अमरावती : ‘फिरते मेडीकल क्लिनिक’च्या माध्यमातून मेळघाटसह परिसरातील गरजू रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.
आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या फिरते मेडिकल क्लिनिक असलेल्या मोठ्या रुग्णवाहिकेचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. चांदूरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथील आमदार बच्चू कडू यांच्या सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधिनस्त निवासी मूकबधिर विद्यालयाला सदिच्छा भेट प्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार बच्चू कडू, माजी आमदार प्रवीण पोटे पाटील, बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे पदाधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, मेळघाटातील अतीदुर्गम गावात रस्ते सुविधा कमी असल्याने प्राथमिक औषधोपचारासह इतर वैद्यकीय उपचार सुविधा घेण्यासाठी खूप अडचणी येतात. वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी दूर अंतरावरच्या आरोग्य केंद्रात जावे लागते. फिरते मेडिकल क्लिनिकमुळे आजारी व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचणे शक्य होऊन वेळेत संबंधित रुग्णाला उपचार सुविधा देता येईल, असे त्यांनी सांगितले. फिरते मेडिकल युनिट असलेली ही अँबुलन्स मेळघाटातील 25 गावात वैद्यकीय सेवा पुरविणार आहे. या मोबाईल मेडिकल क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा, रक्त चाचण्या उपलब्ध आहेत, अशी माहिती बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधिनस्त निवासी मूकबधिर विद्यालयाला येथे सदिच्छा भेट देवून विद्यालयाची पाहणी केली.
- 27 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘स्वामित्व योजने’चा शुभारंभ होणार
- पूंछ येथे रस्ते अपघातात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद, राज्य सरकारकडून १ कोटींची मदत जाहीर
- ‘वीर बालदिवस’ निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे गुरु गोविंद सिंहजी यांच्या साहिबजाद्यांना विनम्र अभिवादन
- अटलजींच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची आदरांजली
- पुण्यात उद्योगांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी उदय सामंत यांचे निर्देश