Monday, January 12, 2026

मुंबईत मराठी टिकवण्यात ठाकरेंचा सहभाग काय? भाजप नेते केशव उपाध्ये यांचे बोचरे प्रश्न

Share

मुंबई: मुंबई आणि मराठी माणूस हे समीकरण सांगत स्वतःला मराठीचे उद्धारकर्ते म्हणवून घेणाऱ्या ठाकरे बंधूंवर भारतीय जनता पक्षाने जोरदार निशाणा साधला आहे. भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियाद्वारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गेल्या ३० वर्षांतील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, “मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यास ठाकरेच जबाबदार आहेत,” असा गंभीर आरोप केला आहे.

केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावरून ठाकरे बंधूंना थेट आव्हान देत चार महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले.

शिवउद्योग सेना आणि मायकल जॅक्सनचा उल्लेख
केशव उपाध्ये यांनी राज ठाकरे यांनी १९९६ मध्ये स्थापन केलेल्या ‘शिवउद्योग सेने’ची आठवण करून दिली. ते म्हणाले की, “राज ठाकरेंनी मराठी तरुणांच्या रोजगारासाठी शिवउद्योग सेना काढली होती. त्यासाठी पॉप स्टार मायकल जॅक्सनचा कार्यक्रम आयोजित करून कोट्यवधींचा निधी गोळा करण्यात आला. मात्र, गेल्या ३० वर्षांत या उपक्रमातून नेमके किती मराठी उद्योजक उभे राहिले, याचा हिशोब त्यांनी द्यावा.” केवळ इव्हेंट करून मराठी माणसाचे प्रश्न सुटत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

शिववडा आणि रोजगाराचा प्रश्न
उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेल्या ‘शिववडा’ योजनेवरही उपाध्ये यांनी टीका केली. दादरमध्ये मोठी स्पर्धा घेऊन या उपक्रमाची प्रसिद्धी करण्यात आली होती. मात्र, यातून किती मराठी तरुण खरोखर मोठे उद्योजक झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, नवीन युगातील तंत्रकुशल (Tech-savvy) नोकऱ्या मराठी तरुणांना मिळाव्यात यासाठी ठाकरे गटाने सत्तेत असताना किंवा संघटनेच्या माध्यमातून कोणते ठोस पाऊल उचलले, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

मराठी शाळा आणि हद्दपारीचे वास्तव
मुंबईतील मराठी शाळांची घटती संख्या हा गेल्या काही वर्षांतील चिंतेचा विषय आहे. यावर बोलताना उपाध्ये म्हणाले की, “मुंबईत मराठी शाळा बंद पडत असताना त्या वाचवण्यासाठी या नेत्यांनी काय केले? मराठी माणसाच्या अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्यांच्या काळातच मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, हे वास्तव मुंबईकरांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे,” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

असे कितीही प्रश्न विचारले तरी उत्तरांची केवळ ‘नकारघंटा’च ऐकू येईल, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली. ठाकरे बंधू आता राजकीय कारणास्तव एकत्र येत असले, तरी मराठी माणसाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी केलेले काम शून्य असल्याचा दावा भाजपने केला आहे. या आरोपामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ‘मराठी अस्मिता विरुद्ध विकास’ असा संघर्ष पुन्हा एकदा रंगण्याची चिन्हे आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख