Friday, December 19, 2025

मत्स्यव्यवसाय आणि हाय-टेक उद्योगांना मिळणार बळ; डच शिष्टमंडळाची मुख्यमंत्री फडणवीसांशी महत्त्वपूर्ण चर्चा

Share

मुंबई : महाराष्ट्रातील औद्योगिक विकास, व्यापार आणि पायाभूत सुविधांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी राज्य सरकारकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नेदरलँड्सचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी मुंबईत भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर आणि महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींबद्दल चर्चा केली. तसेच व्यापार, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास यावरही चर्चा झाली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “सरकार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या वापराला पाठिंबा देत आहे. नेदरलँड्सच्या सहभागातून मत्स्यव्यवसायासारखे अनेक क्षेत्र विकसित केले जाऊ शकतात”. परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी प्रणाली आणि साहित्य, प्रगत यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि साहित्यातील उच्च-तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या संशोधन आणि विकासात डच योगदानाबद्दल माहिती दिली.

या महत्त्वपूर्ण बैठकीला डच शिष्टमंडळातील राजदूत मोरिसा जेरार्ड्स, वाणिज्य दूत नबिल तौआती उपस्थित होते. तसेच राज्य सरकारच्या वतीने उद्योग विभाग सचिव पी. अनबलगन, सचिव आणि राजशिष्टाचार विभागाचे प्रमुख डॉ. राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण विषयक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. उपस्थित होते.

महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींबद्दल डच शिष्टमंडळाला माहिती देण्यात आली, ज्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्याची शक्यता आहे. ही भेट महाराष्ट्राच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी एक मैलाचा दगड ठरणार असून, आगामी काळात नेदरलँड्स आणि महाराष्ट्र यांच्यात अनेक महत्त्वाचे करार होण्याची चिन्हे आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख