधन यांचं नाव घेते, आज थोडी दमले”
अशा वेळी हास्य-विनोदांना उधाण येतं. शाळा-कॉलेजमधल्या आठवणी आवर्जून सांगितल्या जातात. “तुला शिकवीन चांगलाच धडा” ही कविता साभिनय सादर करणाऱ्या एक-दोन मुली असतातच…
भोजनाची व्यवस्था होईपर्यंत आलेल्या महिला बराच हास्य-विनोद करतात. एकमेकींच्या साडीची तारीफ करतात. कोणाकोणाची मुले/मुली आता लग्नाची आहेत, त्याची आडून-आडून चाचपणी करतात. अशा अनौपचारिक गप्पांमधून लग्नंही जमत असावीत…
येणारी शाळकरी मुलं कुर्ता-पायजमा घालून येतात आणि माफक दंगा करतात… पु. ल. देशपांडे यांचे किस्से आणि हास्यजत्रेतले बरेच विनोद सांगितले जातात. वातावरण सुगंधी आणि अनौपचारिक होऊन जातं, जे सुरुवातीला अतिशय औपचारिक (‘हायली सोफिस्टिकेटेड’) असतं… मागच्या वर्षी गाणं शिकलेल्या दोन विवाहित तरुणी आमच्या घरी आल्या होत्या. त्यांनी दीड तासाची सुरेल मैफल जमवली… दोन रिकामे डबे घेऊन मी त्यावर ताल धरला. अशा प्रकारे तबलावादनाची संधी मिळाली… आवर्जून सांगितलं पाहिजे की इथे मोजक्या घरांत भारतीय वाद्यं असतात आणि ती वाजवणारी शिकाऊ मुलं मन लावून रियाज करतात…
बाप्पाचं विसर्जन…
बहुतेक घरी दहा दिवसांचा उत्सव असतो. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाजूच्या तलावांमध्ये मूर्ती नेल्या जातात. गाजावाजा किंवा घोषणा न देता छोट्या बोटींमध्ये मूर्ती बसवून जवळच्या तलावात विसर्जित केल्या जातात… अशा प्रसंगी काही हळव्या महिलांचे डोळे पाणवलेले मी पाहिले आणि मीसुद्धा गंभीर झालो… घरी आल्यावर कॉफीपान असतंच. आणि मग पुन्हा आठवणी काढल्या जातात… पुन्हा एकदा गप्पांची मैफल सजते…
