Friday, December 19, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ‘युनेस्को’च्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची बाब – मुख्यमंत्री फडणवीस

Share

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची घटना आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवाधिकारांचे जागतिक प्रवक्ते म्हणून त्यांची ओळख आहे. शिक्षण हे यशाकडे नेणारे साधन आहे हा बाबासाहेबांचा संदेश जगभर पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोला भेटस्वरूपात देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

युनेस्कोला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भेटस्वरूपात अर्पण केल्याबद्दल युनेस्को, पॅरिस येथील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेत आभार मानले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याची ही भारताच्या ८० वर्षांच्या सदस्यत्वातील पहिलीच घटना असल्याचे शर्मा यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने युनेस्कोमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण होणे ही अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक बाब असून, या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन केले.

केंद्र शासनाच्या वतीने शर्मा यांनी २६ नोव्हेंबर २०२५ रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने युनेस्कोमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. या ऐतिहासिक कार्यक्रमाला युनेस्कोचे महासंचालक, ५० हून अधिक देशांचे राजदूत तसेच युनेस्को सचिवालयाचे सदस्य उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आले होते, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमास संबोधित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बाबासाहेबांचा समतेचा संदेश आणि शिक्षणाचे महत्त्व जगभरातील तरूणांपर्यंत पोहोचविण्याचा हा राज्य व केंद्र शासनाचा प्रयत्न होता.

अन्य लेख

संबंधित लेख