Saturday, January 17, 2026

विरोधकांच्या आरोपांना जनतेची चपराक; भाजपच्या ‘महाविजया’नंतर आमदार महेश लांडगे यांची पहिली प्रतिक्रिया

Share

पिंपरी-चिंचवड : बहुचर्चित पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) अभूतपूर्व यश मिळवत पुन्हा एकदा सत्तेचे कमळ फुलवले आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट आणि शरद पवार गट) भाजपने मोठा धक्का दिला आहे. १२८ पैकी तब्बल ८४ जागांवर विजय मिळवून भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर शहराचे नेतृत्व आणि आमदार महेश लांडगे यांनी हा विजय ‘स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांना’ समर्पित केला आहे.

विकासाभिमुख हिंदुत्वाची सरशी
आमदार महेश लांडगे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या बहुचर्चीत लढाईमध्ये स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्याला बहुमताने समर्थन दिले. ही लढाई केवळ निवडणूक म्हणून नव्हे, तर आपल्या स्वाभिमानाची आणि सन्मानाची होती. हा महाविजय आज तमाम स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी मी समर्पित करतो,” असे त्यांनी नमूद केले.

नेत्यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास
आमदार महेश लांडगे पुढे म्हटले की “देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे सक्षम, दूरदर्शी नेतृत्व मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवत पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीला स्पष्ट आणि निर्णायक कौल दिला आहे. हा कौल म्हणजे विकासकामांना, प्रामाणिक प्रशासनाला आणि जनहिताला दिलेली ठाम पोचपावती आहे हा विजय केवळ भारतीय जनता पार्टीचा नाही, तर हा विजय पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येक स्वाभिमानी नागरिकाचा आहे. विकासाभिमूख हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकर भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी बहुमताने राहिला आहे. विरोधकांनी केलेल्या बिनबुडाच्या आरोपांना ही चपराक आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

टीम भाजपचे यश
या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला 128 पैकी 84 जागांवर विजय मिळाला आहे. भाजपाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनापासून अभिनंदन करतो. ‘‘राष्ट्र प्रथम’’ या विचाराने काम करुया, असे आवाहन त्यानी केले. या विजयासाठी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न बापू काटे, निवडणूक प्रमुख तथा आमदार श्री. शंकरशेठ जगताप, विधान परिषद आमदार सौ. उमाताई खापरे, विधान परिषद आमदार श्री. अमितजी गोरखे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, नेते आणि मार्गदर्शक यांच्यासह भाजपा परिवारातील विविध संस्था, संघटना यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा महाविजय शक्य झाला. या विचारांच्या आणि विकासाच्या लढाईमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे असे ते म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख