Saturday, December 27, 2025

‘मी खरा वाघ, कागदी नाही!’; राज ठाकरेंच्या ‘दानव’ टोल्यावर रावसाहेब दानवेंचा भीमटोला

Share

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही युती जाहीर केली. मात्र या पत्रकार परिषदेत युतीच्या घोषणेसोबतच राजकीय शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली. उद्धव ठाकरेंना भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांनी मध्येच प्रतिक्रिया देत, “उत्तरं देवाला दिली जातात, दानवांना नाही,” असा टोला लगावला. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली.

दरम्यान, या टोल्यावर भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जोरदार प्रत्युत्तर दिले. ठाकरे बंधू एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त करताना दानवे म्हणाले की, “आता पुन्हा पुढच्या काळात वेगळे होण्याची वेळ येऊ नये, असं त्यांनी वागावं.” त्यांनी २०१९ आणि २०२४ च्या निवडणुकांनंतर उद्धव ठाकरे यांनी केलेल्या “अनैसर्गिक युती”वर टीका केली. भाजप सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेलेले सरकार राज्यातील जनतेला आवडले नाही, त्यामुळे सत्तांतर झाले, असे दानवे यांनी सांगितले.

दानवे यांनी पुढे आरोप केला की, ठाकरे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांना सोडून गेले. “एकीकडे युतीची पत्रकार परिषद सुरू होती, तर दुसरीकडे कार्यकर्ते पक्ष सोडत होते,” असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्यावर “पक्षात कोणी विचारत नाही” अशी टीका केल्यानंतर, दानवे यांनी तीव्र शब्दांत उत्तर दिले. “भाजपाने मला सभापती, आमदार, खासदार, दोनदा केंद्रीय मंत्री आणि राज्यात पक्षाध्यक्ष केलं. मला पक्षात कोणी विचारत नसतं, तर हे शक्य झालं असतं का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच आपला मुलगा तिसऱ्यांदा आमदार असल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

राज ठाकरे यांच्या ‘दानव’ या शब्दावर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले की, “दोन्ही भावांवर एकाच वेळी टीका नको. त्यांचं एकदा होऊन जाऊ द्या.” त्यांनी पुन्हा एकदा भाकीत करत सांगितले की, हे पक्ष निवडणुकीनंतर टिकणार नाहीत, कारण कार्यकर्ते त्यांना सोडून जातील.

अन्य लेख

संबंधित लेख