Friday, November 29, 2024

अजित पवारांनी ‘माझी लाडकी बहिण’ योजने वरील अफवांना दिले प्रत्युत्तर

Share

महाराष्ट्र : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरातील महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) योजनेला अर्थखात्यानेच त्यावर आक्षेप घेतला अश्या प्रकारचे वृत्त काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध व्हायरल झाले होते. त्यावर आता अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या शैलीत समाचार घेतला आहे. अजित पवार यांनी समाज माध्यमावर याविषयीची भूमिका मांडली.

“महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली.”

“चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार ?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे.”

“राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही.”

“काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया असं आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.

अन्य लेख

संबंधित लेख