पुण्याच्या जाहीरनाम्यात पीएमपी आणि मेट्रोच्या मोफत प्रवासाची घोषणा राष्ट्रवादी काॅंग्रसने केली आहे. या घोषणेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलीच खिल्ली उडवली. ‘संवाद पुणेकरांशी’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात फडणवीस यांना अभिनेत्री गिरीजा ओक यांनी पहिलाच प्रश्न ‘मोफत मेट्रो’च्या आश्वासनाबाबत विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘‘जेव्हा निवडून येत नाहीये, असे लक्षात येते तेव्हा येणाऱ्या नैराश्यातून अशी आश्वासने दिली जातात. पण मी त्यांना सांगेन की, किमान लोकांचा विश्वास बसेल असे तरी काही जाहीर केले पाहिजे नां !”
या आश्वासनाबाबत फडणवीस म्हणाले, ‘‘प्रत्यक्षात आज मी इथे जाहीर करणार होतो की पुण्यातून उडणारी जेवढी विमाने आहेत, त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केले पाहिजे. जाहीर करायला काय लागतयं. राजकारणात निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असते की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काहीही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काहीही म्हणतो. पण तरी माझे म्हणणे आहे की किमान लोकांचा विश्वास बसेल अशा तरी घोषणा केल्या पाहिजेत.”
मेट्रो एकट्या राज्याची नाही. मेट्रो केंद्राची देखील आहे. कोणत्याही मेट्रोचे प्रवासभाडे निश्चित करण्यासाठी एक कायदेशीर समिती असते. ते अधिकार कायद्यानेच त्या समितीला दिलेले आहेत. कोणाच्याही मनात आले तरी
कोणी तिकीट माफ करू शकत नाही. समिती म्हणेल की, सवलत देणार असाल तर खर्चाचे पैसे तुम्ही कोठून देणार ते सांगा, असे सांगून फडणवीस म्हणाले, म्हणून ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत, त्या गोष्टींची आश्वासने कशासाठी द्यायची.
पुणेकरांना उत्तम मेट्रो हवी
‘‘पुणेकरांना मी जवळून ओळखतो. पुणेकर वेळेवर कर भरणारे आहेत. हे एकमेव असे शहर आहे की मी इथे ते् देखील बघितलेले आहे की रांग लावून कर भरणारे, रांग लावून विजेची बिले भरणारे लोक आहेत. हे मी केवळ या पुण्यामध्ये बघितले आहे. पुणेकरांना मेट्रो मोफत नको आहे. विश्वासार्ह सेवा पुणेकरांना हवी आहे. पुणेकरांना उत्तम मेट्रो, उत्तम बसची सेवा हवी आहे. या सगळ्या सेवा चांगल्या झाल्या पाहिजेत, ही पुणेकरांची अपेक्षा आहे. त्यासाठी येणारा जो काही किमान खर्च आहे, तो पुणेकर देतील, ” असेही फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, हे जे आश्वासन आहे ते आश्वासन आहे हे पुणेकरांनाही समजलेले आहे. जे पूर्ण होऊ शकत नाही, हेही त्यांना माहिती आहे. तरीही या आश्वासनाबाबत पुणेकरांची नाराजी नाही. कारण त्यांना हे माहिती आहे, की येथे ते निवडून येणार नाहीयेत.