मुंबई : राजकीय वर्तुळात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना, भाजपचे नेते आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे गटावर (उबाठा) जोरदार निशाणा साधला आहे. “उबाठा गटाचे आमच्याशी युद्ध सुरू आहे, कारण आम्ही अन्यायाचे शत्रू आहोत,” अशा शब्दांत भातखळकरांनी उबाठा गटाच्या टीकेचा समाचार घेतला.
‘खोटारडा माणूसही कधीतरी खरं बोलतो’
सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना भातखळकर म्हणाले की, “अप्रामाणिक आणि खोटारडा माणूस सुद्धा कधी कधी चुकून खरे बोलून जातो. म्हणे उबाठावाल्यांचे ‘अन्यायाच्या शत्रू’ सोबत युद्ध सुरू आहे. हो, आम्ही आहोतच अन्यायाचे शत्रू!” उबाठा गटाकडून भाजपचा उल्लेख ‘अन्यायाचे शत्रू’ असा केल्याचा संदर्भ घेत त्यांनी हा उपरोधिक टोला लगावला.
आमदार भातखळकर यांनी यावेळी थेट ‘ठाकरे कंपनी’वर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, ठाकरे गटाने मराठी माणसावर अन्याय केला आहे. गेल्या अनेक वर्षांच्या सत्तेत ठाकरे कंपनीने मुंबईकरांच्या हक्कावर गदा आणली आणि त्यांच्यावर अन्याय केला. उबाठा गटाचे आमच्याशी युद्ध सुरू आहे कारण ते स्वतः ‘न्यायाचे शत्रू’ आहेत, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
निवडणुकीच्या निकालानंतर आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भातखळकर यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. मुंबईच्या प्रश्नावरून आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून भाजप आता उबाठा गटाला घेरण्याच्या तयारीत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.