लगोलग १९८० साली झालेल्या विधानसभा निवडणुका देखील शिवसेनेने “रेल्वे इंजिन” ही निशाणी घेऊन लढवल्या होत्या… पण आमच्या पदरी घोर निराशा पडली होती… शिवसेनेचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही.
मात्र काँग्रेसचे नेते बॅरिस्टर अब्दुल अंतुलेंना श्रीवर्धन (रायगड) मतदारसंघात शिवसेनेनं पाठिंबा दिला होता…
साहेब मराठी माणसाची जातपातच काय पण धर्म देखील मानत नाहीत… “मराठी मुसलमान” देखील आपलाच मानतात… हे कळल्यावर तर माझ्या आनंदाला पारावार उरला नाही…
मुख्यमंत्री झाल्यावर याच बॅरिस्टर अब्दुल अंतुलेंना आमच्या साहेबांबरोबरच्या मैत्रीमुळे… छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ब्रिटनच्या संग्रहालयातून भारतात परत आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले… भवानी तलवार भारतात आली नाही पण… मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल अंतुलेंना साहेबांना ब्रिटनची वारी घडली आणि ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांच्याशी बोलणीही सुरू झाली होती… हा चमत्कार फक्त आमचे साहेबच मैत्रीच्या बळावर करू शकत होते…
१९८४ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि देशात काँग्रेस बद्दल सहानुभूतीची लाट आली… सगळे विरोधी पक्ष जमीन दोस्त झाले… राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले पण… आमचे साहेब मात्र ताठ कण्याने उभे होते…
आता साहेबांनी आपल्या सेनेत अनेक आमूलाग्र बदल केले… यातील सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे भाजपशी युती आणि हिंदुत्वाची ओढलेली शाल… फक्त मराठीच्या मुद्द्यावर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचता येणार नाही हे ओळखून सेनेने “कट्टर हिंदुत्व” ही आपली ओळख निर्माण केली… आपण मराठी बरोबरच “हिंदू”देखील आहोत ही जाणीव करून देणाऱ्या साहेबांचा मला विलक्षण अभिमान वाटला…
आमच्याकडे स्वतःचे निवडणूक चिन्ह नसल्यामुळे साहेबांनी भाजपच्या कमळ चिन्हावर शिवसेनेचे दोन वाघ लोकसभेसाठी उभे केले होते… मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक… अर्थात काँग्रेसच्या बाजूने असलेल्या सहानुभूतीच्या लाटेत दोघेही पडले… (पण या निमित्ताने मला १९७० साली भारतीय जनसंघाने परळ लालबाग पोटनिवडणुकीत शिवसेनेला दिलेला पाठिंबा आठवला… युतीची सुरुवात तेव्हाच झाली होती आणि ती भारतीय जनसंघाने केली होती…)…

यानंतर १९८५ च्या सुरुवातीलाच मार्च महिन्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या… केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं… म्हणजे महापालिकेतही काँग्रेसचीच सत्ता यायला हवी होती पण…
मुख्यमंत्री वसंतदादा पाटील सहज की जाणून-बुजून बोलले माहित नाही पण… “मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव रचला जातो आहे पण मी ते होऊ देणार नाही” असं एकच वाक्य बोलून गेले आणि आमच्या साहेबांनी… “मराठी माणसा जागा हो” ची हाक दिली… त्यातच साहेबांनी अफलातून डाव टाकत सगळ्या शाखाप्रमुखांना महापालिकेची उमेदवारी दिली…
मुंबईकर मराठी मतदार एकदिलाने शिवसेनेच्या मागे उभा राहिला… आम्ही “मशाल” चिन्हावर लढवलेल्या १४० पैकी ७४ जागा जिंकल्या… १७० सदस्यीय महापालिकेत बहुमतासाठी त्यांना फक्त १२ जागा कमी पडल्या होत्या, परंतु तरीही आम्ही सत्ता स्थापन केली… छगन भुजबळ मुंबईचे महापौर झाले…
त्यावेळी जमशेद जी. कांगा नावाचे महापालिका आयुक्त होते… “कांगांनी जर ऐकलं नाही, तर शिवसैनिकांनी त्यांच्या कानाखाली आवाज काढावा”… असं बाळासाहेब महापालिकेच्या विजयानंतर झालेल्या सभेत जाहीरपणे ठणकावून
बोलले होते… याला म्हणतात “ठाकरे शैली”… सर्वसामान्य मुंबईकर मराठी माणसाला भावणारी…
वसंतदादा पाटील यांच्या एका वाक्याने मुंबई महापालिका शिवसेनेच्या पदरात पडली पण यामुळे पुन्हा एकदा आमचे कावेबाज विरोधक शिवसेनेला “वसंत सेना” म्हणून हिणवू लागले… पण मी कधीच त्यांना भीक घातली नाही…
आणि या निवडणुकीत फक्त २५% मतदान झाले होते, त्याचा फायदा शिवसेनेला झाला… असले पोरकट आरोप करणाऱ्या दळभद्री विरोधकांना… “बाकीच्या ७५% ना आम्ही मतदान करण्यापासून थांबवले होते का?” असा रोखठोक प्रश्न विचारून मी आजही निरुत्तर करतो…

आणि त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ माझगाव मतदार संघातून “मशाल” चिन्हावर निवडून येऊन एकमेव आमदार झाले… कारण तोपर्यंत शिवसेनेला स्वतःचे अधिकृत असे चिन्ह नव्हते… उमेदवारांची नोंद अपक्ष अशी व्हायची…
पुढे १९९१ साली याच छगन भुजबळांनी… चुकलो लखोबा लोखंडेने साहेबांशी आणि शिवसेनेशी गद्दारी करून… आमच्या १८ आमदारांना बरोबर घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला… त्यावेळी माझी तळपायाची आग मस्तकाला गेली
होती… या साहेबांनी ज्या शिवसेनेने तुम्हाला मुंबईचे महापौर केले… आमदार म्हणून निवडून आणले त्या साहेबांशी आणि पक्षाशी गद्दारी करताना छगन भुजबळ यांना काहीच कसे वाटले नाही?… मनातल्या मनात मी त्यांच्या तोंडावर थुकलो होतो… सत्ताधारी काँग्रेसमध्ये गेल्यामुळे शिवसैनिकांनी थोडे नमते घेतले नाहीतर… आम्ही भुजबळांना आमच्या भुजातील बळ नक्की दाखवले असते…पुढे बराच काळ छगन भुजबळ यांचे लखोबा लोखंडे हे टोपण नाव खूप प्रसिद्ध झाले होते…
साहेबांनी हिंदुत्वाचा वसा घेतल्यानंतर मात्र माझ्या शिवसेनेला सोन्याचे दिवस येऊ लागले…
शिवसेनाप्रमुखांपासून… नेते व उपनेते… सचिव… प्रवक्ते… शाखाप्रमुख… जिल्हा संपर्कप्रमुख… विभाग प्रमुख विभाग उपप्रमुख… गटप्रमुख अशी श्रेणीबद्ध संघटनात्मक रचना सक्रिय करण्यात आली…
एवढेच नव्हे तर शिवसेनेची महिला आघाडी देखील सक्रिय झाली… खूप मोठ्या संख्येने आमच्या माता भगिनी शिवसेनेचे काम सक्रियतेने करू लागल्या…
महाराष्ट्रात गावोगाव शिवसेनेच्या शाखा उघडू लागल्या… शिवसेनेचा भगवा आणि साहेबांची पोस्टर्स महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झळकू लागली… शिवसेना खऱ्या अर्थाने महाराष्ट्र व्यापी झाली…

मात्र १९८७ सालाने शिवसेनेच्या ” हिंदुत्वा”ला सोन्याची झळाळी लाभली… १९८७ साली काँग्रेसचे विलेपार्ले येथील आमदार हंसराज भुग्रा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या मतदारसंघात पोट निवडणूक लागली… या निवडणुकीत काँग्रेसतर्फे दिग्गज प्रभाकर कुंटे यांना उमेदवारी दिली गेली… राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर शंकरराव चव्हाण यांच्यासारखे कडक हेडमास्तर होते… अब्दुल रहमान अंतुले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील शिवसेना आणि काँग्रेसचे मधुर संबंध संपुष्टात आले होते… बाळासाहेबांनी काँग्रेसच्या थेट विरोधात भूमिका घेतीली होती… पार्ले येथील या निवडणुकीसाठी साहेबांनी मुंबईचे महापौर असलेल्या रमेश प्रभू यांची निवड केली आणि निवडणूक घोषणा दिली ‘गर्व से कहो हम हिंदू है’… साहेबांच्या भाषणाची सुरुवातच “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू भगिनी आणि मातांनो” अशी व्हायची… आणि सगळी सभा चैतन्याने भरून जायची… आता सगळे उत्तर प्रदेश बिहारचे भैय्ये आणि मद्रासी आमच्यासाठी “परप्रांतीय हिंदू” झाले होते…
बाळासाहेबांच्या भगव्या कपड्यांनी… हातातल्या रुद्राक्षांनी… भारदस्त आवाजात मांडलेल्या कडव्या हिंदुत्वाने… अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेवर गारुड घातले होते…
त्यावेळी भाजपचा पाठिंबा धर्मनिरपेक्ष जनता पक्षाला होता… जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा, काँग्रेसचे प्रभाकर कुंटे आणि शिवसेनेचे रमेश प्रभू अशी ही तिरंगी लढत होती… साहेब आणि रमेश प्रभू या दोघांनीही थेट हिंदुत्वाच्या
मुद्द्द्यावर जाहीर सभांमधून मते मागितली होती… भाजपचा जनता पक्षाला पाठिंबा असला तरी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते या निवडणुकीत शिवसेनेच्याच उमेदवाराचा प्रचार करत होते… या सगळ्या झंझावतामुळे आमच्या रमेश प्रभू यांनी निवडणूक जिंकली…
निवडणुकीच्या विरोधात प्रभाकर कुंटे यांनी उच्च न्यायालयात दावा केला. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये दावा ठोकला… प्रभाकर कुंटे यांची बाजू उचलून धरताना प्रभू यांची निवडणूक रद्दबातल केलीच शिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा धर्माच्या नावावर मते मागितल्याने मतदानाचा अधिकार ६ वर्षांसाठी (१९९९ ते २००५) काढून घेतला… दुसरीकडे रमेश प्रभू यांनाही पुढे ६ वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदी आली… पण शिवसेनेचे हिंदुत्व बावनकशी सोन्यासारखे झळाळून निघाले आणि आमचे साहेब अनभिषिक्त “हिंदुहृदयसम्राट” झाले… आणि भाजपवाले विशेषतः प्रमोद महाजन युतीसाठी “मातोश्री” चे उंबरठे झिजवायला लागले… साहेब तर माझ्या गळ्यातील ताईत झाले…

आता आमची सेना महाराष्ट्र व्यापी पक्ष झाला आणि पक्षाला निवडणूक आयोगाकडून “धनुष्यबाण” हे चिन्ह मिळाले… २३ जानेवारी १९८८ रोजी साहेबांनी “सामना” नावाचे मुखपत्र सुरू केले… आणि आता शिवसैनिकांच्या
तसेच मराठी माणसाच्या आवाजाला एका हक्काच्या वर्तमानपत्राचे पाठबळ मिळाले होते… त्यादिवशी मला कोण आनंद झाला होता म्हणून काय सांगू… आणि त्याहीपेक्षा आनंद… तेव्हापासून आजपर्यंत एकही दिवस सामना वृत्तपत्र निघाले नाही असे झालेले नाही याचा होतो… याच “सामना”मुळे शिवसेनेला संजय राऊत नावाचा हिऱ्यासारखा प्रवक्ता मिळाला… त्यांच्या अभिजात मराठीतील आणि ठाकरे शैलीतील रोखठोक अग्रलेख आम्हाला अवर्णनीय आनंद मिळवून देऊ लागले… साहेबांनी पुढे संजय राऊतांना राज्यसभेवर पाठवले…

शिवसेनेने कात टाकल्यावर पुढच्याच वर्षी १९८९ साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूका झाल्या होत्या… या निवडणूकीत शिवसेनेचे ३० नगरसेवक निवडून आले होते… दूसरीकडे कॉंग्रेसने स्थानिक पातळीवर असणाऱ्या आगरी सेनेसोबत युती केली होती… बहुमत शिवसेनेकडेच होते त्यामुळे शिवसेनेचा महापौर ठाणे महानगरपालिकेत येणार अस स्पष्ट चित्र होतं…
बाळासाहेबांनी या महापौर पदासाठी होणाऱ्या निवडणूकीची जबाबदारी सतीश प्रधान आणि आनंद दिघेंकडे दिली होती… प्रकाश परांजपे हे शिवसेनेकडून महापौर पदासाठी उमेदवार होते… मात्र महापौर पदासाठी निवडणूक झाली आणि अवघ्या एका मताने सेनेचं महापौर पद हुकलं… उपमहापौर पदासाठी
देखील शिवसेनेला आपला उमेदवार विजयी करता आला नाही… सेनेच्या २ नगरसेवकांनी आपलं मत विरोधात टाकलं होतं… त्यामुळे ‘गद्दार कोण’, याची चर्चा ठाण्यात सुरू होती…
ठाण्यातील वातावरण तणावाचं असतानाच या निवडणुकीच्या महिन्याभरातच भर दिवसा… शिवसेनेचे “गद्दार” नगरसेवक श्रीधर खोपकर यांची हत्या झाली… आणि या हत्येनं ठाण्यातच नव्हे, तर महाराष्ट्रभर खळबळ उडाली…
त्यानंतर पोलिसांनी आनंद दिघे यांच्यासह ५२ शिवसैनिकांना अटक केली… आनंद दिघेंच्या अटकेच्या निषेधार्थ ‘ठाणे बंद’ करण्यात आला होता आणि या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता…
मात्र संपूर्ण शिवसेनेत एक कडक संदेश गेला… “पक्षाशी गद्दारी की एक ही सजा… सर तन से जुदा”… मग तो मराठी असो की हिंदू… आमच्या दृष्टीने गद्दार म्हणजे “काफीर”च… आणि त्याची एकच शिक्षा… सर तन से जुदा… शिवसैनिकांचा हा स्वाभिमानी बाणा त्यावेळी मला खूप भावला होता…

आणि १९८९ साली झालेल्या लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकीत शिवसेनेला… साहेबांनी दूरदृष्टीने भाजपशी केलेल्या युतीचा निर्णय सेनेसाठी किती फायदेशीर होता याचा अनुभव आला… आपला पहिला हक्काचा खासदार
मिळाला… उत्तर मध्य मुंबईतून सेनेचे विद्याधर गोखले सेनेच्या “धनुष्यबाणावर” विजयी झाले… सेनेच्या हिंदुत्वाचा हुंकार देशाच्या संसदेत गरजला होता. त्यावेळी अवघ्या महाराष्ट्रातला शिवसैनिक मनोमन आनंदला होता.

मागोमाग १९९० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीला पहिल्यांदा अभूतपूर्व यश लाभले… शिवसेनेने पक्ष म्हणून आपल्या धनुष्यबाण चिन्हावर पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत १८३ जागा लढवून ५२ जागा जिंकल्या… आणि आमच्यामुळे १०४ जागा लढवून ४२ जागा मिळाल्या… अर्थात् आता युतीत आम्ही “मोठे भाऊ” झालो होतो… (तुम्ही १८३ जागा लढवून ५२ जागा जिंकलात आणि आम्हाला १०४ दिल्यात त्यात आम्ही ४२ जिंकल्या… टक्केवारी काढून बघ असली फालतू बकवास करणाऱ्या आगाऊ भाजपवाल्यांना… राजकारणात टक्केवारी चालत नाही… फक्त जिंकलेल्या जागा बोलतात हे कोण सांगणार?)… शिवसेनेचे मनोहर जोशी विरोधी पक्षनेते झाले… भाजपवाल्यांसमोर आम्ही छाती पुढे काढून चालू लागलो…
आणि या ५२ आमदारांबरोबरच शिवसेनेचे वाघ राज्यसभेत पोचण्यासाठी दरवाजे खुले झाले होते… आता आमची शिवसेना “सर्वव्यापी” होऊ लागल्यामुळे आमचा आनंद गगनात मावत नव्हता…
(क्रमश:)
– तुमचाच
बाळासाहेबांचा शिवसैनिक
या आधीचे भाग वाचा –