प्रस्तावना
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त शासकीय व अधिकृत कार्यक्रमांसाठी मूळ रचनेतील सर्व ६ कडव्यांचे गायन करण्याचा नवा प्रोटोकॉल जारी केला. ३ मिनिटे १० सेकंदांच्या या सादरीकरणात राष्ट्रगीताच्या आधी संपूर्ण राष्ट्रीय गीत गायले जावे, असा संकेत ठरवण्यात आला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस कार्यकारिणीने मात्र आपली १९३७ मधील जुनी भूमिका कायम ठेवत अधिकृत कार्यक्रमांमध्ये केवळ पहिली दोनच कडवी गायली जातील, असे नवीन टुमणे काढले आहे. यामुळे राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान आणि तात्कालिक राजकीय सोयीवरून पुन्हा एकदा देशव्यापी चर्चेला तोंड फुटले आहे.
१९३७ मधील काँग्रेस निर्णय
स्वातंत्र्यपूर्व काळात, ऑक्टोबर १९३७ मध्ये काँग्रेसने सर्वसमावेशकतेचा हवाला देत ‘वन्दे मातरम्’ च्या केवळ पहिल्या दोन कडव्यांना सार्वजनिक गायनासाठी स्वीकारले होते. पहिल्या दोन कडव्यांमध्ये निसर्गसौंदर्य, नद्या आणि सुजलाम्-सुफलाम् भूमीचे वर्णन असल्याने त्यावर कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही असे म्हटले गेले. मात्र, तिसऱ्या कडव्यापासून सुरू होणाऱ्या ‘त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी, कमला कमलदलविहारिणी, वाणी विद्यादायिनी…’ या उल्लेखांवरून तत्कालीन राजकारणात धर्मनिरपेक्षतेची खेळी खेळली गेली.
वास्तविक पाहता, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या अभिजात रचनेकडे एक भारतीय म्हणून पाहिले, तर ही कडवी म्हणजे केवळ संकुचित धार्मिक कर्मकांडाचा भाग नसून भारतीय सांस्कृतिक सामर्थ्याची प्रतीके आहेत.
- शक्तीचे प्रतीक (दुर्गा): पारतंत्र्याच्या अंधारातून देशाला मुक्त करण्यासाठी आणि बाह्य संकटांशी मुकाबला करण्यासाठी मातृभूमीचे ‘दशप्रहरणधारिणी’ (शस्त्रसज्ज व शक्तिशाली) रूप रेखाटले गेले.
- समृद्धीचे प्रतीक (कमला/लक्ष्मी): देशातील दारिद्र्य नष्ट होऊन संपन्नता नांदावी, यासाठी भूमीला वैभवाचे रूप मानले गेले.
- ज्ञानाचे प्रतीक (वाणी/सरस्वती): भारताची प्राचीन ज्ञानपरंपरा, विचार आणि प्रज्ञेचा गौरव म्हणून मातृभूमीला विद्यादायिनी म्हटले गेले.
परकीय सत्तेविरुद्ध लढताना समाजाला एकात्मतेच्या आणि पराक्रमाच्या सूत्रात बांधण्यासाठी मातृभूमीला अशा शक्ती, समृद्धी आणि ज्ञानाच्या रूपात पाहणे हे त्या काळातील अस्मिता जागरणाचे अत्यंत प्रभावी माध्यम होते.
सोयीस्कर संकोच
स्वातंत्र्य मिळून पाऊण शतकाहून अधिक काळ लोटल्यानंतरही, राष्ट्रीय गीतातील या उदात्त प्रतीकांची ॲलर्जी वाटणे हे आश्चर्यकारक आहे. ज्या व्यक्तीसाठी ही भूमी केवळ एक जमिनीचा तुकडा नसून खऱ्या अर्थाने ‘वंद्य माता’ आहे, त्याला तिच्या सामर्थ्याचे, वैभवाचे आणि ज्ञानपरंपरेचे गुणगान करताना संकोच वाटण्याचे तिळमात्र कारण उरत नाही. उलटपक्षी, भारतभूमीला मातृवत मानणाऱ्या प्रत्येकासाठी ही रूपके आत्मसन्मानाचा विषय असायला हवीत.
परंतु, १९३७ मधील तत्कालीन राजकीय समीकरणांना २०२६ मध्येही प्रमाण मानणे, हे जुन्याच तुष्टीकरणाच्या आणि संकुचित मानसिकतेचे दर्शन घडवते. जे स्वतःला मातृभूमीचे पुत्र मानतात, त्यांना तिच्या सामर्थ्यशाली रूपाचे वावडे का असावे? निसर्गाचे गुणगान गाताना सोयीस्करपणे मान डोलावायची आणि तिच्या शौर्याचा व अस्मितेचा उल्लेख आला की लगेच धर्मनिरपेक्षतेचा बुरखा ओढायचा, हा दुटप्पीपणा राष्ट्रीय एकात्मतेला पूरक वाटत नाही.
समग्रतेचा स्वीकार हीच खरी राष्ट्रनिष्ठा
मातृभूमी ही काही सोयीनुसार तुकड्या-तुकड्यांमध्ये विभागून वंदन करण्याची संकल्पना नाही; ती संपूर्ण, अखंड आणि अविभाज्य असते. संविधानाच्या मूलभूत कर्तव्यांनुसार, ज्या आदर्शांनी आपल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली, त्यांचे जतन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. अशा वेळी, राष्ट्रीय गीतातील केवळ सोयीस्कर भाग स्वीकारणे हा देशाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाविषयीचा न्यूनगंडच उघड करतो.
‘वन्दे मातरम्’ हे केवळ दोन कडव्यांचे औपचारिक निसर्ग गीत नसून, भारताच्या संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा हुंकार आहे. त्यामुळे या राष्ट्रीय गीतकडे संकुचित राजकारणाच्या चष्म्यातून न पाहता, त्याच्या समग्र सांस्कृतिक तेजासह आणि अभिमानाने त्याचा स्वीकार करणे, हीच या मातृभूमीप्रती खरी कृतज्ञता ठरेल.