
मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी घेतलेल्या एका विशेष मुलाखतीत “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक मोठे नेते हे मूळचे मुंबईचे नसल्याने त्यांना मुंबईकरांच्या वेदना आणि प्रश्नांची जाण नाही. सध्याचे राज्यकर्ते हे मुंबईबाहेरुन आलेले आहेत त्यामुळे त्यांना इथल्या स्थानिकांच्या समस्या कधीच समजणार नाहीत.” असे वक्तव्य केले आहे.

“मुंबई महाराष्ट्रापासून तोडून गुजरातला जोडण्याचा भाजपचा डाव आहे.” हा वात काढलेला आणि शेळावलेला सुतळी बॉम्ब निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर हताश झालेल्या वैफल्यग्रस्त राज ठाकरे यांनी देवेंद्रजींचा मुंबईत जन्म झाला नसल्याचा अर्थहीन आणि पांचट मुद्दा उपस्थित केला आहे.
राज ठाकरे यांना नेमके काय सुचवायचे आहे? जन्माने मुंबईकर असेल तरच त्याला मुंबईची सुख दुःखे कळू शकतात काय?
नागपूरला जन्मलेल्या नितीन गडकरी यांना मुंबईकरांची सुख दुःखे कळल्याशिवाय त्यांनी सेना भाजप सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबई ५५ उड्डाणपूल बांधले होते का?
एकेकाळी मुंबईच्या टॅक्सी ड्रायव्हर युनियनचा बादशहा जॉर्ज फर्नांडिस यांनी मुंबईचे महापौर आणि अनभिषिक्त सम्राट स. का. पाटील यांना १९६७ साली दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अक्षरशः लोळवले. त्या जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म कर्नाटकातल्या मंगलोरचा पण मुंबईकरांना जॉर्ज फर्नांडिस कधीच परका वाटला नाही. मुंबईकरांच्या दृष्टीने जॉर्ज मुंबईकरच होता.
ज्या छगन भुजबळांना शिवसेनेने मुंबईचे महापौर केले होते त्यांचा जन्म नाशिकचा. बहुदा त्याकाळी ते कट्टर शिवसैनिक असल्यामुळे त्यांना नाशिकला जन्म घेऊन सुद्धा मुंबईकरांची सुखदुःखे कळण्याची दैवदत्त देणगी लाभलेली असावी. देवेंद्रजी शिवसैनिक नाहीत एवढाच त्यांचा गुन्हा असावा.

बॉलीवुडच्या ज्या शाहरुख खान बरोबर राज ठाकरे तो अस्सल मुंबईकर असल्यासारखे प्रेमळ संवाद साधत असतात. त्या शाहरुख खानचा जन्म दिल्लीचा आहे. पण राज ठाकरेंनी त्याला मुंबईकर असल्याचे प्रमाणपत्र दिले की प्रश्न मिटला.
अर्थात् राज ठाकरेंच्या या भिकारड्या तर्कानुसार मुंबईत जन्मलेल्या दाऊद इब्राहिम कासकरला नागपूरला जन्मलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुंबईची सुखदुःखे जास्त कळत असावीत व्वा रे व्वा राज ठाकरे!!!!
अर्थात देवेंद्र फडणवीस हे मुंबईकर आहेत की नाहीत याचे प्रमाणपत्र त्यांना राज ठाकरे यांच्याकडून घेण्याची काहीही गरज नाही देवेंद्रजींना ते प्रमाणपत्र मुंबईकरांनी दिलेले आहे. १६ जानेवारी २०२६ ला ते मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतपेटीतून जाहीर होईल.

२०२० साली तत्कालीन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या एका पुस्तकाचा हवाला देऊन ठाकरे घराणे हे मूळ बिहारच्या मगध प्रांतातले ठाकरे आडनाव घेण्यापूर्वी त्यांच्या आडनाव पनवेलकर होते असे जाहीरपणे सांगितले होते. पण ठाकरे कुटुंबीयांच्या अस्सल मराठीपणावर किंवा मुंबईकर असण्यावर सर्वसामान्य मुंबईकरांनी कधीच शंका घेतली नाही. मात्र आज राज ठाकरे देवेंद्रजी निव्वळ जन्माने मुंबईकर नाहीत त्यामुळे त्यांना मुंबईची सुखदुःखे कळणार नाही असे म्हणत असतील तर बात निकली है तो बहुत दूर तलक जायेगी…

जन्माने नाशिककर नसूनही नाशिककरांनी २०१२ साली राज ठाकरे यांच्यावर विश्वास टाकून नाशिक महापालिका त्यांच्या हवाली केलीच होती ना? त्यावेळी राज ठाकरे यांचा जन्म मुंबईचा त्यांना नाशिकची सुखदुःखे काय कळणार? असा विचार नाशिककरांनी केला नाही राज ठाकरे यांच्या आजच्या तर्कशास्त्राप्रमाणे नाशिककरांची ती घोडचूक होती तर. आणि मग राज ठाकरे यांनी स्वतःच्या तर्कशास्त्राप्रमाणे मुंबई महानगरपालिका सोडून महाराष्ट्रातली अन्य कोणतीही महापालिका लढवण्यासाठी प्रचार करू नये. कारण मुंबई सोडून महाराष्ट्रातील बाकी शहरांची सुखदुःखे त्यांना कशी कळणार?

गुजरातमध्ये जन्मलेले नरेंद्र मोदी आज ३ वेळा देशाचे पंतप्रधान झाले आहेत ते आसेतू हिमालय संपूर्ण देशाची सुखदुःखे कळल्या शिवाय? आज देशातल्या प्रत्येक “प्रांताला” पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले वाटतात. राज ठाकरे यांचे तर्कट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशभरातील प्रचंड लोकप्रियतेने साफ उताणे पाडले आहे.

“आम्ही जातो, आमचा काळ झाला, तुम्ही सप्तसिंधू, सप्तगंगा मुक्त करा, काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका!” हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटचे शब्द आहे.
महाराष्ट्रात जन्मलेल्या छत्रपती शिवरायांचे काळीज ज्याच्यासाठी तुटत होते. तो काशी विश्वेश्वर उत्तर प्रदेशात आहे. भारतभर पसरलेली बारा ज्योतिर्लिंगे सप्तसिंधू सप्तगंगा यवनांच्या हातुन मुक्त करून त्यांना हिंदवी स्वराज्यात आणायची होती. “अहत पेशावर तहत तंजावर” ही शिवरायांची झेप होती.
म्हणूनच हिंदवी स्वराज्याची तट्टाणे अटकेपार सिंधू नदीचे पाणी प्याली तेव्हा. थोरल्या छत्रपतींचे स्वप्न साकार झाले म्हणून पुण्याला अक्षरशः दिवाळी साजरी झाली होती.
दहिसर चेक नाका ते मुंबई महापालिकेचे बोरीबंदर कार्यालय एवढेच ज्यांचे विश्व आहे. त्यांना छत्रपती शिवरायांचा हा आवाका कळणे सर्वथैव अशक्य आहे.
त्यांना भारत हे एक राष्ट्र आहे. त्याची संस्कृती एक आहे. त्याची संवेदना एक आहे. या सनातन सत्याची प्रत्यक्ष अनुभूती घ्यावी लागते.
ती अनुभूती दुपारी उशीरापर्यंत झोपून अन्य प्रांतीय हिंदूंना नुसत्या शिव्याशाप देऊन त्यांच्या आस्थापनांमध्ये खळ् खट्याक करून गरीब अन्य प्रांतीय हिंदूंना मारहाण करून त्यालाच पुरुषार्थ समजणाऱ्य सुपारीबाजांना आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान आणि रोहिंग्यांच्या विषयी सोयीस्कर मौन बाळगणाऱ्या राजकीय बांडगुळांना कधीच घेता येणार नाही.
शिवरायांच्या नुसत्या नावाच्या पुण्याईवर राजकीय पक्ष चालवून दोन-तीन पिढ्यांची सोय करून ठेवणाऱ्या लबाडांना आता आपले राजकीय पानिपत डोळ्यासमोर दिसू लागले आहे. “राष्ट्र सर्वोपरी” या भूमिकेतून भाजपने त्यांच्यासमोर उभे केलेल्या आव्हान त्यांना आता पेलवेनासे झाले आहे. आपले घराणेशाहीचे राजकारण पार मातीमोल होणार याची त्यांना जाणीव झाली आहे आणि एकदा का मुंबई महापालिका हातातून निसटली की पुढच्या निवडणुका परत ५ वर्षांनी तोपर्यंत आपले राजकीय अस्तित्व आपला राजकीय पक्ष टिकून ठेवणे हेच त्यांच्यासाठी जिकरीचे होणार आहे या हताशेतून वैफल्यातून अगतिकतेतून जन्माने नागपूरकर मुंबईकर असा निरर्थक विषय उकरून काढण्याचा त्यांचा हा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे.
उंबरातले किडे मकोडे, उंबरी करिती लीला
जग हे बंदी शाला, जग हे बंदी शाला…